इतिहासाचे पुस्तक असो नाहीतर विचारवंतांचा जमाव असो फ्रेंच राज्यक्रांती म्हटलं की वाचणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या अंगात स्फुरण चढतं. अर्थातच फ्रेंच राज्यक्रांती योग्य होती हे सगळेच पटवून द्यायचा प्रयत्न करतात. स्पर्धा परीक्षा साठी अभ्यास करणारे तर बहुदा या राज्यक्रांतीचा अभ्यास करून करून थकून जातात. फ्रेंच राज्यक्रांती चुकीची होती की बरोबर होती याची कारणे अनेकदा या राज्यक्रांतीच्या पूर्वपीठिकेत सांगितली जातात. मुळात पूर्वपिठीकाच इतकी लांबवली जाते की प्रत्यक्ष क्रांतीच्या दरम्यान आणि नंतर काय घडले हे कधीही विस्ताराने सांगितले जात नाही. मी देखील इतिहासाच्या पुस्तकात प्रथम फ्रेंच राज्यक्रांती बद्दल वाचले तेव्हा मलाही अनेक उदात्त विचारांनी भरते आलेले आणि त्यानंतर “भारत तर लोकशाही देश आहे” हा विचार मनात येऊन त्या राज्यक्रांतीला पुस्तकातच ठेवल्याचे आठवते.
कैक वर्षांनी जेव्हा इतिहास आणि इतिहासाचा अभ्यास याबद्दल शालेय अभ्यासापलीकडचे कुतूहल निर्माण झाले तेव्हा अनेक गोष्टी समजू लागल्या. जगाचा अनुभव घेतल्यानंतर आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा संदर्भ हाताशी धरून घटनांबद्दल विचार करू लागलो. साम्यवाद, समाजवाद वगैरे व्याख्यांच्या गोंडस चेहऱ्यांमागे नक्की काय घडत आलेले आहे याबद्दल वाचनात आले. हे करत असतानाच जॉर्ज ऑरवेल यांचे “Animal Farm” आणि “1984” वाचनात आले. यानंतर मात्र विचार करण्याची दिशाच बदलली.
यातच इतिहासात कोणत्या दिवशी काय घडले हे जाणून घ्यायची उत्सुकता. यातच एकदा फ्रेंच राज्यक्रांती मधील एका महत्वाच्या पात्राच्या मृत्यूविषयी वाचनात आले. त्याचे नाव Georges Danton! आणि नंतर फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणणाऱ्या क्रांतिकारांच्या मृत्यूच्या इतिहासाचा जो धागा हाती लागला तो इतका प्रचंड मोठा असेल असं कधीच वाटलं नव्हतं.
इतिहासाचा अभ्यास केला तर फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये नेते म्हणून ज्या ज्या मोठ्या व्यक्तींची नावे घेतली जातात, त्यांच्यापैकी बहुतांशी लोकांची हत्या त्यांच्याच साथी क्रांतिकारकांनी (fellow revolutionaries) केल्याचे दिसते. हा विरोधाभास अत्यंत विचित्र आहे. याची कारणे आणि त्या काली घडलेल्या घटना फार विचित्र आहेत. सगळ्यांबद्दल इथे सांगणे कठीण आहे. त्यासाठी वेगळी मालिका केली गेली पाहिजे. ज्याचा विचार नक्कीच आहे. पण सगळ्याचा विचार केल्यावर, तात्विकदृष्ट्या या हत्यांचे कारण खालीलप्रमाणे देता येईल,
“एखाद्या व्यवस्थेबाबत असलेला राग आणि उद्रेक जेव्हा अविवेकी हिंसेच्या (अधर्माच्या) मार्गावर पुढे जाऊ लागतो तेव्हा निरपराधांचा भयंकर नरसंहार होतो. तो घडत असताना काही जणांची विवेकबुद्धी जागृत होते आणि त्यांना क्रांतीच्या या अंधाऱ्या बाजूचे विक्राळ आणि कुरूप दर्शन घडते. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की ज्या माणसांसाठी आपण क्रांती घडवून आणली त्यांना आपण हिंसेखेरीज काहीच देऊ शकत नाही. किंबहुना आपल्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला आपण शत्रू मानून त्याची हत्या करण्याएवढी क्षमता आपल्यात आलेली आहे जी फक्त राक्षसी वृत्तीत असते. अशा वेळी त्यांचा अंतरात्मा या क्रांतीच्या मार्गाला बदलण्याची मागणी करू लागतो. अर्थातच ज्यांची विवेकबुद्धी अजूनही रक्ताला आणि सत्तेला चटावलेल्या श्वापदाची झालेली असते, ते क्रांतिकारी अशा लोकांना सौम्य आणि क्रांतीविरोधी ठरवून सत्तेच्या मार्गातील हे काटे क्रूरपणे बाजूला करतात. याची परिणीती अशी होते की कोणी तथाकथित क्रांतीला किंवा त्यांच्या मार्गाला विरोध करत नाही. सामान्य जनता तशीही हिंसा बघून गप्प असते.”

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी हेच घडले. आणि आज ज्यांना आपण त्या तथाकथित क्रांतीचे नेते म्हणतो त्यांना न्यायालयात आपल्या बचावासाठी कुठलीही संधी न देता शिरच्छेदाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिथे सत्तांध झाल्यावर तिला क्रांती म्हणावी की नाही हा ही प्रश्न आहे. आणि क्रांती कुणासाठी घडवून आणली आणि कशासाठी हे देखील बघितले पाहिजे. असो, आपल्या साथी क्रांतिकारकांच्या हाती “हत्या” झालेल्या क्रांतिकारकांची नवे खाली देत आहे. ही यादी तोकडी आहे कारण हजारो निनावी माणसांना ज्यांनी क्रांतीच्या अविवेकी हिंसेला विरोध केला त्यांना क्रूरपणे फासावर लटकवले गेले होते.
- Georges Danton
- Jacques-Pierre Brissot
- Félicité Dupont (Jacques-Pierre Brissot च्या पत्नी)
- Pierre Victurnien Vergniaud
- Maximilien Robespierre
- Augustin Robespierre (Maximilien Robespierre चा भाऊ)
- Georges Couthon
- Jean-Paul Marat
- Charlotte Corday
- Olympe de Gouges (स्त्री समानता आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणारी लेखिका)
- Madame Roland
- Jacques Hébert
- Marie Marguerite Françoise Hébert (Jacques Hébert ची पत्नी, मृत्यूपश्चात यांची मुले अनाथ झाली /केली गेली)
- Camille Desmoulins
- Lucile Desmoulins (Camille Desmoulins ची पत्नी, मुले अनाथ केली गेली)
- Louis Antoine de Saint-Just (याला काही लेखक Angel of Death असे संबोधतात)
ही फक्त १५ नावे आहेत. या विचित्र क्रांतीच्या दरम्यान तथाकथित क्रांतिकारकांनी आपल्याच हजारो साथीदारांना मृत्युदंड दिलेला आहे. इतिहासकारांच्या मते हा आकडा ४० हजारांच्या वर आहे!

अशा वेळी प्रश्न पडतो की खरंच याला क्रांती म्हणावे की नाही? असो, या इतिहासात अनेक विचित्र तथ्य आहेत जी एका मालिकेतूनच सविस्तर सांगितली जाऊ शकतात! पण या ब्लॉगचा शेवट Pierre Victurnien Vergniaud यांनी जमाव-न्यायाच्या विरोधात केलेल्या एका भाषणाचा मजकूर देत आहे. या मजकुरातील विचार कालातीत आहे!
So, citizens, it must be feared that the Revolution, like Saturn, successively devouring its children, will engender, finally, only despotism with the calamities that accompany it.
Pierre Victurnien Vergniaud, (Schama, 714)
नागरिकांनो, ही (अविवेकी आणि हिंसक) क्रांती भीतीदायक आहे, ज्याप्रमाणे शनीने आपल्याच मुलांना भक्ष बनवून त्यांना मारून खाऊन टाकले, त्याचप्रमाणे ही क्रांती देखील पिपासू होईल. आणि अखेर तिच्याकडे फक्त सत्तांधता, हुकूमशाही आणि यांचे भयंकर परिणाम उरतील.
Pierre Victurnien Vergniaud यांची भीती खरी होती, नव्हे रक्ताला आणि सत्तेला चटावलेल्या तथाकथित क्रांतिकारांनी ती खरी करून दाखवली. यात मला हिंदी सिनेमा गंगाजल मधील एक प्रसंग देखील आठवतो ज्यात तेजपूर च्या SP ला देखील जमाव-न्यायाच्या याच काळ्या परिणामांबद्दल बोलताना दाखवले आहे.