एकदा आदी शंकराचार्य आपल्या शिष्यांबरोबर चालत होते. शंकराचार्यांच्या मनात आपल्या शिष्यांच्या विचारांची आणि सत्त्वाची परीक्षा घ्यायचे आले. ते चालले होते त्या रस्त्याच्या कडेला एक ताडीचे दुकान होते. शंकराचार्य काहीही पूर्वसूचना न देता त्या ताडीच्या दुकानात शिरले. त्यांचे शिष्य देखील त्यांच्या मागे दुकानात गेले. शंकराचार्यांनी एक भांडे भरून ताडी प्यायली. त्यांच्या शिष्यांनी सुद्धा एकेक भांडे ताडी प्यायली.
ताडी पिऊन झाल्यावर शंकराचार्य काहीही न बोलता बाहेर पडले आणि पुन्हा रस्त्यावरून चालू लागले. त्यांचे शिष्य देखील मागे चालू लागले. काही वेळाने रस्त्याच्या कडेला एक लोहाराचे दुकान होते. शंकराचार्य लोहाराच्या दुकानात शिरले. त्यांनी वितळते कांस्यपात्र उचलले आणि पिऊ लागले. आता मात्र एकही शिष्य त्यांचे अनुकरण करण्यास पुढे आला नाही! तेव्हा शंकराचार्यांनी शिष्यांना प्रश्न विचारला
“मी ताडी प्यायलो तेव्हा तुम्ही देखील माझ्या मागे ताडी प्यायली. मग आता हे का पीत नाही आहात?”
शिष्य बुचकळ्यात पडले. एका शिष्याने थोडे साहस केले आणि म्हणाला
“गुरुजी तुमच्याकडे दैवी शक्ती आहेत, आमच्याकडे नाहीत.”
शिष्यगण मूक होते. शंकराचार्य स्वतःशीच जरा हसले आणि शिष्यांना उद्देशून म्हणाले
“मला ज्याची भीती होती तेच घडलं. तुम्ही फक्त माझ्या अवगुणांचे अंधानुकरण करता, सद्गुणांचे नाही!”
मोठा करुण प्रसंग होता..