विंचू चावला -पार्श्वभूमी
खरं सांगायचं तर सर्वसामान्य मराठी माणसाला संत एकनाथ महाराज आणि त्यांची भारुडे हा अपरिचित विषय नाही. त्यातून “विंचू चावला” हे भारूड तर न माहित असणं अत्यंत विरळाच. पण हा माझा समज दुर्दैवाने दूर झाला, जेव्हा एका तरुणीने सांगितले की तिला हे माहीतच नव्हते की “विंचू चावला” हे एक अध्यात्मिक काव्य आहे. आणि मग लक्षात आलं की, विंचू चावला हे भारूड आणि त्याचा साधारण अर्थ नवीन पिढीला पूर्णपणे माहित नसावा. अर्थात सगळ्यांबद्दल असं नाही म्हणता येणार पण, त्या प्रसंगाने माझा गैरसमज तरी निश्चित दूर केला. त्यामुळे थोडा सोप्या शब्दात या भारुडाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडत आहे.
रिमिक्स आणि बीभत्स गाण्यांच्या जमान्यात या भारूडाचेही विद्रुपीकरण झाले. लोक त्यालाच खरे काव्य समजू लागले. आणि आता आपण या काळात आलेलो आहोत की, लोकांना मूळ काव्याचा विसर पडला आहे. कृपया तुम्ही देखील हा भावार्थ वाचा आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या संत साहित्याबद्दल जर आपल्यालाच आस्था नसेल तर दुसऱ्यांना असण्याचे काहीच कारण उरत नाही.
मूळ काव्य आणि भावार्थ
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥ धृ ॥
विंचू, विंचू चावला म्हणजे काय झालं? इथून सुरुवात करूया. हा विंचू नेहमीचा विंचू नसून काम (कोणत्याही वास्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल हाव निर्माण होणे) आणि क्रोध यांनी उत्पन्न झालेला अधर्मी, विनाशकारी आणि अहंकारी भाव आहे. हे तमस् म्हणजे अंधःकार. अज्ञानाचा आणि अहंकाराचा विनाशकारी अंधःकार. एकदा काम आणि क्रोधाचा विंचू चावला की माणसाला तमाचा घाम येतो, जणू माणूस खरोखरीच विंचू चावल्यासारखा बेभान होतो, विचित्र वागू लागतो, चुकीचे निर्णय घेऊ लागतो आणि शेवटी अधर्माच्या वाटेवर चालू लागतो.
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥ १ ॥
अशा विंचू चावलेल्या मनुष्याला जेव्हा या दंशाची जाणीव होते तेव्हा लक्षात येतं की, या तामसी दोषांमुळे पंचप्राण (पाच प्रकारचे प्राणवायू, याबद्दल अधिक माहिती इथे देणं क्रमप्राप्त ठरणार नाही. पण या ठिकाणी चांगली माहिती दिलेली आहे.) आणि त्यांचा प्रवाह दोषरहित होतो. त्याचा परिणाम फक्त शरीरावरच नव्हे तर माणसाच्या वृत्तीवर, विचारांवर आणि शेवटी आचारांवर देखील होतो. हे प्राणवायू व्याकुळ होतात, जीव किंवा आत्मा (परमेश्वराचा अंश) गुदमरतो. असं वाटू लागतं आता प्राण जावू लागले आहेत. आयुष्य अनिर्बंध मार्गावर जात आहे, भरकटत आहे. पाप आणि अधर्माने बरबटलेले आहे. आणि आता यातून मुक्तता नाही! सर्वांगाचा दाह, हा दाह दोन प्रकारचा असू शकतो काम आणि क्रोधामुळे किंवा या निरुपयामुळे.
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिने ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ॥ २ ॥
या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट संत एकनाथ महाराज सांगतात की, या सगळ्या त्रासाचे मूळ कुठे आहे? तर मनुष्यामध्ये. शेवटी कर्म मनुष्यच करतो. त्यामुळे या रोगाचे मूळ म्हणजे मनुष्य हिटर इंगळी आहे. इंगळी म्हणजे मोठा विंचू. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण, ज्याच्या त्याच्या अवस्थेला ज्याचे त्याचे कर्म जबाबदार असते हे जोपर्यंत मनात ठसवून घेणार नाही तोपर्यंत मनुष्य आपल्या दुःखासाठी नेहमी दुसऱ्याला दोष देण्यात गर्क राहतो. या मनुष्य इंगळीने नांगी मारली म्हणजे आपल्या कर्मावर आणि आपल्या विचारांवर जर मनुष्याचा ताबा राहिला नाही तर त्याची परिणीती दुःखात होणं अगदी स्वाभाविक आहे. हेच महाराज इथे सांगतात.
ह्या विंचवाला उतारा ।
तमो गुण मागे सारा ।
सत्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरा ॥ ३ ॥
आत्तापर्यंत आपण विंचू म्हणजे काय, दाह कशाचा असतो आणि मूळ कुठे आहे हे पाहिलं. पण या सगळ्या दुःखाला आणि अवस्थेला उत्तर काय? जोपर्यंत या रोगाचे निवारण होणार नाही तोपर्यंत माणूस असाच तडफडत राहणार. मग या रोगाला औषध काय? या विंचवाच्या विषाला उतारा काय? तर महाराज सांगतात, तमोगुण मागे सारा, थोडक्यात असा कोणताही विचार आणि कृती जी तुम्हाला अज्ञानाकडे ढकलेल त्यांचा त्याग करा. क्रोध, काम, अहं भाव, लालसा, ईर्षा इत्यादी भाव मनात येत असतील तर त्यांना प्रयत्नपूर्वक टाळा. म्हणजेच तमोगुण मागे सारा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. सत्वगुण अंगाऱ्यासारखा लावा. सत्वगुण म्हणजे सत् उत्पन्न करणारा गन. सत् म्हणजे सत्याचे मूळ. सत्याच्या मार्गावर चाला. ज्ञान मिळवा. थोडक्यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. सतःला पुनःपुन्हा विचारा की ‘जे मी करतोय ते सत्याला आणि धर्माला अनुसरून आहे की नाही. यात माझ्यातले तमोगुण तर डोकावत नाही ना?’ सत्त्वगुण अंगी लावण्याचा आणखीन एक सोपा उपाय म्हणजे स्वतःला हे सतत सांगत राहणे की ‘जी गोष्ट माझी नाही त्याला स्पर्ष करायचा नाही’ मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. जिथे तुमचा अधिकार नाही तिथे तुमचा स्पर्ष नसलाच पाहिजे. एवढं केलं की, इंगळी म्हणजेच हे तमाचे विष झरझर उतरून जाईल.
सत्व उतारा येऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दने ॥ ४ ॥
हा सत्त्व उतारा एकदा घेतला की तमोगुण मागे जाईल. पण तरीही माणसाची वृत्ती अशी असते की तो तमोगुण अधुनमधुन डोकावतोच. त्यालाच माझ्या मते संत एकनाथ महाराज फुणफुण म्हणतात. पण आता या फुणफुणीला उतारा किंवा औषध काय? तर परमेश्वराची भक्ती. कारण दरवेळेस फक्त माणसाचे कर्म उपयोगी नसते, त्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची – कृपेची सुद्धा जोड लागते. त्यामुळे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा म्हणजे ही फुणफुण सुद्धा निघून जाईल!
माझी आशा आहे, की हा भावार्थ तुम्हाला या भारूडाचे रसग्रहण करताना अधिक उपयोगी ठरेल. तसेच आधी म्हटल्याप्रमाणे जर कुणाला या भारुडाचा अर्थ माहित नसेल तर जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. या ब्लॉगवर अधिक अध्यात्मिक साहित्य आणि भावार्थ वाचनासाठी इथे क्लिक करा.