एकदा वेगवेगळे धर्म आणि पंथ मानणाऱ्या काही लोकांमध्ये खूप वादावादी झाली. प्रत्येक जण “आमचाच देव खरा आहे आणि आमचीच देवाची व्याख्या खरी आहे” या मतावर ठाम होते. त्यांच्यातला वाद विकोपाला गेला तेव्हा त्यांनी गौतम बुद्धाकडे जायचं ठरवलं.
गौतमाने शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकलं आणि शिष्यांना एक सुंदर हत्ती व चार आंधळ्यांना घेऊन यायला सांगितलं. काही वेळाने गौतमाचे शिष्य एक डौलदार हत्ती आणि चार आंधळ्यांना घेऊन आले.
गौतमाने त्या आंधळ्यांना हत्तीच्या जवळ पण वेगवेगळ्या जागी उभे राहायला सांगितले. एक जण पायाशी, एक कानापाशी, एक पोटापाशी आणि एक शेपटीपाशी आणि विचारलं “मला सांगा हत्ती कसा दिसत असेल?”
पायापाशी जो आंधळा होता तो पायाला हात लावून म्हणतो, हत्ती एखाद्या खांबासारखा दिसत असेल पोटापाशी जो आंधळा होता तो पोटाला हात लावून म्हणतो, हत्ती भिंतीसारखा दिसत असेल. कानापाशी जो आंधळा होता तो कानाला हात लावून म्हणतो, हत्ती एखाद्या कापडासारखा दिसत असेल आणि जो आंधळा शेपटीपाशी उभा होता तो शेपटीला स्पर्श करून म्हणतो, हत्ती एखाद्या दोरखंडासारखा दिसत असेल.
आजुबाजूला जमलेल्या सगळ्यांना उत्तर समजलं पण त्याही उकल झाली नाही आणि थोडी कुजबुज सुरु झाली. गौतमाने डोळे शांतपणे उघडले आणि वाद घालणाऱ्यांना उद्देशून प्रश्न विचारला
“कोणाचं उत्तर योग्य आहे?”
वाद घालणाऱ्यांना आपली चूक समजली. निरुत्तर झालेल्या लोकांना पाहून गौतम सगळ्यांना उद्देशून म्हणाला.
“परमेश्वराचं असंच आहे, आपल्याला जेवढं समजलेलं आहे आपण त्यालाच सत्य मानतो”
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..