आजची लोकशाही.. थोडी पार्श्वभूमी
आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आलेला आहे. अनेक माध्यमांद्वारे लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. बघावं तिकडे लोकशाहीचा उदो उदो सुरु आहे. मी मात्र एका विचाराने त्रस्त आहे. तो मी मांडेनच. पण त्याच्या आधी थोडी पार्श्वभूमी स्पष्ट करणं गरजेचं आहे. सांप्रत काळात लोकशाहीला राज्यव्यवस्थेचा सर्वोत्तम मार्ग असे घोषित केलेले आहे. माझ्याही मते साम्यवाद आणि समाजवादापेक्षा संसदीय लोकशाही बरी आहे. पण, म्हणून या व्यवस्थेला मी सर्वोत्तम म्हणू शकत नाही.
भारतात ब्रिटिश निघून गेल्यानंतर त्यांनी देऊ केलेल्या संसदीय लोकशाहीमध्ये आपल्या देशासाठी योग्य बदल केले गेले आणि तीच व्यवस्था सुरु राहिली. पण हे सगळं करत असताना वर वर स्थिर दिसणाऱ्या व्यवस्थेच्या जमिनीखालून वाहणाऱ्या समाजातील एका अदृष्य विचारझऱ्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. हा विचारझरा परकीय आक्रमकांच्या आगमनापासून सतत वाहत आहे. तो म्हणजे “भारताचा दैदिप्यमान इतिहास”. या दैदिप्यमान इतिहासाचे दाखले देत गेली काही शतके भारतीय माणूस जगत आहे. आजही जगत आहोत. कदाचित यापुढेही जगत राहू.
लोकशाही आणि भारताचा इतिहास
भारताचा इतिहास दैदिप्यमान आहे याबद्दल मला मुळीच शंका नाही, यत्किंचितही नाही. भारत संपूर्ण विश्वाचे ज्ञानपीठ, धर्मपीठ आणि नीतीपीठ आहे. हा इतिहास अगणित थोर, कर्तबगार आणि आदर्श स्त्री – पुरुषांनी भरलेला आहे. भारताला असा हजारो वर्षांचा इतिहास आहे. काही अभ्यासकांचे ऐकाल तर कदाचित लाखो वर्षांचा. अगदी मत्स्यावतारापासून अगदी स्वातंत्र्यसमरापर्यंत या झऱ्याचे प्रवाह येतात. मग प्रश्न हा उद्भवतो की माझ्या त्रस्त असण्याचे कारण काय?
सांगतो. आजच्या लोकशाहीच्या काळात भारताच्या दैदिप्यमान इतिहासाचे दाखले देऊन, भारताला पुन्हा त्या उच्च पातळीवर नेवून ठेवण्याची स्वप्ने दाखवली जात आहेत. पण,
भारताच्या ज्या दैदिप्यमान इतिहासाचे दाखले दिले जात आहेत, त्या काळात कोणत्याही क्षणी आजच्यासारखी लोकशाही नव्हती. बहुतांशी काळात, बहुतांशी राज्यांमध्ये थेट राजशाही होती. राजे राज्य करत होते. ज्या काही नगरराज्यात राजे नव्हते तिथे, एखादी पंचायत भरावी तसे राज्यातले थोर – मोठे लोक मिळून आपला नेता कोण असणार हे ठरवत असत. किंबहुना त्याला तसं सिद्ध करावे लागत असे. न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था धर्मानुसार, परंपरांनुसार चालत असे. त्याकाळची समाजरचना देखील आजच्यापेक्षा खूप वेगळी होती. यावर खूप चर्चा होऊ शकते पण एक प्रातिनिधिक प्रश्न विचारतो म्हणजे तुम्हाला या विचाराचा आवाका समजेल “शिवाजी महाराजांच्या काळात परस्त्रीवर हात टाकणाऱ्याचे हात-पाय कापले जात किंवा हत्तीच्या पायाखाली दिले जाई किंवा कडेलोट केला जाई. आजच्या लोकशाहीत हे शक्य वाटत नाही ना?“
त्यामुळे मी या विचाराने त्रस्त आहे की “जर त्या काळची राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था नसेल तर त्याकाळासारखी कामगिरी किंवा उपलब्धी कशी करता येईल?” मला अजून या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. तुमच्याकडे असेल तर जरूर कळवा!