व्युत्पत्ति
मराठीत बाहेरून आलेला शब्द “स्वार” शब्द मुळत: फारसी शब्द “सवार” वरून आलाय. गमतीचा भाग असा की, सवार हा शब्द जुन्या फारसी शब्दावरून “अस्वआर” वरून आलाय जो “अस्वदार” चा अपभ्रंश आहे. फारसी मध्ये अस्व म्हणजे घोडा आणि सगळ्यात रोचक गोष्ट म्हणजे अस्व हा शब्द संस्कृत “अश्व” वरून फारसी आला!
त्यामुळे स्वार किंवा सवार या शब्दाचा अर्थ “घोड्यावर बसलेला” किंवा “घोडा चालवणारा” असा होतो. मराठीत स्वार हा शब्द कोणताही वाहनासाठी वापरला जाऊ लागला उदाहरणार्थ, घोडेस्वार, दुचाकीस्वार इत्यादी.
पूर्वीच्या काळात बहुतांशी पुरुषमंडळी घोड्यावर बसून ये जा करीत त्यामुळे देखील “स्वारी” असा आदरार्थी शब्द उपयोगात येऊ लागले. उदाहरणार्थ “आज स्वारी इकडे कुठे?”. तसेच उताविळपणाने वागणाऱ्यांसाठी “घोड्यावर स्वार होऊन येणे” हा वाक्प्रचार देखील प्रचलित झाला.
शब्दप्रयोग
१. पेशवे क्षणार्धात घोड्यावर स्वार झाले आणि उत्तरेकडे कूच करून गेले.
२. तू का घोड्यावर स्वार होऊन आलेला आहेस?