प्रत्येकाच्या आजूबाजूला किमान एक व्यक्ती तरी असतेच जिला आपला जॉब बोअरिंग वाटत असतो, कंटाळवाणा वाटत असतो. त्या व्यक्तीला जर आपण विचारलं “मग कशाला करतोयस हे काम?” तर ती व्यक्ती कुटुंब, अर्थार्जन इत्यादींचा आधार घेत म्हणते “पर्याय नाही”. अशा वेळेस त्याला काय उत्तर द्यावं किंवा सांगावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. खरं तर, “निष्काम कर्मयोगाचे तत्वज्ञान” अवघ्या जगाला भेट देणाऱ्या समाजाला हा प्रश्न पडता कामा नये. पण, एकंदरीतच आपल्या ग्रंथांबद्दल उदासीनता असल्यामुळे आणि अनेकदा पुरोगामी होण्याच्या नादात शाश्वत सत्य नाकारल्यामुळे असे प्रश्न पडतात. उपनिषदे असो नाहीतर पुराण प्रत्येक ग्रंथात कर्माचे महत्व सांगितलेले आहेच. पण तूर्तास भगवद्गीतेतील काही श्लोक पाहू ज्यात भगवान श्रीकृष्णाने अगदी स्पष्टपणे आणि थोडक्यात असल्या “बोअरिंग कामाबद्दल” बोध दिलेला आहे!
भगवद्गीतेतील १८ व्या अध्यायात (मोक्ष सन्यास योग) श्लोक क्रमांक ७ ते १० आणि त्यांचे अनुवाद खालीलप्रमाणे
नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥१८.७॥
नियत किंवा निर्धारित केलेल्या कर्माचा कोणत्याही मोहापायी (किंवा अज्ञानवश) केलेला त्याग उचित नसतो. अशा त्यागाला तामसी त्याग म्हटले आहे.
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥१८.८॥
आपले कर्म आपल्याला दुःख देईल या विचारात देहाला यातना होतील या भयाने कर्माचा केलेला त्याग राजसी त्याग मानला जातो. अशा त्यागाने त्यागाचे फळ निश्चितच मिळत नाही.
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेअर्जुन ।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥१८.९॥
जे नियत अथवा निर्धारित कर्म करणे कर्तव्य समजून जेव्हा कोणतीही आसक्ती आणि फळाची अपेक्षा न ठेवता केले जाते तेव्हा त्याला सात्विक त्याग म्हणतात.
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥१८.१०॥
(हे पार्थ) अकुशल (हीन दर्जाचे किंवा नावडते) कर्माचा द्वेष करू नकोस आणि कुशल (आवडते किंवा उच्च दर्जाचे) कर्माबद्दल आसक्त होऊ नकोस. जो बुद्धिवान मनुष्य आपल्यात सत्व समाविष्ट करून कर्म करतो तोच खरा त्यागी आहे.
वरील श्लोकांमधून हे तर निश्चित समजले असेल की “एखादे काम करणे आपले कर्तव्य असेल तर त्याबद्दल आसक्ती किंवा द्वेष काहीही मनात न ठेवता, केवळ ते आपले कर्म आहे या विचाराने ते काम केले पाहिजे. आपले कर्म करताना आपल्याला दुःख आणि यातना भोगायला लागतील यांचा विचार मनातून काढून टाकणे गरजेचे आहे तरच शांती आणि त्यागफल प्राप्त होईल. आयुष्यात शांतता हवी असेल तर सात्विक त्याग गरजेचं आहे. नाहीतर माणूस आपल्या निर्धारित कर्मापासून स्वतःला दूर नेतो आणि दुःखाच्या दुष्टचक्रात अडकून बसतो. बुद्धिमान माणसाने काम आवडीचे असो वा नसो केवळ ते आपले कर्म आहे याच विचाराने काम केले पाहिजे. तरच तो उत्तम त्याग ठरेल आणि तेव्हाच तो दुःखातून मुक्त होईल.” असा भगवंताचा संदेश आहे.
आता वरील श्लोक वाचल्यावर ज्यांना “जॉब बोअरिंग वाटतो पण, पर्याय नाही म्हणून करावा लागत आहे” अशा मंडळींना हे सांगणं आपलं कर्तव्य आहे की जॉब “बोअरिंग किंवा एक्सायटींग” नसतो. जॉब हा फक्त जॉब असतो आणि जर तो करणे तुमचे कर्तव्य मानत असाल तर तो मनात कोणतीही शंका कुशंका आणि पलायनवाद न आणता केला तरच मुक्ती मिळेल. नाहीतर रोज उठून “जॉब बोअरिंग आहे” ची अडकलेली टेप वाजवत बसाल आणि काही दिवसांनी लोक टाळू लागतील!
अध्यात्म कंटाळवाणं असतं असा ज्यांचा समज आहे, त्यांनी एकदा या पानावर जाऊन आमचे ब्लॉग नक्की वाचावेत. नक्कीच मतात बदल घडेल 🙂
नेमके आणि मार्मिक लिखाण !
आप धन्य हो प्रभू !!!
धन्यवाद 🙏