झेन गुरू बांकेई यांच्या ध्यानसाधनेच्या मठात जपानमधील अनेक झेन पंथाचे अनेक शिष्य आणि पालन करणारे सामील होत असत. एकदा अशा मेळाव्यात बरेच जण सामील झाले होते. एक शिष्य चोरी करताना पकडला गेला. इतर शिष्य, चोरी करणाऱ्या शिष्याला मठातून काढून टाकण्यासाठी तक्रार घेऊन बांकेईंकडे गेले. पण बांकेई गुरूंनी त्या तक्रारीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं.
पण पुन्हा एकदा तोच शिष्य चोरी करताना पकडला गेला. आता मात्र इतर शिष्य फार चिडले आणि पुन्हा एकदा त्या चोर शिष्याची तक्रार घेऊन गुरू बांकेईंकडे गेले. पण बांकेई गुरूंनी पुन्हा एकदा तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. आता मात्र शिष्यगण आणखीन चिडले आणि त्यांनी एक आवेदन दिलं की तुम्ही जर या चोर शिष्याला मठातून काढून टाकलं नाही तर आम्ही हा मठ सोडून निघून जाऊ!
संध्याकाळी बांकेई गुरू, तक्रार घेऊन आलेले सगळे शिष्य आणि चोर शिष्याला समोर घेऊन बसतात. तक्रार घेऊन आलेल्या शिष्यांना उद्देशून गुरू म्हणतात
“प्रिय शिष्यांनो तुम्ही सगळे सुज्ञ आहात. तुम्हाला चूक आणि बरोबर काय आहे हे समजतं”
आणि चोर शिष्याकडे बघून म्हणतात
“पण या बिचाऱ्याला अजून चूक काय आणि बरोबर काय हे समजत नाही. जर मी याला चूक काय आणि बरोबर काय हे शिकवणार नाही तर मग कोण शिकवणार?”
पुन्हा इतर शिष्यांकडे बघत
“तुम्हाला जर दुसरीकडे जायचं असेल तर खुशाल जाऊ शकता. पण मी याला माझ्याकडे राहू देणार आहे, तुम्ही गेलात तरीही चालेल.”
गुरू शांतपणे बोलत होते आणि चोर शिष्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं!
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..