मनुस्मृति – आदरातिथ्य आणि अतिथी

मनुस्मृति – आदरातिथ्य आणि अतिथी

Spread the love

मनुस्मृति ग्रंथातील तिसऱ्या अध्यायात अतिथी आणि आदरातिथ्य यांच्याविषयी काही शिकवण दिलेली आहे. विशेष म्हणजे त्यातील काही गोष्टी आजही अनेक घरांमध्ये पाळल्या जातात. सनातन धर्मातील अनेक गोष्टी निसर्ग आणि मानव यांच्या एकत्त्वावर आधारित असल्याने ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत, मानवी आचाराला धरून आहे त्याचे प्रतिबिंब भारतीयांच्या आयुष्यात दिसून येते. मनुस्मृति च्या या अध्यायात तिसऱ्या अध्यायात अतिथी कोण आहे, कोण नाही? तसेच आदरातिथ्य कसे करावे आणि त्याचे काय फळ मिळते याबद्दल विवेचन केलेले आहे.

सम्प्राप्ताय त्वतिथये प्रदद्यादासनौदके ।
अन्नं चैव यथाशक्ति सत्कृत्य विधिपूर्वकम् ॥ ९९ ॥


samprāptāya tvatithaye pradadyādāsanaudake |
annam caiva yathāśakti satkṛtya vidhipūrvakam || 99 ||

जर तुमच्याकडे कोणी अतिथी आलेला असेल तर त्याला विधिपूर्वक (धर्मात सांगितल्याप्रमाणे) यथाशक्ती पाणी, बसण्यासाठी आसन आणि अन्न देऊन सत्कृत्य करावे. ॥ ९९ ॥

शिलानप्युञ्छतो नित्यं पञ्चाग्नीनपि जुह्वतः ।
सर्वं सुकृतमादत्ते ब्राह्मणोऽनर्चितो वसन् ॥ १०० ॥


śilānapyuñchato nityaṃ pañcāgnīnapi juhvataḥ |
sarvaṃ sukṛtamādatte brāhmaṇo’narcito vasan
|| 100 ||

एखाद्याकडे भले शेतातून आलेल्या धनधान्याची रास असो किंवा कोणी पंचाग्नी मध्ये हवन करत असेल आणि तरीही जर घरी आलेल्या ब्राह्मणाचे आदरातिथ्य करत नसेल तर त्याने कमावलेले सगळे पुण्य निघून जाते. ॥ १०० ॥
(लोकांना कधी कधी ब्राह्मण शब्द वाचून विचित्र वाटते पण गोष्ट तशी सोपी आहे, घरी आलेल्या सुशिक्षित आणि धर्मानुसार वागणाऱ्याचे आदरातिथ्य न केल्याने पुण्यात तर नक्कीच वृद्धी होणार नाही)

तृणानि भूमिरुदकं वाक् चतुर्थी च सूनृता ।
एतान्यपि सतां गेहे नोच्छिद्यन्ते कदा चन ॥ १०१ ॥


trnāni bhūmirudakam vāk caturthī ca sūnrtā |
etānyapi satām gehe nocchidyante kadā cana
|| 101 ||

अन्न जरी उपलब्ध नसलं तरीही सत्पुरुषाच्या घरी तृणासन (बसायला जागा), जमीन, पाणी आणि सुवचन (गोड बोलणे) यांची कधीच कमतरता नसते.॥ १०१ ॥

एकरात्रं तु निवसन्नतिथिर्ब्राह्मणः स्मृतः ।
अनित्यं हि स्थितो यस्मात् तस्मादतिथिरुच्यते ॥ १०२ ॥


ekarātram tu nivasannatithirbrāhmaṇaḥ smṛtaḥ |
anityaṃ hi sthito yasmāt tasmādatithirucyate
|| 102 ||

ब्राह्मण जर एका रात्रीसाठी राहायला आला असेल तरच तो अतिथी समजला जावा. जास्त काळ (नित्य) न राहिल्याने त्या व्यक्तींना अतिथी म्हटले जाते. ॥ १०२ ॥

नैकग्रामीणमतिथिं विप्रं साङ्गतिकं तथा ।
उपस्थितं गृहे विद्याद् भार्या यत्राग्नयोऽपि वा ॥ १०३ ॥

naikagrāmīṇamatithiṃ vipraṃ sāṅgatikaṃ tathā |
upasthitaṃ gṛhe vidyād bhāryā yatrāgnayo’pi vā
|| 103 ||

एकाच गावात राहणारा, तुमच्याबरोबर आयुष्य जगणारा (मित्रभाव, स्नेहभाव ठेवणारा) ब्राह्मण अतिथी मानला जावू नये. तसेच स्त्री आणि अग्निहोत्री यांना देखील अतिथी मानले जावू नये. ॥ १०३ ॥

उपासते ये गृहस्थाः परपाकमबुद्धयः ।
तेन ते प्रेत्य पशुतां व्रजन्त्यन्नादिदायिनः ॥ १०४ ॥


upāsate ye gṛhasthāḥ parapākamabuddhayaḥ |
tena te pretya paśutāṃ vrajantyannādidāyinaḥ
|| 104 ||

जो मूर्ख मनुष्य एखाद्या गृहस्थाकडे जेवणाच्या आशेने बसून राहातो, तो अतिथी नव्हे. अशा प्रकारे अन्नाच्या लोभाने त्या घरी थांबून राहणारा माणूस, पुढच्या जन्मी देणाऱ्याच्या घरी पाळीव प्राण्याच्या रूपात जन्म घेतो. ॥ १०४ ॥
(सगळ्या गोष्टींचा शब्दशः अर्थ घेणाऱ्यांना या श्लोकांची उकल होणं कठीण आहे. पण इथे भगवान मनु यांनी लोभी माणसांना सावधान करण्यासाठी शिक्षा सांगितलेली आहे. कधी कधी भीती दाखवल्याशिवाय माणूस योग्य मार्गावर चालत नाही.)

अप्रणोद्योऽतिथिः सायं सूर्यौढो गृहमेधिना ।
काले प्राप्तस्त्वकाले वा नास्यानश्नन् गृहे वसेत् ॥ १०५ ॥


apraṇodyo’tithiḥ sāyaṃ sūryauḍho gṛhamedhinā |
kāle prāptastvakāle vā nāsyānaśnan gṛhe vaset
|| 105 ||

एखादा अतिथी सूर्यास्तानंतर आला किंवा, कुठल्याही समयी वा असमयी आला तरीही त्याला आपल्या घरी उपाशी ठेवू नये! ॥ १०५ ॥
(इतके उदात्त विचार असणारे ग्रंथ विरळा आहेत फक्त वाचले पाहिजेत आणि कालानुरूप अवलंबले पाहिजेत. तसेच अतिथीला उपाशी पोटी ठेवू न देण्याची परंपरा भारतात फार जुनी आहे. हीच सनातन संस्कृती आहे!)

न वै स्वयं तदश्नीयादतिथिं यन्न भोजयेत् ।
धन्यं यशस्यमायुष्यं स्वर्ग्यं वाऽतिथिपूजनम् ॥ १०६ ॥

na vai svayaṃ tadaśnīyādatithiṃ yanna bhojayet |
dhanyaṃ yaśasyamāyuṣyaṃ svargyaṃ vā’tithipūjanam
|| 106 ||

जे अन्न अतिथीला दिलेले नाही ते अन्न स्वतः (घरमालकाने) खावू नये. (थोडक्यात जे अतिथीला तेच स्वतःला, भेदभाव करू नये!) अतिथीचा योग्य आदर सत्कार (आदरातिथ्य) केल्याने धन, यश, उत्तम आयुष्य आणि शेवटी स्वर्ग प्राप्त होतो.
(मनुस्मृति वर अनेकदा भेदभावाचे आरोप होतात पण हे श्लोक वाचल्यावर काय वाटतं ते नक्की कळवा)

पुढील एका श्लोकामध्ये ब्राह्मणासाठी दिलेली शिकवण वाचल्यावर लक्षात येते की जन्माने ब्राह्मण्य सिद्ध होत नाही ते आचरणात असावे लागते. ब्राह्मणाचे कर्तव्य अत्यंत कठोर आहे आणि त्याला अहं भावाने स्पर्श देखील करता उपयोगी नाही. खालील श्लोक पाहा.

न भोजनार्थं स्वे विप्रः कुलगोत्रे निवेदयेत् ।
भोजनार्थं हि ते शंसन् वान्ताशीत्युच्यते बुधैः ॥ १०९ ॥


na bhojanārthaṃ sve vipraḥ kulagotre nivedayet |
bhojanārthaṃ hi te śaṃsan vāntāśītyucyate budhaiḥ || 109 ||

केवळ अन्नाच्या लोभाने ब्राह्मणाने आपले कुल आणि गोत्र यांची वाच्यता करू नये (कारण यातून त्याचा अहंभाव दिसून येतो). अन्नासाठी स्वतःच्या कुल आणि गोत्रांची जाहिरात करणाऱ्या ब्राह्मणाला, सुशिक्षित लोक, वान्ताशी म्हणजे उलटी झालेले खाणारा मानतात.
(केवळ अन्नासाठी आपल्या ब्राह्मण्याची जाहिरात करणाऱ्यांना दिलेली ही सक्त ताकीद आहे. ब्राह्मण्य सोपे नाही!)

न ब्राह्मणस्य त्वतिथिर्गृहे राजन्य उच्यते ।
वैश्यशूद्रौ सखा चैव ज्ञातयो गुरुरेव च ॥ ११० ॥
यदि त्वतिथिधर्मेण क्षत्रियो गृहमाव्रजेत् ।
भुक्तवत्सु च विप्रेषु कामं तमपि भोजयेत् ॥ १११ ॥
वैश्यशूद्रावपि प्राप्तौ कुटुम्बेऽतिथिधर्मिणौ ।
भोजयेत् सह भृत्यैस्तावानृशंस्यं प्रयोजयन् ॥ ११२ ॥
इतरानपि सख्यादीन् सम्प्रीत्या गृहमागतान् ।
प्रकृत्यान्नं यथाशक्ति भोजयेत् सह भार्यया ॥ ११३ ॥


na brāhmaṇasya tvatithirgṛhe rājanya ucyate |
vaiśyaśūdrau sakhā caiva jñātayo gurureva ca
|| 110 ||
yadi tvatithidharmeṇa kṣatriyo gṛhamāvrajet |
bhuktavatsu ca vipreṣu kāmaṃ tamapi bhojayet
 || 111 ||
vaiśyaśūdrāvapi prāptau kuṭumbe’tithidharmiṇau |
bhojayet saha bhṛtyaistāvānṛśaṃsyaṃ prayojayan || 112 ||
itarānapi sakhyādīn samprītyā gṛhamāgatān |
prakṛtyānnaṃ yathāśakti bhojayet saha bhāryayā || 113 ||

ब्राह्मणाच्या घरी क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मित्र आणि गुरू हे कधीही अतिथी मानले जात नाहीत. (आमचे आकलन हे सांगते की, ब्राह्मणाचे घर सांसारिक आसक्तीने भरलेले नसल्याने सगळे विश्व त्याचे घर असते. अशा वेळी त्याच्या घरी कोण अतिथी आणि कोण घरचा? सगळेच घरचे आहेत!) घरी कोणीही आले तरीही सगळ्यांना उत्तम प्रकारे बनवलेले अन्न खायला देऊन संतुष्ट करावे. जो कोणी घरी येईल त्याचे आपल्या भार्येसह आदरातिथ्य करावे आणि त्यांना भोजन द्यावे. हे ब्राह्मणाचे आदरातिथ्य कर्तव्य आहे!

मनुस्मृति मधील पुढील श्लोकात तर उदात्त विचारांची एक वेगळीच उंची गाठलेली आहे. यात स्त्रियांविषयी असलेले काही गैरसमज दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

सुवासिनीः कुमारीश्च रोगिणो गर्भिणीः स्त्रियः ।
अतिथिभ्योऽग्र एवैतान् भोजयेदविचारयन् ॥ ११४ ॥


suvāsinīḥ kumārīśca rogiṇo garbhiṇīḥ striyaḥ |
atithibhyo’gra evaitān bhojayedavicārayan || 114 ||

सुवासिनी, कुमारी, रोगी स्त्री, गरोदर स्त्री आणि कोणीही स्त्री यांना निःसंदेह (कुठलाही विचार न करता) अतिथी मानून त्यांचे आदरातिथ्य करावे.

अदत्त्वा तु य एतेभ्यः पूर्वं भुङ्क्तेऽविचक्षणः ।
स भुञ्जानो न जानाति श्वगृध्रैर्जग्धिमात्मनः ॥ ११५ ॥


adattvā tu ya etebhyaḥ pūrvaṃ bhuṅkte’vicakṣaṇaḥ |
sa bhuñjāno na jānāti śvagṛdhrairjagdhimātmanaḥ || 115 ||

वरील श्लोकात सांगितलेल्या अतिथी लोकांना खायला द्यायच्या आधीच स्वतः अन्न खाणाऱ्याला मरणानंतर प्राणी आणि गिधाडे खातात. (पुन्हा एकदा सांगू इच्छितो की माणसाला योग्य मार्गावर आणण्यासाठी भीती दाखवावी लागते)

भुक्तवत्स्वथ विप्रेषु स्वेषु भृत्येषु चैव हि ।
भुञ्जीयातां ततः पश्चादवशिष्टं तु दम्पती ॥ ११६ ॥

bhuktavatsvatha vipreṣu sveṣu bhṛtyeṣu caiva hi |
bhuñjīyātāṃ tataḥ paścādavaśiṣṭaṃ tu dampatī || 116 ||

विप्र, अतिथी आणि त्यांच्याकडे आलेल्या लोकांचे तसेच घरी काम करणाऱ्या लोकांचे उत्तमरीत्या भोजन झाल्यावरच गृहस्थाने आपल्या पत्नीसह (दम्पती) अन्न ग्रहण करावे.

मनुस्मृति ग्रंथाबद्दल कुणाचे काय समज अथवा गैरसमज आहेत देव जाणे. बऱ्याचदा वाचन न केल्यामुळे अनेक गैरसमज पसरलेले दिसतात. वरील भाषांतराने श्लोकांमधून मनुस्मृति मध्ये नमूद केलेले आदरातिथ्य आणि अतिथी यांचे विवेचन समजायला मदत होईल असा आमचा विश्वास आहे. हा उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा हा विश्वास ठेवून हा ब्लॉग समाप्त करतो.


मनुस्मृति वरील अधिक ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.

Loading

Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

One thought on “मनुस्मृति – आदरातिथ्य आणि अतिथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *