September 13, 2025
ब्रुटस तू सुद्धा !?

ब्रुटस तू सुद्धा !?

Spread the love

अंगावर उंची वस्त्रे परिधान करून नेहमीप्रमाणे तो सभेत आला. विश्वविजेता म्हणून ज्याची ख्याती होती आणि प्रखर शासक म्हणून ज्याचा वचक होता. तो राजा आपल्या सभेकडे नजर टाकून आपल्या सिंहासनाच्या दिशेने जाऊ लागला. सभागृहात शांतता होती. एक विचित्र शांतता. सर्पाने काळोखात लपून बसावे अशी शांतता. पण त्याने दुर्लक्ष केले कारण अशा अनेक सर्पांना त्याने युद्धभूमीवर हरवलेले होते. सिंहासनाकडे जाणाऱ्या पायरीवर त्याने पाय ठेवलाच होता की एक गलका झाला आणि काय झालं हे समजायच्या आत पाठीवर आघात झाला. कालपर्यंत ज्यांना तो आपले मानत होता, ज्यांच्या निष्ठेविषयी त्याला किंचितही शंका नव्हती त्या मंत्र्यांच्या दिशेने आक्रोश ऐकू आला. माणसांचा एक श्वापदी लोळ त्याच्या दिशेने धावून आला. पाठीतून एक असह्य कळ मस्तकापर्यंत गेली आणि त्याने मागे वळून पाहीलं. त्याचेच मंत्री हातात कट्यारी आणि तलवारी घेऊन वार करत होते. एव्हाना मस्तकात गेलेली कळ आता जाणिवांचे ऊन झाकू लागली होती. डोळे मिटू लागले होते. आपल्याच लोकांनी आपल्यावर आघात केलेला आहे हे त्याच्या हळूहळू लक्षात आलं आणि तो भानावर आला. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. त्याच्या शुभ्र वस्त्रांवर रक्ताचे ओघळ वाहू लागले होते. वस्त्राला भेदून कट्यारींच्या जिव्हा त्याच्या शरीराला छेदून जात होत्या. त्याच्या शरीरातून निघणाऱ्या प्रत्येक स्कंदबिंदूसरशी मारेकर्‍यांना चेव चढत होता. पराक्रमी, दिग्विजयी आणि निष्ठुर अशा त्या राजाचा जीव घेतल्याशिवाय त्यांच्या मनातला वणवा शांत होणार नव्हता. ते वार करत होते. निरंतर.. एखाद्या भुकेल्या जनावराने अन्नावर झडप घ्यावी तसे! आणि प्रत्येक वाराबरोबर त्याच्या डोळ्यांपुढे अंधारी येत होती. सगळं काही पुसट आणि अस्पष्ट दिसत होतं. त्यामुळे पांढऱ्या शुभ्र वस्त्रांत आलेल्या त्या मृत्यूदूतांनी आपले दृष्टिपटल व्यापून टाकले आहे असेच त्याला वाटले. त्याच्या डोळ्यांना या माणसांच्या डोहात, एक आकृती दिसत नव्हती. पहिला वार झाला तेव्हाच त्याला त्याची आठवण आलेली होती. त्याची सावली.. त्याचा मित्र! आज जेव्हा त्याला त्या मित्राची गरज होती तेव्हा तो कुठेच दिसत नव्हता! का!?.. कुठे गेला आहे तो मला या जनावरांच्या घोळक्यात एकटं सोडून? विचार करण्याची त्याची ताकद आता रक्ताच्या प्रत्येक थेंबाद्वारे कमी कमी होत चालली होती. सबंध शरीर रक्ताच्या अघोरी धारांनी व्यापलेलं होतं. त्याने एक दोनदा हात वर करून पाहिला, कोणीही ऐकलं नाही. बोलायचा प्रयत्न प्रयत्न केला पण शब्दच फुटले नाहीत. श्वास कमी पडत होता आणि तेवढ्यात चेहऱ्यांवर उडालेल्या रक्ताच्या भेसूर रंगातून काही ओळखीच्या रेषा स्पष्ट झाल्या.. भाव अनोळखी असले तरीही, रेषा ओळखीच्या होत्या. त्याने त्या मित्राला ओळखले होते..! त्याच्या हातात देखील कट्यार होती. पण.. पण तो बचाव करत नव्हता.. वार करत होता. बेभान होऊन कट्यार चालवत होता. काही क्षण हे वास्तव अपूर्ण श्वासांतून खाली त्याच्या मनात उतरले. तेव्हा मात्र त्याला जगणे नकोसे झाले, सगळे अवसान गळून पडले. स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती ते डोळ्यांदेखत घडत होते. जगण्यात काहीही अर्थ उरला नव्हता. आपले हे प्राक्तन बघून त्याच्या रक्ताने भिजलेल्या ओठांवर विचित्र स्मित उमटले, डोळे पाणावले आणि काही शब्द कसे बसे बाहेर पडले “ब्रुटस.. तू सुद्धा!?” ते शब्द पुसट होते खरे पण त्याच्या मित्राला ऐकू गेले. कधी काळचा तो मित्र एक क्षण स्तब्ध झाला आणि आजूबाजूच्या श्वापदी आणि हिंस्त्र वादळाच्या विरुद्ध जाण्याऐवजी त्या वादळाच्या असुरी लाटांवर स्वतःला झोकून दिले व पुन्हा शस्त्र उगारले. कोणी किती वर केले याची मोजदाद नव्हती. त्या दिग्विजयी राजाचे निष्प्राण शरीर कितीतरी वेळ वार झेलत होते, निमूटपणे. आणि शेवटी कोण्या एका क्षणी जमावाला खात्री पटली की ज्युलियस मेला! काही मारेकरी आपल्या कट्यारी उंचावून ओरडून सांगत होते, ज्युलियस मेला! ज्युलियस मेला! पण तरीही काही जण खात्री करून घेण्यासाठी पुढे जात होते, ज्यूलियसचे निष्प्राण शरीर पायाने हलवून बघत होते. ब्रुटस मात्र तसाच उभा होता, स्तब्ध. त्याच्या डोळ्यात पाणी आणि हातात त्याच्या मित्राच्या.. ज्यूलियसच्या रक्ताने बरबटलेली कट्यार. सभागृहात जल्लोष सुरू होता. लोक हसत होते, मोठ्याने ओरडत होते! ज्युलियसचे शरीर तिथेच होते आणि सगळ्यांची पांगापांग झाली होती. ब्रुटसने एकदा ज्यूलियसच्या चेहऱ्याकडे बघितले.. ज्यूलियसच्या रक्ताने माखलेल्या ओठांवरचे अदृश्य स्मित फक्त त्यालाच दिसले! आजूबाजूच्या गोंगाटात त्याला तीनच शब्द पुनःपुन्हा ऐकू येत होते.. “ब्रुटस तू सुद्धा !?”.. “ब्रुटस.. तू सुद्धा !?”

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *