वृत्त म्हणजे काय?
वृत्त म्हणजे अक्षरे, गण आणि मात्रांनी काव्याची केलेली एक लयबद्ध बांधणी. खरं तर वृत्त आणि छंद यांच्यात फरक नाही. पण छंद मुख्यतः संस्कृत पद्यांमध्ये जास्त वापरली जातात. संस्कृतमध्ये छंद खूप आहेत, त्यांचे नियम वगैरे देखील भरपूर आहेत. पण, प्राकृत भाषेत त्यातील काहीच वापरले गेले, लोकप्रिय झाले. काव्याचे देखील दोन प्रकार असतात एक पद्य म्हणजे ज्याला पाद म्हणजे चरण आहेत आणि गद्य ज्याला पाद अर्थात चरण नाहीत! सामान्य लोकांमध्ये, चालीत आणि लयीत म्हटली जाणारी कविता कायमच लोकप्रिय असते आणि त्या कवितेचा आशय देखील लोकांपर्यंत पोहोचवायला मदत होते. कारण, काव्य म्हटले की आधी मनात येते ती गेयता आणि चाल (नाहीतरी धडे आणि कविता यांत काय फरक उरला? असो). वाचकांच्या माहितीसाठी सांगतो की गेयता हा शब्द संस्कृत गेय म्हणजे गाणे किंवा गाण्याजोगे या शब्दावरून आलेला आहे. थोडक्यात काय तर काव्य कुठलेही असो, जोपर्यंत त्याला एखाद्या चालीत गाऊन दाखवता येत नाही तोपर्यंत ती सामान्यजनांपर्यंत पोहोचवणं अवघड असतं.
एखादी गोष्ट लोकप्रिय असणे हा झाला अनुभव आणि त्याची कारण मीमांसा म्हणजे शास्त्राभ्यास! कारण काही ना काही कारण असल्याशिवाय कुठलीही गोष्ट लोकप्रिय होत नाही, वर्षानुवर्षे लक्षात राहात नाही. (काही महिन्यांपुरतीच झळकणारी गाणी यात मोडत नाहीत!). कुठल्याही रागाचे जसे स्वरांना धरून काही नियम असतात किंवा काही गाण्यांमध्ये विशिष्ट सूरावटीला धरून रचना केलेली असते तसेच काही काव्याचे आहे. भाषेवर संशोधन करणाऱ्यांनी मानसशास्त्र, उच्चारशास्त्र आणि संगीत यांच्या अभ्यासाअंती काव्याचे काही नियम अंकित केले ज्यांच्यामुळे काव्य अधिक सुश्राव्य, सुरस व प्रभावी बनते. त्यातील महत्त्वाचा अभ्यास म्हणजे वृत्त आणि वृत्ताभ्यास!
इंग्रजीत या छंदाला Metre (मीटर) असे म्हणतात.
मात्रा म्हणजे काय?
व्याकरणाचा अभ्यास करताना पहिला प्रश्न येतो, मात्रा म्हणजे काय? हे लघु – गुरू काय प्रकरण आहे? प्रत्येक अक्षराचा एक निश्चित उच्चार असतो. कोणत्या अक्षरावर किती जोर आहे आणि अक्षर उच्चारताना किती समय किंवा कालावधी लागत आहे यावरून त्या अक्षराचे लघुत्व किंवा गुरुत्व ठरवले जाते. त्याचे काही ढोबळ नियम आहेत. ढोबळ याकरिता की जे नियम संस्कृतमध्ये अत्यंत कडक आहेत तेच नियम प्राकृत भाषेत थोडे शिथिल झालेले दिसतात. ते नियम पाहण्याच्या आधी हे सांगणं गरजेचं आहे की लघु – गुरू चे नियम ऱ्हस्व आणि दीर्घ यांच्या नियमांना समांतर जातात.
लघु – ज्या अक्षराच्या उच्चारणासाठी कमी कालावधी लागतो तो लघु. लघु मात्रा “U” ने दर्शवली जाते.
गुरू – ज्या अक्षराच्या उच्चारणासाठी अधिक कालावधी लागतो तो गुरू. गुरू मात्रा “–” ने दर्शवली जाते.
उतारा मध्ये उ हा लघु तर ता आणि रा हे गुरू आहेत.
मान मध्ये मा हा गुरू तर न हा लघु आहे.
स्वामी मध्ये स्वा आणि मी दोन्ही गुरू आहेत, मात्र स्वामि मध्ये स्वा गुरू आणि मि लघु आहे.
लघु आणि गुरू यांची उदाहरणे वृत्तांच्या उदाहरणात येतीलच पण, एक सोपा नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे “ज्या अक्षरावर आघात जास्त तो गुरू” मग ते जोडाक्षर किंवा संयुक्ताक्षर असो वा नसो.
जोडाक्षरांच्या बाबतीत विचार केला तर पुढील अक्षर जर समान अक्षरांचे जोडाक्षर असेल तर पहिले ऱ्हस्व अक्षर देखील गुरू होते. उदाहरणार्थ मुद्दा, कित्ता, पत्ता इत्यादी.
गण म्हणजे काय?
गण म्हणजे अक्षरे किंवा मात्रा यांचे गट. गणांत दोन प्रकार आहेत, अक्षरगण आणि मात्रागण. अक्षरगण आठ प्रकारचे तर मात्रागण पाच प्रकारचे आहेत.
अक्षरगण
प्रत्येक अक्षरगणात तीन अक्षरे येतात. त्यातील लघु आणि गुरू यांच्या स्थानावरून यांचे आठ प्रकार पडतात.
गण मात्रा | गण | लघु – गुरू स्वरूप |
---|---|---|
आद्यलघु | यमाचा (य) | U – – |
मध्यलघु | राधिका (र) | – U – |
अंत्यलघु | ताराप (त) | – – U |
सर्वलघु | नमन (न) | U U U |
आद्यगुरु | भास्कर (भ) | – U U |
मध्यगुरु | जनास (ज) | U – U |
अंत्यगुरु | समरा (स) | U U – |
सर्वगुरु | मानावा (म) | – – – |
खालील श्लोकांमध्ये य र त न भ ज स म चे वर्णन पुरुषोत्तम गोडबोले यांनी फार सुंदर पद्धतीने केलेले आहे.
आद्यलघू जो तो यगण म्हणावा ॥
रगण गणावा मध्यलघू ॥
अंत्यलघू जो तो तगण म्हणावा ॥
नगण गणावा सर्वलघू ॥
आद्यगुरु जो तो भगण म्हणावा ॥
जगण गणावा मध्यगुरु ॥
अंत्यगुरु जो तो सगण म्हणावा ॥
मगण गणावा सर्वगुरु ॥
अक्षरगणवृत्तांचे चार भाग किंवा चरण असतात. अक्षरगणवृत्तांचे तीन प्रकार असतात
१) समवृत्त – ज्या वृत्ताचे चारही चरण समान असतात
२) अर्धसमवृत्त – ज्या वृत्ताचे पहिले व तिसरे चरण आणि दुसरे व चौथे चरण समान असतात
३) विषमवृत्त – ज्या वृत्ताचे चारही चरण असमान असतात
मात्रागण
दोन्ही गुरू – माला (म)
सर्व लघु – नवरस (न)
लघु गुरू लघु – जनास (ज)
गुरू लघु लघु – भाजन (भ)
लघु लघु गुरू – सविता (स)
गण आणि वृत्त
काव्यातील वृत्त गणांच्या मांडणीवरून किंवा गणतीवरून ठरतात. अक्षरगणांच्या मांडणीवर अक्षरगणवृत्त आणि मात्रागणांच्या गणतीवरून मात्रागणवृत्त बनतात. संस्कृतमध्ये मात्रागणवृत्त ला “जाति” देखील म्हणतात. वृत्तांचा अभ्यास करायचा असेल तर गणांची माहिती असणे गरजेचे आहे.
यति आणि वृत्त
काव्य जरी वृत्तांमध्ये गुंफलं असलं तरी, काव्याचे वाचन अथवा गायन करताना, अक्षरे एकामागून एक वाचायची नसतात. वृत्तबद्ध रचनांच्या मध्ये थोडा अवधी (pause) घ्यायचा असतो. या अवधीला यति असे म्हणतात. कधी कधी एखादा पूर्णशब्द वृत्ताच्या यति च्या जागेवर आला तर शब्दाच्या मध्येच यति घ्यावी लागते. त्यामुळे शब्दाची विनाकारण फोड केली जाते. त्याला यतिभंग म्हणतात.