आजपर्यंत जितके म्हणून धर्मग्रंथ लिहिले गेले त्यांच्यामध्ये या ना त्या कारणाने भेसळ होत गेली. ज्या त्या पिढीतील लोकांनी आपापल्या मतानुसार श्लोक वाढवले. या भेसळीतून महाभारत देखील सुटलेले नाही मग मनुस्मृति सारखा धर्मग्रंथ याला भेसळीला बळी पडला तर आश्चर्य ते काय? या भेसळीला सोप्या शब्दात “प्रक्षिप्त श्लोक” म्हणजेच बाहेरून आणलेले आणि बेमालूमपणे मिसळलेले श्लोक म्हणतात. प्रक्षेप म्हणजे वरून टाकणे!
आता मनुस्मृति बद्दल सांगायचं झालं तर हिंदू समाजाच्या अज्ञानाचे एक जिवंत उदाहरण म्हणजे त्यांचा मनुस्मृति बद्दल त्यांचा अभ्यास आणि ज्ञान. कोणीही उठावं आणि काहीही लिहावं. मूळ संहिता वाचता लोकांनी ती जाळावी आणि द्वेष करावा. शेवटी अज्ञानी राहून धर्मापासून दूर जावं आणि दुःखी व्हावं. भारतात हेच होत राहिलं आहे. त्यातून “एकं सत् विप्रा..” च्या नावाखाली कोणीही काहीही सांगितलेलं कुठलीही शहानिशा न करता मान्य करण्याची क्षीणबुद्धी निर्माण होते!
बराच अभ्यास आणि वाचन केल्यानंतर माझा स्वतःचा एक सिद्धांत मी निर्माण केलेला आहे जो मी आधीच मांडतो म्हणजे आणखीन भूमिका स्पष्ट करण्याची गरज भासणार नाही.
एखाद्या राज्याचे विघटन हवे असेल तर त्या राज्याच्या राजाची, प्रशासकांची बुद्धी भ्रष्ट करावी आणि एखाद्या समाजाला जर क्षीण व दुर्बल करून त्याचे अस्तित्व धोक्यात आणायचे असेल तर त्या समाजातील स्त्रिया आणि बुद्धिवंत यांची बुद्धी भ्रष्ट करावी!
भारताच्या बाबतीत म्लेंच्छ आणि ब्रिटिशांनी पहिल्याचा अवलंब केला आणि नंतर ब्रिटिशांच्या चाकरीला बसलेल्या लोकांनी दुसऱ्याचा अवलंब केला. असो.. विषय इतिहासाचा आहे, मोठा आहे. पण मुख्य मुद्दा हा की वाचकांनी हा सिद्धांत लक्षात ठेवावा.
ज्या मनुस्मृतिमध्ये
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:।
म्हटलेले आहे त्याच मनुस्मृतिला स्त्रियांवर अन्यायकारक म्हणणे हा केवढा दैवदुर्विलास आहे! केवळ इतकेच नव्हे तर यापुढे जाऊन मी म्हणेन की आपण आपल्या पूर्वजांशी केलेली कृतघ्नता आहे..
असो, आता “मनुस्मृति मध्ये स्त्रियांच्या बाबतीत जे काही सांगितलं आहे” असं जे लोक सांगतात आणि त्यांच्या सांगण्याला मेंढरांप्रमाणे जे लोक सत्य मानतात त्यांच्या मान्यतांना जरा वास्तव, तर्क आणि संदर्भ यांच्या जोरावर तोलून बघू. कारण जिथे तर्क, वास्तव आणि संदर्भ नाही तिथे शुद्ध अज्ञान पसरलेले असते. खरे तर जे मी करत आहे ते सर्वांनी केले पाहिजे. तरच मनुस्मृतिच्या आधारावर आपल्या द्वेषाचे मनोरे रचणाऱ्यांना चपराक बसेल. पण आधी म्हटल्याप्रमाणे हिंदू अज्ञानाच्या मार्गावर असल्यामुळे. हिंदू नसलेलेच बहुदा हिंदूंबद्दल अधिक बोलतात आणि आपण त्याला निर्विवाद सत्य मानतो.
तसे होऊ नये म्हणून हा उहापोह
अकलेच्या कांद्यांनी दिलेले (कु)तर्क
” व्यभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.” (मनुस्मृति, अध्याय ९ वा. श्लोक १९)
“स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात.” [9/14]
” पुरूषाला पाहिल्याबरोबर अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]
” स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचार दोष होत.” [9/13]
” स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात.” [9/18]
आता आपण हा अध्यायच पाहू म्हणजे अज्ञान दूर होईल. अध्याय ९ व्या मधील १३ व्या श्लोकावर नंतर बोलतो आधी याच अध्यायातील श्लोक क्रमांक १४ ते १९ पाहू ज्यातील श्लोक उचलून काही महाधूर्त भ्रम पसरवतात.
नैता रूपं परीक्षन्ते नासां वयसि संस्थितिः ।
सुरूपं वा विरूपं वा पुमानित्येव भुञ्जते ॥ १४ ॥
पौंश्चल्याच्चलचित्ताच्च नैस्नेह्याच्च स्वभावतः ।
रक्षिता यत्नतोऽपीह भर्तृष्वेता विकुर्वते ॥ १५ ॥
एवं स्वभावं ज्ञात्वाऽसां प्रजापतिनिसर्गजम् ।
परमं यत्नमातिष्ठेत् पुरुषो रक्षणं प्रति ॥ १६ ॥
शय्याऽऽसनमलङ्कारं कामं क्रोधमनार्जवम् ।
द्रोहभावं कुचर्यां च स्त्रीभ्यो मनुरकल्पयत् ॥ १७ ॥
नास्ति स्त्रीणां क्रिया मन्त्रैरिति धर्मे व्यवस्थितिः ।
निरिन्द्रिया ह्यमन्त्राश्च स्त्रीभ्यो अनृतमिति स्थितिः ॥ १८ ॥
तथा च श्रुतयो बह्व्यो निगीता निगमेष्वपि ।
स्वालक्षण्यपरीक्षार्थं तासां शृणुत निष्कृतीः ॥ १९ ॥
पहिली गोष्ट
वरील श्लोकांवरून हे निश्चित आहे की यात स्त्रियांबद्दल केवळ त्या स्त्रिया आहेत हे मानून भाष्य केलेले आहे. मुळात मनुस्मृतिच्या निकषांच्या हे विरोधात आहे. कारण मनू महाराज चारित्र्यावर भाष्य करताना लिंगभेद न करता गुण आणि अवगुण, व्यवसाय आणि कर्म यांच्या आधारावर माणसाच्या चारित्र्याची समीक्षा करतात. त्यामुळे शैली नुसार वरील श्लोक मनुस्मृति मधील इतर श्लोकांशी मिळते जुळते नाहीत.
दुसरी गोष्ट
नववा अध्याय स्त्री-पुरुष या “दोघां” साठी मांडलेला आहे. १४व्या श्लोकपर्यंत स्त्री आणि पुरुष दोघांसाठी नियमांचे उच्चारण होते. मात्र १४व्या श्लोकानंतर २४व्या श्लोकपर्यंत केवळ स्त्रियांच्या चारित्र्यावर भाष्य आहे. हे विषयाला धरून नाही. हा विषय विरोध आहे.
तिसरी गोष्ट
१४व्या आणि १५व्या श्लोकात तर स्त्रीला सरळसरळ व्यभिचारी ठरवून मोकळे झालेले आहेत प्रक्षेप कर्ते. पण याला उत्तर खूप सोपे आहे. आणि ते त्याच अध्यायातील खालील श्लोकांमधून सहज मिळेल
प्रजनार्थं महाभागाः पूजार्हा गृहदीप्तयः ।
स्त्रियः श्रियश्च गेहेषु न विशेषोऽस्ति कश्चन ॥ २६ ॥
उत्पादनमपत्यस्य जातस्य परिपालनम् ।
प्रत्यहं लोकयात्रायाः प्रत्यक्षं स्त्री निबन्धनम् ॥ २७ ॥
अपत्यं धर्मकार्याणि शुश्रूषा रतिरुत्तमा ।
दाराऽधीनस्तथा स्वर्गः पितॄणामात्मनश्च ह ॥ २८ ॥
यात मनू स्पष्टपणे सांगतात की जन्म देणारी स्त्री आणि लक्ष्मी यांच्यात किंचितही अंतर नाही. पुरुषाचे एकही कर्म मग ते धार्मिक असो, कौटुंबिक असो नाहीतर सामाजिक असो स्त्रीशिवाय शक्य नाही. जगाचे चलनवलन (गृहस्थ आयुष्य) स्त्रीमुळेच आहे आणि स्त्रीमुळेच मनुष्याला मोक्ष मिळतो आणि तो पितृऋणातून मुक्त होतो.
आता स्त्रीची तुलना एकदा लक्ष्मीशी केल्यानंतर वरील १४ ते १९ या श्लोकांना काय अर्थ उरला हे वाचकांनी ठरवायचं आहे. ही अन्वयार्थाने देखील केलेली भेसळ आहे.
चौथी गोष्ट
ही गोष्ट मनुस्मृतिबद्दल भ्रम पसरवणाऱ्या लोकांच्या लक्षात येणार नाही कारण त्यांनी देखील मनुस्मृति वाचलेली नसते. केवळ सांगोवांगी गोष्टींवर हा खोट्याचा “धंदा” सुरु आहे. याच अध्यायात १९ ते २४ श्लोकांत अक्षरमाला, शारंगी, वसिष्ठ आणि मंदपाल यांचे उल्लेख येतात जे मनू महाराजांच्या नंतर जन्माला आले. आणि या श्लोकांना संदर्भ किंवा पुष्टी देता यावी म्हणून १४ ते १९ श्लोक प्रक्षेपित केले गेले. कारण जो आधी जन्माला आला आहे तो जन्माला न आलेल्या व्यक्तीबद्दल कसे लिहिल? पण हे निर्बुद्ध लोकांना कोण सांगणार? असो..
पाचवी गोष्ट
आतापर्यंत ९ व्या अध्यायातील भेसळ मी समोर आणलेली आहेच. पण तरीही काही शंका असेल तर आणखीन एक उदाहरण देतो ज्याच्या आधारावर काही “पुरोगामी” मनुस्मृतिला स्त्रीविरोधी ठरवून मोकळे झालेले आहेत. तो श्लोक म्हणजे १८ वा श्लोक ज्यात स्त्रियांना शास्त्र, धर्म आणि वेद यांच्या अध्ययनाचा अधिकार नसून त्यांना यांच्या अध्ययनापासून दूर ठेवा असे सांगितलेले आहे.
खरं तर किमान स्त्रियांना तरी यात तथ्य दिसू नये कारण भारतात ऋषिका, आणि योगिनींची फार मोठी परंपरा आहे. हिंदू द्वेषाची झापडं घातल्यावर या गोष्टी सामानात राहात नाहीत म्हणून आठवण करून दिली. ऋग्वेदामध्ये तर काही श्रुती आणि श्लोक स्त्री ऋषिकांच्या तोंडी आहेत. आता हे कसे शक्य झाले? आणि तसे असेल तर वेदांना आधार मानणारे मनू महाराज आजच्या विद्वानांइतके मूर्ख नव्हते हे तर निश्चितपणे सिद्ध होतं.
पुन्हा या श्लोकाकडे वाळू कारण या श्लोकाचा आधार घेऊन “तुम्ही आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवण्याचा धर्म पाळता” वगैरे बाष्कळ बडबड केली जाते.
दुसऱ्या अध्यायाच्या ९व्या श्लोकात मनू महाराज म्हणतात
श्रुतिस्मृत्योदितं धर्ममनुतिष्ठन् हि मानवः ।
इह कीर्तिमवाप्नोति प्रेत्य चानुत्तमं सुखम् ॥ २.९ ॥
मानवाने श्रुति स्मृति यांमध्ये विहित केलेले धर्म – कर्म पालन केल्यास त्याला या लोकांत आणि परलोकात कीर्ती प्राप्त होते.
इथे “मानव” हा शब्द आहे. मानव म्हणजे केवळ पुरुष समजणे मूढपणा ठरेल.
९व्या च अध्यायात ९६ वा श्लोक पाहा
प्रजनार्थं स्त्रियः सृष्टाः सन्तानार्थं च मानवः ।
तस्मात् साधारणो धर्मः श्रुतौ पत्न्या सहोदितः ॥ ९.९६ ॥
यात स्त्री आणि पुरुष यांनी संतानोत्पत्ती करावी आणि तसेच वेदांनी हे अधिकार पत्नी आणि पती दोघांनीही सामान दिलेले आहेत. त्यांनी यांचे पालन करणे गरजेचे आहे.
आता १८व्या श्लोकाचा आधार घेतला तर ९६व्या श्लोकात मनू महाराजांनी सांगितलेला धर्म फोल ठरतो. कारण जिथे स्त्रीला धर्माचे आणि शास्त्राचे ज्ञानच द्यायचे नाही तिथे पालन कसे होणार? त्यामुळे देखील १८व्या श्लोकाला तर्काचा आधार राहात नाही.
तसेच घर चालवायचे असेल तर स्त्रीला अडाणी ठेवून कसे चालेल हा देखील विचार केला गेला पाहिजे.
सहावी गोष्ट
आता आपण ९व्या अध्यायातील १३व्या श्लोकाकडे वळू
पानं दुर्जनसंसर्गः पत्या च विरहोऽटनम् ।
स्वप्नोऽन्यगेहवासश्च नारीसन्दूषणानि षट् ॥ १३ ॥
मद्यपान, दुर्जनांचा संग, पतीपासून दूर राहाणे, दूर कुठेतरी भटकणे, परपुरुषाच्या घरी निवास करणे ही स्त्रियांसाठी सांगितलेली दूषणे आहेत.
आता सारासार विचार करून सांगा यांपैकी कोणती गोष्ट आपल्या कन्येने, आईने, बहिणीने, सुनेने अथवा कोणत्याही उत्तम स्त्रीने केलेली तुम्हाला योग्य वाटते? आणि तसे वाटत असेल तर त्वरित गुरु शोधा!
लोकांचे म्हणणे आहे की वरील सहा गोष्टी सांगून मनू महाराजांनी स्त्रियांवर अन्याय केलेला आहे. खरंच दारू पिऊ नका सांगणे म्हणजे अन्याय आहे? दुर्जनांबरोबर राहू नका सांगणे हा अन्याय आहे? खरंच.. असे करणाऱ्या स्त्रीच्या जागी आपली माता आणि भगिनी पाहा आणि उत्तर द्या.
याच्याही पुढे सांगतो की मनू महाराजांनी जिथे स्त्रियांना कशाने दूषण लागते हे सांगितलेलं आहे त्यापेक्षा कैक कठोर नियम पुरुषांना आणि त्याहूनही कठोर नियम ब्राह्मणांना सांगतिलेले आहेत. एक दोन उदाहरणे देतो म्हणजे या स्त्री – पुरुष वितंडावर पडदा पडेल
आचारः परमो धर्मः श्रुत्योक्तः स्मार्त एव च ।
तस्मादस्मिन् सदा युक्तो नित्यं स्यादात्मवान् द्विजः ॥ १.१०८ ॥
उत्तम आचरण हाच श्रुतींमध्ये उक्त केलेल्या धर्मानुसार परम धर्म आहे त्यामुळे द्विज पुरुषाला जर आत्मशुद्धी हवी असेल तर सदैव उत्तम आचरण केले पाहिजे.
आचाराद् विच्युतो विप्रो न वेदफलमश्नुते ।
आचारेण तु संयुक्तः सम्पूर्णफलभाग् भवेत् ॥ १.१०९ ॥
उत्तम आचरणापासून भ्रष्ट झालेला ब्राह्मण वेदांनी सांगितलेली फलश्रुती प्राप्त करत नाही. याउलट उत्तम आचरण करणाऱ्याला संपूर्ण फलप्राप्ती होते!
देवदत्तां पतिर्भार्यां विन्दते नेच्छयाऽत्मनः ।
तां साध्वीं बिभृयान्नित्यं देवानां प्रियमाचरन् ॥ ९.९५ ॥
पुरुषाला आपली पत्नी म्हणजे देवांनी दिलेले वरदान असते. तो स्वतःच्या इच्छेने ते मिळवत नाही. त्यामुळे अशा साध्वी आणि विश्वासू स्त्रीबरोबर देवांना रुचेल असेच आचरण केले पाहिजे. मनू महाराज पती आणि पत्नी यांमधील परस्पर विश्वास अविरत राहो याची याचना खालील करतात
अन्योन्यस्याव्यभिचारो भवेदामरणान्तिकः ।
एष धर्मः समासेन ज्ञेयः स्त्रीपुंसयोः परः ॥ १.१०१ ॥
असे सांगणाऱ्या मनू महाराजांवर “तुम्ही आम्हाला परपुरुषांबरोबर राहण्याला मज्जाव करून आमच्यावर अन्याय करत आहात” असा आरोप करणे कितपत योग्य आहे?
आशा करतो की या भागाच्या अखेरपर्यंत तुम्हाला मनुस्मृति मधील भेसळ आणि त्या भेसळीचा हिंदूंची आणि विशेषतः स्त्रियांची मने कलुषित करण्याचा डाव समजला असेल.
आता प्रत्येक प्रक्षिप्त श्लोकाचे विश्लेषण करत बसलो तर संबंध ग्रंथ लिहावा लागेल. पण दिशाभ्रम करणारे जे श्लोक आहेत त्यांची प्रक्षिप्तता देत आहे, आणि जिथे जिथे मुद्दाम चुकीचा अनुवाद केलेला आहे तिथे देखील नमूद करत आहे. कारण प्रक्षिप्त श्लोकांना व अर्धवट अनुवादांना आधार मानायला माझी बुद्धी सहमती देत नाही. देव करो तुमच्याही बुद्धीने देखील त्यांना प्रमाण मनू नये.
” लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.” [5/15]
चुकीचा अनुवाद. पूर्ण श्लोक खालीलप्रमाणे
मङ्गलार्थं स्वस्त्ययनं यज्ञश्चासां प्रजापतेः ।
प्रयुज्यते विवाहे तु प्रदानं स्वाम्यकारणम् ॥ ५.१५० ॥
इथे विषय लग्नाचा आणि कन्यादानाचा आहे. मंगल कामानेसाठी स्वस्त्ययन आदींचे पठण करून प्रजापतीच्या आराधना केली जावी आणि मग विवाहात कन्यादान करावे.
कन्यादानाला मनुस्मृति मध्ये श्रेष्ठ दान मानलेले आहे. त्यामुळे असल्या खोट्या अनुवादाला बळी पडू नका.
” पती सदाचारशून्य असो, तो दुसर्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [5/154] – प्रक्षिप्त श्लोक!
” नवर्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते.”[9/46] – प्रक्षिप्त श्लोक!
” सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत.” [2/13] – चुकीचा श्लोक! मूळ श्लोक खालीलप्रमाणे जो स्त्री आणि पुरुष दोघांना लागू आहे
अर्थकामेष्वसक्तानां धर्मज्ञानं विधीयते ।
धर्मं जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः ॥ २.१३ ॥
” माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये.” [2/15] – चुकीचा श्लोक. मूळ श्लोक खालीलप्रमाणे ज्यात धार्मिक विधी कधी करावेत आदी गोष्टींवर चर्चा केलेली आहे.
उदितेऽनुदिते चैव समयाध्युषिते तथा ।
सर्वथा वर्तते यज्ञ इतीयं वैदिकी श्रुतिः ॥ २.१५ ॥
” ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत.” [3/8] – चुकीचा श्लोक
” जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये.” [ 3/11] – प्रक्षिप्त
” नवर्याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये.” [4/43] – अर्धवट आणि संदर्भहीन अनुवाद. प्रक्षिप्त श्लोक. कारण ३.११३, ११६ श्लोकांत मनू महाराज पती पत्नीने एकत्र भोजन करण्यास सांगतात.
” आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये.” [5/47]
” स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.” [5/48]
” पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते.” [5/49]
वरील तिन्ही चुकीचा श्लोक. पण या अर्थाचा श्लोक मनुस्मृति मध्ये जे आलेले आहेत ते स्त्रियांचे रक्षण करण्याच्या पुरुषाच्या धर्माशी आणि कुळाचा गौरव संभाळण्याविषयी संदर्भ घेऊन आलेला आहे. संदर्भहीन अनुवाद म्हणजे मूर्खांचा उद्योगच! आणि विनाकारण स्वैराचाराचे उदात्तीकरण म्हणजे मानसिक आजार आहे.
” पति जरी रागावलेला असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत.” [5/150] – प्रक्षिप्त
” लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.” [5/152] – अर्धवट अनुवाद आणि तो ही प्रक्षिप्त श्लोकाचा
” पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय.” [5/155] – प्रक्षिप्त
” स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.” [5/162] – प्रक्षिप्त
” पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.” [5/168] – प्रक्षिप्त
” स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो.” [5/166] – प्रक्षिप्त
“पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे.” [6/2] – चुकीचा श्लोक
” विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही.” [6/3] – चुकीचा श्लोक
असो.. इतका उहापोह केल्यावर वर नमूद केलेल्या प्रक्षिप्त श्लोकांना किती खरे मानायचे आणि किती नाही हे ज्याच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडून देतो. धर्माचे ज्ञान अधर्मी आणि निधर्मी यांच्याकडून घ्यायचे नसते हा साधा सोपा नियम आहे. गणिताचे ज्ञान तुम्ही इंग्रजीच्या शिक्षकांकडून घ्याल का? नाही ना? आणि समजा बळजबरीने घेतलेच तर त्याचे परिणाम चांगले होणार आहेत का? नाही ना? मग ज्यांना धर्माचे ज्ञान नाही, चिंतन नाही, संदर्भ नाही त्यांच्याकडून आपल्या धर्माबद्दल ज्ञान मिळवण्याची अपेक्षा कशी करता? सुशिक्षित म्हणवून घेताना या गोष्टीचाही विचार करा की कोणीतरी काहीतरी लिहितो आणि आपण ते पसरवतो. हे पाप कर्म आहे कारण याने फक्त अज्ञान आणि भ्रांती पसरेल.
त्याहूनही ज्यांना ज्यांना शंका असेल त्यांनी आपल्या धर्मग्रंथांचे वाचन करा. ते ही नाही जमले तर कोणा शिकलेल्या माणसाला विचारा. नाहीतर असले नास्तिक आणि अधर्मी भोंदू तुमची बुद्धी भ्रष्ट करत राहतील आणि अखेर या समाजाचे देखील पतन होऊन जाईल. ते पतन होऊ न देणे हे आपले कर्तव्य आहे.
मला माहित आहे की इतकी शक्ती खर्च करूनही तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही कारण मी मनुस्मृति नुसती वाचलेली नाही तर अभ्यासलेली देखील आहे. आणि त्यातून सत्यता पडताळायची असेल तर खाली काही लिंक देत आहे योग्य वाटल्यास पडताळून पाहा आणि हे ही लक्षात ठेवा की ज्या निर्बुद्ध लोकांनी मनुस्मृतिवर आरोप केलेले आहेत त्यांनी कुठलेही संदर्भ दिलेले नव्हते! मी देत आहे..
विशुद्ध मनुस्मृति – https://archive.org/details/vishuddha-manusmriti-dr.-surendra-kumar-2023-08-24-t-124608.115/mode/2up?view=theater
Wisdomlib – https://www.wisdomlib.org/hinduism/book/manusmriti-with-the-commentary-of-medhatithi
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
🙏