व्युत्पत्ति:
इतिहासाचा अभ्यास करत असताना जवळजवळ सर्व मराठी दप्तरातील रोजनिशींमध्ये, सरकारी कागदांवर आणि अधिकृत आदेश-निर्देशांवर “मशारनिल्हे” लिहिलेले दिसेल. उदा. “आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तणूक करणें म्हणोन मशारनिल्हे यांचे नांवें पाठविली.”
तर, मशारनिल्हे हा शब्द मशार-उन आणि इलैह अशा अरबी शब्दांचा अपभ्रंश आहे. अर्थातच मशारनिल्हे हा शब्द वापरात येण्यास मुसलमानी शासनकर्ते जबाबदार असले पाहिजेत यात शंका नाही.
मशार = सुचवलेले
उन = अनेकवचनी निर्देशक अरबी अव्यय
इलैह = ज्यांच्या नावे, निर्देशांकित केलेले
मशारनिल्हे या शब्दाचा अर्थ “वर सांगितलेले”, “वर नमूद केलेले”, “उपरिनिर्दिष्ट मजकूर” इत्यादी असा आहे. त्यामुळे पत्रामध्ये जर एकाहून अनेक नावे असतील हा शब्द अधिक वापरात येई. उदाहरणार्थ थोरल्या माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीतील मजकूर पाहा. यात पेशव्यांकडून व्यापारी आणि उदीम मंडळींसाठी कर माफीविषयक निर्देश दोन अधिकाऱ्यांना दिलेल्या आढळतील आणि शेवटी मशारनिल्हे चा वापर “वर नमूद केलेल्या मंडळींसाठी” असा केलेला आढळेल.