काही काही गाणी मराठी मनात अगदी खोलवर रुजलेली आहेत. इतकी की गाण्याच्या सुरुवातीचा संगीताचा नुसता एक स्वर जरी ऐकवला तरीही संपूर्ण गाणं मनातल्या मनात आपोआप सुरु होतं एखाद्या रेकॉर्ड प्लेअर सारखं. त्याच मनातल्या ऑल टाईम फेव्हरिट गाण्यांच्या यादीतले एक गाणे म्हणजे “ये रे घना, ये रे घना”! चिं त्र्यं खानोलकर म्हणजेच आरती प्रभू यांचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे ओघवते संगीत आणि आशा ताईंचे सोज्वळ स्वर! हे गाणं म्हणजे नुकत्याच पाऊस पडून गेलेल्या पानावरच्या एखाद्या शीतल झुळुकेसारखं आपल्याकडे येतं. आणि बघता बघता सगळं मन व्यापून टाकतं. तिकडे “ये रे घना, ये रे घना” ऐकताना आपले मन मात्र कुठल्या तरी दूर वाटेवर निघून जातं.
खरं तर ही एक कविता आहे नंतर त्याचे गाणे झाले. अर्थात हे जवळजवळ सगळ्याच क्लासिक गाण्यांबद्दल सांगता येईल. पण औपचारिकता म्हणून का होईना सांगणं गरजेचं आहे. आपल्याला हे गाणं आवडतं. पण ते का आवडतं याबद्दल प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. मी कवी असल्याने प्रथम माझे लक्ष जाते शब्दांकडे. एकदा शब्द मनाला भिडले की निम्याहून अधिक युद्ध जिंकलेच म्हणून समजावं. मग प्रश्न असा पडतो की मला “ये रे घना, ये रे घना” या काव्याचे शब्द का भावले? कित्येक वर्षे मला या प्रश्नाचा निष्कर्ष शब्दात मांडायला अवघड जात होतं. आत्ता कुठे मला त्यातला माझ्या पुरता अर्थ गवसला आहे.
खरं सांगायचं तर “ये रे घना, ये रे घना” या कवितेत मला माझ्यातला कवी दिसतो, कलावंत दिसतो. जगरहाटीत अडकून पडलेला, निरनिराळ्या भौतिक आणि निष्ठुर अपेक्षांमध्ये गुरफटून पडलेला एक मनस्वी कलावंत!
आरती प्रभू यांच्या आयुष्याबद्दल जे काही वाचले ते आणि त्यांच्या कविता यांचा विचार केला तर आरती प्रभूंमध्ये देखील आयुष्याच्या चौकटीत अडकून पडलेला कवी होता. परिस्थिती आणि प्रश्नांनी ग्रासलेला कवी. ज्याला आपल्या मनाप्रमाणे जगता येत नाहीये. जणू प्राणवायूच कमी पडत आहे. मनस्वी कलाकाराला कोणी दुनियादारी मध्ये मान खाली घालून जगायला लावलं की त्याचे मन कोमेजून जाते. तिथून पळून जावंसं वाटत राहातं. पण पळून जाता येत नाही. जबाबदाऱ्या आणि भूक यांच्या भीतीने मनाची पाऊले पुन्हा जगाच्या पिंजऱ्यात येऊन अडकतात.
त्यातून आजूबाजूच्या लोकांना कलावंताच्या कलेचा गंध नसेल किंवा जाणीव नसेल (appreciation) नसेल तर प्रश्नच मिटला. कलावंत स्वतः स्वतःला “हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था” म्हणत सहानुभूती दाखवत बसतो. जगात जगताना चेहऱ्यावर हसू दिसले तरी आतून रडत असतो. तेव्हा त्याच्या मनात येतं “ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना”! हे परमेश्वरा तुझी कृपा माझ्यावर होऊ दे आणि संबंध अस्तित्व त्या कृपेने चिंब होऊन जाऊ दे. सगळं काही धुवून जाऊ दे! तडफडणाऱ्या मनाला थोडा विसावा मिळू दे. थोडा धीर मिळू दे. आणि हे परमेश्वरा, असे करत असताना माझ्या डोळ्यातील आसवांना तुझ्या कृपेशी एकरूप होऊन जाऊ दे आणि माझा जन्म सार्थकी लागू दे! सगळं काही शुद्ध होऊ दे, निर्मळ होऊ दे.
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना
कलावंताच्या ओंजळीतील फुले म्हणजे काय? त्याची कलाकृती किंवा अविष्कार. विशुद्ध कलेच्या गर्भातून जन्म घेणारी कलाकृती फुलासारखी अळुमाळू म्हणजे नाजूक, निर्मळ असते. पण वास्तवाचा आणि कालौघाचा वारा त्याच्या पाकळ्यांना उडवून लावण्याचा, चुरगळण्याचा प्रयत्न करत आहे. कलाकाराच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा असे वाटते की जग आणि जगाच्या व्यापाराला त्या कलेशी काहीही घेणे देणेच नाही! फुलाने आणि मनाने कितीही नको नको केले तरीही वारा एखाद्या श्वापदाप्रमाणे कलेवर धावून येत आहे!
टाकुनिया घरदार, नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना
अशा वेळी कलाकाराचे मन जगाविरुद्ध बंड पुकारते आणि म्हणते, हे जोखड तोडून टाकावे! जगाची बंधने झुगारून द्यावी आणि मुक्त व्हावे. टाकुनिया घर दार नाचणार नाचणार. इथे आरती प्रभूंनी “नाचणार” शब्द दोनदा आणला आहे. मानशास्त्राचा विचार केला तर एखादी गोष्ट स्वतःला ठसवण्यासाठी पुनः पुन्हा उच्चारण केले जाते. जगाला काहीही वाटो मी कलेच्या वाटेवरून हटणार नाही. मी नाचणार! त्यासाठी “ये रे घना” चा धावा करत आहे. या कडव्यात नको नको हे कलाकार नव्हे तर जग म्हणत आहे. जगाचे नियम मोडून कलेच्या वाटेवर जाऊ नकोस हे जग सांगत आहे. पण ज्याप्रमाणे गार्ड मेघ दाटले की मोर प्रतिक्षिप्त क्रियेत नाचतो तसे मन देखील नाचणार, मुक्त होणार, अविष्कार करणार!
नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना
एक क्षण असा येतो जेव्हा कलाकाराचे मन सुद्धा त्याला म्हणते, किती काळ स्वतःला रोखून ठेवणार. नको नको किती म्हणू? अखेर जातीचा कलावंत जेव्हा त्याच्या अंतर्मनात कलेचे पडसाद उमटतात तेव्हा आपोपाप तिच्या दिशेने जाऊ लागतो. जणू दूर कुठेतरी वेणू वाजत आहे आणि गोकुळातील सर्व प्राणी मुग्ध होऊन त्याच्या दिशेने जाऊ लागतात. इथे सोसाट्याचा वारा म्हणजे कलेचा आवेग, अविष्काराचा झंझावात! त्याची ओढ काही निराळीच असते. जी म्हणते जगाला सोड आणि कलेचे रसपान कर! तू कलावंत आहेस हेच तुझे अमृत आहे!
ये रे घना, ये रे घना..!
इतकी अप्रतिम कविता आरती प्रभूंनी आपल्याला नक्षत्रांचे देणे असल्यासारखी दिलेली आहे!
हे रसग्रहण आवडले तर नक्की शेअर करा, तुमचा अभिप्राय कळवा. मराठीतील अभिजात आणि अप्रतिम साहित्यकृती सर्वदूर पसरवूया! आणखीन रसग्रहणांसाठी इथे क्लिक करा.