माझ्या आयुष्यात घडलेली घटना..
एक जण गेल्या ५-७ वर्षांत प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक मालिका व चित्रपट यांचे दाखले देत तावातावाने मुद्दे मांडायचा प्रयत्न करत होता.
त्याला साधा प्रश्न विचारला “आग्र्याच्या सुटकेनंतर महाराजांबरोबर कोण कोण होते आणि त्यांना कोणी कोणी मदत केली?”
तेव्हापासून बिचारा ऑफलाईन आहे!
ऐतिहासिक मालिका आणि चित्रपट यांच्यात दाखवल्या जाणाऱ्या घटना, त्या ज्या पद्धतीने मांडल्या जात आहेत त्यांच्या मागची विचारसरणी, खुंटीवर टांगलेला तर्कशुद्धपणा आणि विनाकारण निर्माण केलेली जातीय दरी. या मुद्द्यांवर अक्षरशः पिसं काढली जाऊ शकतात. हास्यास्पद पातळीवर चित्रपट बनवले जात आहेत. भाषिक पातळीवर आणि पात्र व्यवहार पातळीवर तर बोलूच नये. अनेक बोचणारे मुद्दे आहेत. वेळ आल्यावर नक्की मांडेन. पण मूळ मुद्दा असा की सिनेमाच्या सुरुवातीला “हा ऐतिहासिक दस्तऐवज नाही” हे शब्द लोकांच्या तोंडावर फेकले की सिनेमा बनवणाऱ्यांची जबाबदारी संपते का?
काल्पनिक इतिहासावर आधारित हे सिनेमे समाजात एका विशिष्ट प्रकारची भडकाऊ मानसिकता, एका विशिष्ट समाजाची थट्टा आणि काही प्रसंगी बदनामी याखेरीज काहीही करत नाहीयेत. असो, बोलावं तितकं कमी आहे कारण मुळात अशा सिनेमांना थारा देणारे आमचे मराठी लोक इतिहास अशा कपोलकल्पित कथांतूनच शिकतात. त्यांना कधीही “इतिहास” म्हणजे नक्की काय असतं? पुरावे काय असतात? एखाद्या प्रसंगाची छाननी कुठे आणि कशी करायची? तसेच इतिहासात तथ्य आणि वैयक्तिक मत/निष्कर्ष यांच्यातील फरक कसा ओळखायचा?
हे शिकवलं गेलेलंच नाही. स्वतःच डोकं लावून आपले निष्कर्ष काढणे तर खूपच लांब झालं! यातून फक्त उथळ आणि पूर्वग्रहदूषित विचारांचा तरुण वर्ग निर्माण होतोय ज्याला गाडीमागे स्टिकर लावता येतात, कुणाच्या जातीवरून वाईट साईट बोलता येतं पण एखाद्या प्रसंगाची संदर्भासहित संपूर्ण माहिती दे म्हटलं तर येत नाही. कारण मुळातच त्यांनी इतिहास शिकलेलाच नाही.. शिकलाय तो फक्त इतिहासाचा कल्पनाविलास व त्याच्या आधारे दूषित पूर्वग्रह.
दोष कुणाचा वैगैरे साठी बाहेर बघू नका. स्वतःला विचारा की आपण खरंच इतिहास वाचतो / शिकतो की कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून शहानिशा न करता केवळ राजकीयदृष्ट्या साजेसं आहे म्हणून मेंढरांसारखे त्यांच्या मागे जातोय? बाकी काय बोलणार.. आपण सुज्ञ आहात 🙏
बालः पश्यति लिङ्गं मध्यम बुद्धि र्विचारयति वृत्तम् ।
आगम तत्त्वं तु बुधः परीक्षते सर्वयत्नेन ॥