क्रिकेट आणि आपण
“Caught Out: Crime. Corruption. Cricket” आजच Netflix हा माहितीपट / शोधपट पाहिला आणि अनेक विचार मनात दाटून आले. क्रिकेट.. कोणाही सामान्य भारतीयाप्रमाणे मलाही क्रिकेट आवडायचे. साधारणपणे भारतात क्रिकेट अजिबात न आवडणार्या माणसाकडे आंबा न आवडणार्या माणसासारखे बघितले जायचे. पण तेव्हा तो “खेळ” होता. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजच्या काळात क्रिकेटला निव्वळ खेळ म्हणणं तितकंसं योग्य ठरणार नाही. क्रिकेट हा ब्रिटिशांनी स्थापन केलेला आणि भारतीयांनी तन-मन-धन अर्पून वाढवलेला धर्म! म्हणजे अगदी आत्ता आत्तापर्यंत असंच होतं. माझ्या पिढीतील क्वचितच कोणी असेल ज्याने किंवा जिने कधी आपल्या कपाटात, दारावर, वहीवर कोण्या क्रिकेटपटूचे चित्र लावले नसेल. आम्ही आणि आमच्या आधीचे लोक या क्रिकेटपटूंसाठी जवळजवळ वेडे होतो असेही म्हणायला हरकत नाही.
क्रिकेट आणि मी
साधारण नोव्हेंबर २०१३ नंतर माझे क्रिकेट बघणे कमी झाले आणि तो आलेख आजतागायत न्यूनतम पातळीवर आहे. पण याचे मुख्य कारण म्हणजे मी (अनेक भारतीयांप्रमाणे) ज्याला क्रिकेट या खेळाचा देव म्हणायचो त्या सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती! सचिनविना क्रिकेट ही संकल्पना माझ्या मनाला तेव्हाही पटली नाही आणि आजही मला क्रिकेट सुरू आहे आणि सचिन नाही हे असहनीय आहे. माझी पिढी भाग्यवान जिने सचिन तेंडुलकरला सुरुवातीपासून निवृत्तीपर्यंत पाहिले. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या क्रिडानंदात आम्ही न्हाऊन निघालो. त्यात गांगुली सारखा सर्वोत्तम कर्णधार, अगस्तीसारखा स्थिर द्रविड, शांत संयमी कुंबळे आणि व्ही व्ही एस लक्ष्मण हे बघायला मिळाले.
सचिनने भल्याभल्यांची वाट लावताना बघितलं, १९९६ ची पाकिस्तान बरोबरची semi-final बघायला मिळाली! द्रविड-लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला गुडघे टेकायला लावलेले पाहिले, कुंबळे – श्रीनाथ यांची ती खेळी बघायला मिळाली, Natwest नंतर गांगुलीला शर्ट काढून फिरवताना बघितलं, २०११ चा विश्वकरंडक मिळताना बघायला मिळाला. किती प्रसंग सांगावे आणि किती आठवावे. आयुष्य कमी पडेल. पण तेव्हाही हे सगळं घडत असताना आम्हाला या क्रिकेटची गडद बाजू माहित होती. फक्त जेव्हा या घटना घडल्या तेव्हा आणि काहीसे अननुभवी आणि दुनियादारीपासून लांब होतो त्यामुळे त्यांची खोली समजली नाही. आज इतक्या वर्षांनंतर थोडे फार जग बघितल्यानंतर ते दिवस असे अचानक समोर आल्यावर तर्क किंवा व्याख्येच्या चिमटीत पकडता न येणारे विचार मनात येतात. तसंच काहीसं झालं “Caught Out: Crime. Corruption. Cricket” हा माहितीपट किंवा शोधपट बघून. सगळ्या आठवणी आणि समज समोर उभे राहिले.
Caught Out – एक शोधपट
“Caught Out: Crime. Corruption. Cricket” शोधपट, अनुभवी शोध पत्रकार अनिरुद्ध बहल यांच्या अनुभवकथनातून सुरू होतो. अपघाताने क्रीडाजगताच्या पत्रकारितेत आलेल्या अनिरुद्ध बहल यांना क्रिकेट माहित असले तरीही त्यातील लोकांच्या नजरेपासून दूर असलेल्या गडद विश्वाबद्दल माहिती नव्हती. क्रिकेटसाठी पत्रकारिता करताना त्यांना ज्या गोष्टी दिसल्या त्यांच्यापैकी काही गोष्टी खटकल्या, अनैतिक वाटल्या. क्रिकेटसारख्या उत्साहाने भरलेल्या, glamorous जगाच्या रुपेरी चेहऱ्यामागे सुरू असलेल्या सट्टा व match-fixing चे विषारी प्रवाह दिसले. यांच्याबद्दल गप्प बसणे अयोग्य वाटले आणि योगायोगाने त्यांच्या मदतीला पूर्ण क्रिकेटपटू मनोज प्रभाकर आला. त्याने match-fixing, काही पूर्व खेळाडू व बुकी यांच्या संबंधाबद्दल काही सनसनाटी आरोप आणि खुलासे केले. त्यात “तेहेलका” चे बीज रोवले गेले.
पुढे अनिरुद्ध बहल यांच्या बरोबर मिंटी तेजपाल यांनी मदत करायला सुरुवात केली. मनोज प्रभाकर – अनिरुद्ध बहल आणि मिंटी तेजपाल यांनी अनेक प्रयत्न करूनही कोणी कॅमेऱ्यावर म्हणजेच on-record काही बोलेना तेव्हा या तिघांनी sting operation करायचे ठरवले. Caught Out मध्ये या प्रवासाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. छुपे कॅमेरे आणि इतर साहित्य कसं मिळवलं, भेटी कशा रेकॉर्ड केल्या आणि त्यांच्यातून माहिती कशी गोळा केली इत्यादी. सामान्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा प्रवास आहे. यातच पुढे काही बुकींची व खेळाडूंची नावे समोर येतात, खेळांडूंमधील आपसातले वाद यानिमित्ताने प्रेक्षकांच्या समोर उलगडताना दिसतात. आणि शेवटी केस CBI कडे जाते.
इथून शोधपट रोचक कथेकडून गडद वळण घेतो. गुन्हेगारी, माफिया आणि पैशाच्या आजूबाजूला फिरणारे त्यांचे क्रूर विश्व समोर येते. बुकींच्या कामाची पद्धत, त्यांची मानसिकता समोर येते. Caught Out मध्ये त्यांच्या वेळेच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती आहेत, रवी सवानी (Ravi Sawani) आणि नीरज कुमार. रवी जींकडे या सगळ्या प्रकरणाच्या अन्वेषणाची जबाबदारी होती. तसेच नीरज कुमार यांच्या खबऱ्याने बुकी एम के गुप्ता, म्हणजेच या सगळ्या प्रकरणाच्या सूत्रधाराची, CBI शी भेट घडवून आणली. ज्यांना माहित नाही त्यांना, नीरज कुमार हे CBI चे पूर्व निर्देशक आहेत आणि गुन्हेगारी अन्वेषणाच्या त्यांच्या अनुभवांवर आधारित “Dial D for Don” हे पुस्तक प्रसिद्ध आहे. इथून पुढे “Investigation” होते. हॅन्सी क्रोनिए आणि अझरुद्दीन सारख्या क्रिकेटपटूचे नाव समोर येते. CBI ला तपस करत असताना हॅन्सी क्रोनिए चे नाव कसे समजले, बुकींचे जाळे कसे सापडले, BCCI ने सुरुवातीला बचाव करून पलटी कशी मारली आणि भारतीय क्रिकेटपटुंबद्दल काय सापडले, तसेच दुसऱ्यांना sting करणारा मनोज प्रभाकरच कसा अडकला, हे या शोधपटाचे वैशिष्ट्य आहे. जरूर बघा. यातून क्रिकेटच्या अंधाऱ्या जगताची छोटीशी झलक निश्चित मिळेल.
अर्थातच match-fixing हे असे भिजत पडलेले घोंगडे आहे ज्याला कोणी वाली नाही. मोठ मोठी नावे यात आहेत त्यामुळे केसेस दाबणे, नावे लपवणे, आपल्या बाजूने निकाल लावून घेणे हे जे इतर मोठ्या लोकांच्या बाबतीत घडतं ते इथे देखील घडत आलेलं आहे. आणि पुढेही घडत राहणार.
माझे मत असे की Caught Out मध्ये जे काही दाखवले गेले ते सत्याच्या फार हिमखंडाचे छोटेसे टोक आहे. भ्रष्टाचार आणि अनीती यांच्या कर्दमात अजून सत्याचा फार मोठा भाग दबून ठेवलेला आहे. तो कधी समोर येईल माहित नाही. पण अशा शोधपटाची खरे तर मालिका झाली पाहिजे. ज्यांना शोध आणि तथ्य यांच्या शोधाची आवड आहे त्यांना हा माहितीपट नश्चितच आवडेल. असो, शोधपट चांगला आहे आणि आपल्या मनात शंका निर्माण करणारा आहे. आपण खेळ म्हणून जे काही बघतो ते खरंच घडत असतं की कोणी बुकी अथवा माफिया “खेळाडू” नावाच्या कठपुतळ्या मैदानावर नाचवत असतो?
सत्य समजणं कठीण आहे पण, एका गोष्टीचे निश्चित समाधान आहे की मी आणि माझ्या पिढीने ज्यांना आदर्श मानले त्या सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे इत्यादींच्या चारित्र्याला बट्टा लागला नाही. याचे संपूर्ण श्रेय या खेळाडूंना जाते यात शंकाच नाही. तेहलकाच्या एका व्हिडिओत तर जयवंत लेले हे सांगताना दिसतात की त्या काळी बुकी सगळ्यांना विकत घ्यायचा प्रयत्न करत होते आणि सचिन भारतासाठी सामना जिंकून देत होता. असल्या भयानक परिस्थितीत माझा देव सामना जिंकून द्यायचा प्रयत्न करत होता. विचार करूनसुद्धा डोळे पाणावत आहेत. सचिनला नावे ठेवणे सोपे आहे पण सचिन होण्यासाठी पूर्वजन्मांच्या पुण्याईचे संचित पाठीशी असावे लागते! या ब्लॉगचा हा, विषय हा नाही. यावर पुन्हा कधी विस्तृतपणे लिहीन.
Caught Out – तांत्रिक बाजू
“Caught Out: Crime. Corruption. Cricket”, Netflix ची निर्मिती असल्याने तांत्रिकदृष्ट्या सरस आहेच. तसेच digital transitions उत्तम आहेत. माहितीपटातील मुलाखतींची जशी मांडणी आजकाल बघायला मिळते तशी मांडणी आहे. म्हणजे एका कथानकानुसार सजवलेल्या खोलीत एक खुर्ची, त्यावर बसलेला माणूस आणि त्याचे बोलणे टिपणारे २-३ कॅमेरे. याबाबतीत मी सध्या निर्मात्यांवर नाखूष आहे कारण यात नावीन्य दिसत नाही. काही frames (चौकटी) खरच अप्रतिम आहेत, विशेषतः CBI च्या इमारतीमधील.
Caught Out नंतर..
असो, Caught Out ने निश्चितच काही जुन्या आठवणी आणि वेदना जाग्या केल्या. आता विचार करतो तेव्हा आठवतं की प्रभाकर आणि नयन मोंगिया यांनी कानपुरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात, हातात विकेट्स असून देखील स्वतः नाबाद राहून धावा न करता भारताला हरवलं होतं. त्याचा हा व्हिडीओ YouTube वर देखील आहे आणि इथे त्या सामन्याची तालिका (scorecard) आहे. प्रभाकर आणि मोंगिया त्या खेळाबद्दल निर्लज्जपणे बोलताना तेहेलकाच्या व्हिडिओत दिसतात. माझी आणि घरच्यांची झालेली चिडचिड अजूनही स्मरणात आहे. माझ्या मनात “हे ठरवून केलेलं आहे” अशी शंकेची पाल सर्वप्रथम इथे चुकचुकली. पण सचिन होता तोपर्यंत क्रिकेटमध्ये अर्थ होता, त्यामुळे बघत राहिलो! Caught Out च्या निमित्ताने लहानपणीच्या क्रिकेटविषयी सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. काही गोड काही कटू. एक गोष्ट मात्र या शोधपटातून ठळकपणे दिसून येते की, लोभ आणि मोह माणसाला वाममार्गाला नेतात. त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे.
या लोभी लोकांमुळे क्रिकेटचे आभाळ मात्र झुकले ते कायमचे. आज तर IPL च्या काळात जिथे सगळंच पैशाचा खेळ सुरू असतो तिथे तर हे आभाळ आणखीन झुकत आहे, ढगाळ होत आहे, गढूळ होत आहे. याचा शेवट कसा आणि कुठे होणार माहित नाही. पण सध्या तरी या जगापासून दूर असल्याने आता तितका त्रास होत नाही.
माझे बाकीचे ब्लॉग्स इथे वाचायला मिळतील.. हा ब्लॉग आवडल्यास लोकांपर्यंत नक्की पोहोचवा!