ही कथा आहे महान योगिनी, तत्त्वज्ञानी आणि ऋषिका “गार्गी” ची. गार्गी कायम ज्ञानसंचयात व्यस्त असे. शिकण्याची आणि समजून घेण्याची अत्यंत आवड होती आणि गती देखील होती. तिची किर्ती सर्वदूर पसरलेली होती. एकदा कोणी एक ब्रह्मज्ञानी, एका दूरच्या दुर्गम वनात निवास करत असल्याचे तिला समजले. ज्ञान मिळवण्याच्या आणि त्या ब्रह्मज्ञानींचे दर्शन घेण्याच्या हेतूने ती, त्या वनाच्या दिशेने जावू लागली.
काही काळाने ती त्या ऋषींच्या आश्रमापाशी येऊन पोहोचली. एका शिष्याला, त्याच्या गुरूंना म्हणजेच ब्रह्मज्ञानींना भेटण्याची विनंती करायला सांगितले. तेव्हा तो विद्यार्थी म्हणाला,
“गुरुजी एक संन्यासी आहेत. ते स्त्रीयांना भेटत नाहीत. वर्ज्य मानतात”
“बरं. आता मला तुझ्या गुरूंना भेटायची ईच्छाच राहिलेली नाही”, चेहऱ्यावर स्मित ठेवून, इतकंच उत्तर देऊन गार्गी आल्या वाटेने परत जावू लागली.
शिष्याने घडलेली गोष्ट गुरूंना जावून सांगितली. गुरूंना बहुआश्चर्य आणि कुतुहल वाटलं. ‘माझ्या दर्शनासाठी इतका लांबचा प्रवास करून आलेली ही स्त्री, भेटायचे नाकारल्यावर देखील थोडीही निराश न होता परत कशी निघून जात आहे!?’
गुरुजी धावत आश्रमाबाहेर आले आणि गार्गीला शोधू लागले. शेवटी धावत पळत गार्गीला गाठले. गार्गी शांत होती, चेहऱ्यावर स्मित तसेच होते. गुरुजींनी प्रश्न केला.
“हे ऋषिके, तुला माझी भेट घ्यायची ईच्छा का उरलेली नाही? ज्याच्यासाठी तू इथपर्यंत अली होतीस, ती गोष्ट घडली नसताना देखील तू दुःखी, विचलित किंवा क्रोधीत कशी नाही झालीस? तुझ्या चेहऱ्यावर अजून स्मित कसे?”
गार्गी उत्तरती झाली
“गुरुजी, तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात असे समजले म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी इथपर्यंत आले. पण इथे आल्यावर समजलं की तुम्ही ब्रह्मज्ञानी नाही! मग तुम्हाला भेटून, तुमच्याशी बोलून काय फायदा? म्हणून परत चालले आहे.”
“कशावरून म्हणतेस की मी ब्रह्मज्ञानी नाही?” गुरुजींना राग आला, त्यांनी चढ्या आवाजात प्रश्न केला.
“कारण” गार्गीने उत्तर द्यायला सुरुवात केली “खऱ्या ब्रह्मज्ञानी माणसाला ज्याला ब्रह्म-ज्ञान लाभलेले आहे त्याला, लिंगभेदाचे विस्मरण झाले असले पाहिजे. पण अद्याप तुम्ही लिंगभेद विसरलेले नाही त्यामुळे मी तुम्हाला ब्रह्मज्ञानी म्हणू शकत नाही”
ऊत्तम! छान नेटकी कथा