अनेकांच्या आयुष्यात घडतात तशा अनपेक्षित, दुःखदायी घटना माझ्याही आयुष्यात घडलेल्या आहेत. आज ज्या माणसाशी बोललो तो अचानक हे जग सोडून गेल्याचं कळतं. मग अशा वेळी आपल्याला ‘काळ’ मुळातच समजलेला नाही याची प्रचिती येते. मनात विचार येतो “खरंच कुणाला आपल्याकडे किती वेळ आहे हे माहित असतं का?” काळापुढे आपलं काहीच चालत नाही.. आणि हा विचार सुरु असताना खालील कथा सुचली.
एका गावात एक नित्यानंद नावाचा एक तरुण राहात होता. त्याला ज्ञान संपादन करण्याची खूप इच्छा होती. आणि त्यासाठी चांगला गुरु लाभणं अत्यावश्यक आहे हे त्याला चांगलंच माहित होतं. शोध घेत असताना एका दूरच्या गावात कोणी एक ऋषी आपल्या आश्रमात राहात आहेत हे त्याला समजलं. त्यांचे गुरुकुल आहे, तिथे विद्यार्थी आहेत हे देखील समजलं. “बाकी विद्यार्थ्यांना पदरी घेतलं मग मला का नाही घेणार?” या विचाराने नित्यानंदाच्या मनाचा ठाव घेतला. शेवटी त्या आश्रमात जायचा निर्णय घेतला.
पण नित्यानंदाचे गाव आणि तो आश्रम यांच्यामध्ये अनेक डोंगर, दऱ्या, नद्या, जंगल होते. नित्यानंद घरातून निघाला. संपूर्ण ३ दिवस चालत राहिला. शेवटी आश्रमात पोहोचला! आश्रम गावाच्या बाहेर होता. थकला भागलेला नित्यानंद आश्रमाच्या प्रवेशद्वारातून आत आला. तिथल्या विद्यार्थ्यांनी त्याला गुरुजींची कुटी दाखवली.
नित्यानंद हात जोडून कुटीत आला. गुरुजी ध्यानस्थ होते. शांत मुद्रा, चेहऱ्यावर कोवळे स्मित, डोळे निश्चल आणि मिटलेले. नित्यानंद हात जोडून म्हणाला
“कृपा करा गुरुजी.. मी नित्यानंद, मला तुमच्या आश्रमात जागा द्याल? मला तुमचा शिष्य व्हायची इच्छा आहे?
गुरुजी शांतपणे डोळे उघडतात. नित्यानंदची इच्छा आहेच पण एक पाठ शिकल्याशिवाय त्याला प्रवेश देता येणार नाही हे गुरुजींनी हेरलं. गुरुजी म्हणाले
“नित्यानंद, इथे या बाजूला बस. आत्तापासूनच तुझा अभ्यास सुरु होईल”
नित्यानंद खूप थकलेला होता. खरं तर बोलण्याची देखील त्याच्यात शक्ती नव्हती. तरी भीतभीत तो म्हणाला
“गुरुजी, मी तीन दिवस चालतोय. पोटात काहीच नाही. कोणत्याही क्षणी ग्लानी येईल. आज थोडा विश्राम करून उद्या ब्राह्ममुहूर्तावर सेवेला हजार होता येईल का?
गुरुजी म्हणाले,
“मग खरं तर तू मला शिकवलं पाहिजे!”
नित्यानंदला या वाक्याचा अर्थ समजला नाही. तो बुचकळ्यात पडला. गुरुजींना अर्थातच हे लक्षात आले. ते उद्गारते झाले.
“नित्यानंदा, तुझ्याकडे उद्या पहाटेपर्यंत वेळ आहे हे आधीच समजलेलं आहे. काळाबद्दल एवढे ज्ञान मिळवणं कठीण आहे. जन्म आणि मृत्यु यांचा निश्चित क्षण माहित असणं हे फार मोठे ज्ञान आहे”
नित्यानंदला आपली चूक समजली आणि तो गुरुजींच्या पायावर डोके ठेवून, बाजूला बसला. आणि अध्ययन सुरु झाले!
सुंदर!! ऊत्तम, साध्या भाषेत पण परिणामकारक