कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली
झूंबरी निळ्या दीपांत ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.
हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान,
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय ते?- गौर नितळ तव कंठी –
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.
साधता विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसता होसि कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
“का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने?”
त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग-
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.
“मी देह विकुनिया मागून घेते मोल,
जगविते प्राण हे ओपुनिया ‘अनमोल’,
रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र देही तिळाएवढी जागा.
शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम
भांगेच्या पेरुनी तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच ग वनमाली
लाविते पान…तो निघून गेला खाली
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव,
पुसलेहि नाही मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
‘मम प्रीती आहे जडली तुजवर राणी!’
नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार;
हासून म्हणाल्ये, ‘दाम वाढवा थोडा…
या पुन्हा पान घ्या…’ निघून गेला वेडा!
राहिले चुन्याचे बोट, थांबला हात,
जाणिली नाहि मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडिते अंतरि आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?
तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्ये बसले परि रतिक्लांत,
वळुनी न पाहता, कापित अंधाराला
तो तारा तुटतो – तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा ‘जोगिया’ रंगे.”
श्रेष्ठ कवी ग दि माडगूळकर यांची जोगिया ही एक दीर्घ कविता आहे. माझ्या मते वर्षा या मात्रावृत्तातील (२१ मात्रा) आहे.
जोगिया हा भैरव थाटातील एक राग आहे. योगी चा अपभ्रंश म्हणजे जोगी किंवा बोली भाषेत जोगिया. हा राग भैरव थाटातील असल्यामुळे या रागात एक प्रकारची गंभीरता आहेच पण एखाद्या योग्याचे वैराग्य देखील आहे. या रागातील रचना ऐकताना, एक प्रकारच्या एकटेपणाची आणि पोकळीची जाणीव होते. जोगिया रागातील ठुमरी, गझला प्रसिद्ध आहेत. पण मी हे का सांगत आहे? समजेल.. त्या आधी एक सूचना, मी सरळसोट रसग्रहण करणाऱ्यांपैकी नाही त्यामुळे कडव्यांच्या क्रम माझ्या रसग्रहणाच्या प्रक्रियेत मी महत्वाचा मानत असलो तरीही त्याचे विवेचन करताना त्याचे पालन करेन असं नाही!
ही कविता एका वारांगनेची कथा किंवा व्यथा आहे. हा एक दिवस आहे जेव्हा या कवितेच्या नायिकेला एका तरुणाची आठवण येते, कारण याच दिवशी त्या सावळ्या वर्णाच्या तरुणाने या नायिकेला त्याला तिच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमाच्या भावनांबद्दल सांगितले होते. त्या तरुणाने नायिकेला सरळसरळ जोडीदार बनवण्याची मनीषा व्यक्त केली होती. तो तरुण कदाचित दैहिक गरजांसाठी या वारांगनेकडे पहिल्यांदाच आलेला होता. याचा अंदाज
“बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी”
या वाक्यावरून वरून येतो. कारण, पहिल्याच भेटीत
“मम प्रीती आहे जडली तुजवर राणी!”
हे असं म्हणणं जरा अवघड वाटतं.
पण माझा अंदाज आहे की हा तरुण या नायिकेचे नाच गाणे ऐकण्यासाठी आधी येऊन गेला असावा.
“शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम
भांगेच्या पेरुनी तुळस परतला श्याम”
तर ही कविता म्हणजे नायिकेला या विवक्षित दिवशी येणारी त्या तरुणाची आठवण! पण ही आठवण दुःखदायक आहे कारण, नायिकेला त्या तरुणाचे खऱ्या मनाने केलेले प्रेम समजत नाही. तरुण जेव्हा प्रेम प्रकट करतो तेव्हा ती गर्वाने
” दाम वाढवा थोडा…
या पुन्हा पान घ्या…”
म्हणते. माझ्या मते, तिचे असे विचारणे हेच तिच्या दुःखाचे मूळ आहे. शेवटी आपल्या प्रेमाला पैशात तोलले जात आहे हे पाहून, तो तरुण काहीही न बोलता तसाच निघून जातो. ती तशीच बसून राहते, त्याला दूर जाताना बघत. आजचा दिवसही असाच काहीसा गेला. नायिका आपल्या जागेवर (शैय्येवर?) अंग टाकून पडलेली आहे आणि तो दिवस आठवत आहे. तिथी तीच असली तरी, त्या दिवशी या वेळी तिची आणि तरुणाची दैहिक देवाणघेवाण झालेली होती आणि त्यानंतर ती शैय्येवर पडलेली होती; जेव्हा तरुणाने प्रेमाचा विषय छेडला.
“तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्ये बसले परि रतिक्लांत, “
रतिक्लांत म्हणजे संभोगश्रमाने (स्त्रीला) आलेला थकवा (रति म्हणजे कामदेवाची पत्नी)
पुढे कधीही तो तरुण नायिकेला भेटायला येत नाही आणि नायिकाही तरुणाला शोधू शकत नाही कारण तिने त्या तरुणाला त्याचे नाव देखील विचारले नव्हते.
“पुन:पुन्हा धुंडिते अंतरि आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?”
तो तरुण निघून गेल्यावर नायिकेला तिने काय गमावलं आहे? याची जाणीव होते. शेवटी ती एकटी पडते.. कायमसाठी! आता असे कितीही लोक (गिऱ्हाईक?) आले तरीही नायिका त्या व्यक्तीमध्ये भावनिकरित्या गुंतू शकणार नाही. तिला एक संधी मिळालेली होती, तिच्या विश्वातून बाहेर पडून एक सामान्य आयुष्य जगण्याची, व्यापारापेक्षा प्रेमाची देवाणघेवाण करण्याची, एक उपभोगाची वस्तू न राहता एक जिवंत माणूस होण्याची. पण, तिने ती गमावली. आता तिच्या जगात उरलेला आहे तो एकटेपणा, त्या तरुणाच्या विरहाने तिच्या हृदयात निर्माण केलेली पोकळी. म्हणून तिची ही विरक्ती, म्हणून हा राग जोगिया! आणि म्हणून या दिवशी नायिका सगळ्यांपासून दूर राहते, एकटी राहते, त्या तरुणाच्या आठवणीत राहते, एखादे व्रत घेतल्यासारखी.. हे खालील पंक्तींवरून समजते.
“त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे”
आता थोडं अजून जोगिया रागाबद्दल. जोगिया या रागाचा काळ ब्राह्म मुहुर्त आहे. ही कविता सुरुवातीपासून वाचली तर गदिमांनी जवळजवळ एखाद्या कथेची पार्श्वभूमी आणि नेपथ्य निर्माण केलेले आहे..
“कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली”
अर्थातच ही एका वारांगनेची म्हणजेच नायिकेची कोठी आहे. रात्रभर नायिका नाचत राहिली, गात राहिली आणि आता दिवस उजाडणार त्या दरम्यान सर्व रसिकगण निघून गेलेले आहेत. जे लोक दैहिक गरजेसाठी तिच्याकडे आलेले होते त्यांनाही तिने नकार देऊन परत पाठवले.
“थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.”
रंगमहाली आता ती एकटीच आहे. नाचगाणे झाल्यानंतर ती दमलेली आहे. पैंजण, सतार बाजूला ठेवून आणि स्वतःच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करून ती आठवणीत गुंग झालेली आहे. तिच्या डोळ्यात अश्रु आहेत आणि आरसा तिला विचारतोय
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
“का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने?”
आणि इथून पुढे तिच्या व्यथेची सुरुवात होते.
हा झाला कवितेकडे त्रयस्थपणे पाहिल्यावर मिळणारा रसास्वाद…
आता थोडं आडवळणावर जाऊन पाहूया काय काय सापडतं ते!
मुळात ही कविता खरं तर एक गोष्ट किंवा गोष्टीतला प्रवेश असल्यासारखी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या कवितेला स्पष्ट सुरुवात, मध्य आणि शेवट आहे. नायक आहे, नायिका आहे. प्रेम आहे विरह आहे!
पण एक गोष्ट जी लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, वारांगनांचे आयुष्य सामान्य नसते, किंबहुना ते सामान्य होवूच शकत नाही. सतत देहाचा बाजार मांडून बसणाऱ्या जगात त्या जगत असतात. त्यामुळे त्यांचे भावनिक आधार, आयुष्याच्या व सुखाच्या व्याख्या वेगळ्या असतात कारण, त्यांचे अनुभव वेगळे असतात. माणसाची काळोखी बाजू लख्खपणे बघणारी वारांगना, आयुष्यातील प्रकाश आणि रंग यांना जवळजवळ विसरून गेलेली असते. तिच्या जवळ येणार प्रत्येक पुरुष ‘काही पैसे देऊन आपण हा देह विकत घेतलेला आहे’ या भावनेने येतो. कैक पुरुषांनी तिला कैक वादे केलेले असतात, कित्येक वेळेला तिने भावनेच्या भरात स्वतःच्या मनाला जखमी करून घेतलेलं असतं. कित्येक वेळेला पुरुषांनी ‘तुला राणी बनवतो’ वगैरे वल्गना केल्या असतील आणि त्या विरल्या देखील असतील. अशा परिस्थितीत जर कोणी खरोखरच शुद्ध प्रेमाची भावना घेऊन आला तर ती त्याला कसं ओळखणार? तेच या नायिकेचं झालं.
पण नायिकेने या दुःखात कायमचे पडून राहण्यात देखील काही अर्थ नसतो, शेवटी पोटाची खळगी देखील भरायची असते! त्यामुळे तो एक दिवस ती त्याच्यासाठी म्हणून ठेवते. जेव्हा मनोमन का होईना पण ती फक्त त्याची असते. हे बंध शब्दात सांगण्याजोगे नाहीत. ज्यांनी कधी प्रेम केले असेल त्यांना लवकर समजेल. त्या आठवणींच्या पोकळीत ती गुणगुणते, जोगिया रागाच्या सूरांसारखी.
आणखी एक थोडा वेगळा संदर्भ या कवितेत येतो तो म्हणजे कृष्णाचा! खालील कडवे पहा.
शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम
भांगेच्या पेरुनी तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच ग वनमाली
लाविते पान…तो निघून गेला खाली
वनमाली किंवा वनमाळी म्हणजे कृष्ण. हा एक प्रश्न मला पडला की गदिमांनी कृष्णाचा संदर्भ का घेतला असावा? तुळस कुठून आली? मग त्याचे उत्तर आधीच्या कडव्यातील (मी आधीच कल्पना दिलेली आहे जा क्रमाच्या न मानण्याबद्दल!) खालील पंक्तीत मिळाले
“रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र देही तिळाएवढी जागा.”
नायिका स्वतःला अपवित्र मानत आहे. कारण समाजाच्या नैतिकतेच्या व्याख्येनुसार असंच मानलं गेलेलं आहे आणि जे नायिकेला देखील मान्य आहे किंवा त्याची जाणीव आहे. आता यात कृष्ण अशा कारणाने येतो की, कृष्णाने १६१०० स्त्रियांशी विवाह केला.
आख्यायिका अशी आहे की, या स्त्रिया नरकासुराने पळवून आणलेल्या होत्या आणि परपुरुषस्पर्श झाल्याने समाजाने त्यांना अपवित्र घोषित केलं होतं, त्यांना कोणीही स्वीकारायला धजावत नव्हतं. पूर्वीच्या काळी विवाहाशिवाय स्त्रीला सद्गती नाही असे मानले जायचे. तेव्हा या स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी भगवंताने या सगळ्यांशी विवाह केला.
कुठे ना कुठे हा तरुण देखील या वारांगनेला लोकनिंदेपासून वाचवण्यासाठी आलेला होता असं नायिकेला वाटत आहे असं मला वाटतं. कारण हा तरुण जणू तिच्या कोठीसारख्या अपवित्र जागेत देखील तुळशीसारखे पवित्र रोप घेऊन आलेला होता.
आता अजून थोडं खोलात गेलं तर, तुळस म्हणजे राधेचं प्रतीक आणि राधा म्हणजे कृष्णावरचं विशुद्ध आणि निष्काम प्रेम! हे पवित्र आणि निर्लेप प्रेम घेऊन हा तरुण नायिकेकडे आलेला होता. कृष्णाला निराश करून परत पाठवल्यावर कुणालाही दुःख होईल, त्यातून तो जर आपणहून आलेला असेल तर जास्तच! तेच दुःख नायिकेला झालेले आहे. शेवटी करुणेने ती स्वतःशीच गुणगुणते
“त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;”
जणू ती म्हणत आहे की “किती वेडा होता तो तरुण? आणि मी ही त्याच्या वेड्या प्रेमात वेडी होऊन हा विडा त्याच्या आठवणीत त्याच्यासाठी बनवते आहे!”
आता थोडं अजून आडवळणाला जातो..
आणखीन एक छोटा मुद्दा म्हणजे विडा. या कवितेत विड्याचा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. भारतीय परंपरेत विडा म्हणजे टपरीवर विकले जाणारे पान नव्हे तर दोन स्नेहींनी एकमेकांना दिलेला कधी आदराचा तर कधी प्रेमाचा नजराणा असतो. देवी लक्ष्मी विष्णूला जो विडा बनवून देत असे त्याला पुराणांमध्ये आणि कथांमध्ये गोविंद विडा म्हटलेलं आहे! कृष्णाचा विषय निघाला म्हणून हा मुद्दा सुचला इतकंच पण. कवितेतील नायिकेने जर त्या तरुणाची तुलना कृष्णाशी केली आहे तर तिने स्वतःला कृष्णाची त्याच्यासाठी हा गोविंद विडा बनवला नसेल कशावरून?
जाता जाता एक गोष्ट जी थोडी नंतर लक्षात आली ती म्हणजे, कविता वाचताना जवळजवळ संपूर्ण वेळ जी काही चित्रे डोळ्यासमोर येत होती, जागा, रंग आणि लाइटिंग डोळ्यासमोर येत होती ती “पाकिजा” मधली होती. तुमच्याही मनात त्या तबल्याचा ठेका आणि पैंजणांचा आवाज घुमायला लागला ना? नकळत (subconsciously) माझ्या मनात पाकिजाची चित्रे उमटत होती. आणि पाकिजा म्हटलं की केवळ दोन शब्द सुचतात ‘चलते चलते’
तर अशी ही गदिमांची एक अद्वितीय रचना “जोगिया”. एका जागी स्थिर असूनही निरनिराळ्या भावनांच्या गुंत्यातून घेऊन जाणारी, वरवर एक विरहकथा, पण आतून एका स्त्रीच्या भावनांचे अनेक पटल उलगडत जाणारी ही कविता.
One thought on “जोगिया”