नमस्कार वाचकहो! माझ्या मते घटनेबद्दल सांगण्याआधी अनेकांना राखणदार म्हणजे काय हे थोडक्यात सांगणे गरजेचे आहे. राखणदार म्हणजे गावाचा, स्थानाचा अगर वास्तूचा रक्षणकर्ता. कोकणात आणि इतर भागात देखील अशी आस्था आहे की हा राखणदार अदृश्यरूपात रक्षण करत असतो. तो रात्री त्याच्या भागात फिरत असतो. अर्थातच आत्तापर्यंत कोणी अशा राखणदाराचे छायाचित्र काढल्याचे ऐकिवात नाही. पण त्या जागी कोणतेही कार्य करण्याच्या आधी राखणदाराचा सन्मान केला जातो आणि पुढे कार्य केले जाते. कोकणात जवळजवळ सगळ्या गावांचा, देवस्थानांचा राखणदार आहेच. पुण्यात माझ्या माहितीत इंदुरीच्या किल्ल्यावर देवीच्या मंदिराचा राखणदार आहे.
तर झालं असं की माझ्या ओळखीचे लोक कोकणात गेले होते. जाताना गाडी आणि ड्रायव्हर घेऊन गेलेले होते. सकाळी पुण्यातून निघून मंडळी साधारण दुपारी कोकणात पोहोचली. पोहोचल्यावर सगळ्यांनी आराम केला, त्यात ड्रायव्हरने देखील आराम केला. त्या दिवशी आणखीन काही करायचं नसल्यामुळे सगळे निवांत होते. दिवस शिमग्याचे होते आणि दुसऱ्या दिवशी सगळे जण देवीच्या मंदिरात उत्सवासाठी जाणार होते. एकंदरीत कोकण ट्रिप निवांत सुरू होती आणि बाकी काही करण्यासारखे देखील नव्हते.
रात्रीचे जेवण झाले आणि हळूहळू मंडळी झोपण्याची तयारी करू लागले. घर अगदी कोकणी होते. कौलारू , पुढे अंगण आणि अंगणाच्या पुढे काही अंतरावर रस्ता. आजूबाजूला जंगलाखेरीज बाकी काहीही नाही. अशा ठिकाणी काळोख पडू लागला की जाणवतं आपण एकटे आहोत. रस्त्यावर एक दिवा होता त्याचाच काय तो प्रकाश. यजमानांनी आणि मंडळींनी ड्रायव्हरला घरात झोपायला सांगितले पण त्याला गाडीत झोपायचे होते. यजमानांनी आग्रह केला पण ड्रायव्हर ऐकेना. खरं तर दुपारची झोप झाल्यामुळे त्याला झोप येत नव्हती आणि दुसरं म्हणजे त्याला मोबाईलवर मॅच आणि चित्रपट बघायचे होते. अखेर यजमानांनी प्रयत्न सोडले. ड्रायव्हर गाडीच्या काचा हलक्या खाली ठेवून सीट मागे घेऊन मोबाईल बघू लागला.
वेळ कसा समजलं नाही पण साधारण १२:३० च्या दरम्यान सगळं काही गुडूप होतं तेव्हा त्याला थोडा दुरून हलका घुंगुरांचा आवाज आला. आधी त्याला वाटलं भास झाला. पण घुंगरांचा आवाज जवळ येत होता! आता तो थोडा सावध झाला. आवाज गाडीच्या समोरून येत होता. ड्रायव्हर कुतूहलाने गाडीच्या आतून समोर पाहू लागला. आता घुंगरांच्या बरोबर काठी जमिनीवर आपटल्याचा देखील आवाज येऊ लागला. ड्रायव्हर चकित पण साशंक होता. काही क्षणात रस्त्यावरच्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात त्याला समोरून एक माणूस येताना दिसला. पांढरे धोतर आणि पांढरे पागोटे स्पष्ट होते. हातात घुंगुर अडकवलेली काठी जमिनीवर आपटत तो पुढे येत होता. सावळ्या रंगाचा आणि अंगाने भरभक्कम माणूस उजव्या खांद्यावर घोंगडी टाकून येताना दिसल्यावर मात्र ड्रायव्हर घाबरला.

कोणीतरी दरोडेखोर समजून त्याने घाईने सगळे दिवे बंद केले, काचा वर केल्या आणि सीट पूर्ण खाली नेले. डोळे बंद केले आणि देवाचे नाव घेऊ लागला. अर्थातच त्याचे घाबरणे साहजिक होते. डोळे मिटले तरीही मानवी मन कुतूहल दाखवतेच. ड्रायव्हरने डोळे किलकिले केले. तेव्हा ती व्यक्ती गाडीच्या भोवती एक चक्कर मारली आणि पुढे निघून गेली. ड्रायव्हरला काठीचा आणि घुंगरांचा आवाज दूर जाताना जाणवला तरीही त्याने हालचाल केली नाही. काही काळाने त्याला झोप लागली.
ही घटना कुणाला सांगायची नाही असे त्याने ठरवले होते. सकाळी सगळे आवरून मंदिरात जाऊ लागले. मंदिराच्या आवारात गेल्यावर मंडळी देवीच्या मंदिरापासून दूर असलेल्या एका मंदिराकडे जाऊ लागले. त्यांच्या हातात धोतर, घोंगडी, पेढे होते. ड्रायव्हर सुद्धा त्यांच्या मागे गेला. त्या मंदिराकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत आश्चर्य दिसले आणि तो एकटक त्या मंदिरातील मूर्तीकडे पाहू लागला. त्याची ती अवस्था बघून लोक त्याला विचारू लागले तेव्हा तो म्हणाला,
“काळ रात्री असाच एक माणूस माझ्या गाडीच्या बाजूला फिरून निघून गेला!”
त्याला समजले होते तो दुसरा तिसरा कोणीही नसून “राखणदार” होता.. ड्रायव्हरने हात जोडून राखणदाराला नमस्कार केला.
आणखीन अशा कथा ऐकायला इथे क्लीक करा.