वृत्ताचे नाव – इंद्रवज्रा
वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – १६
वृत्त अक्षर संख्या – ११
गणांची विभागणी – त, त, ज, ग, ग
यति – ५ व्या अक्षरानंतर
नियम –
इंद्रवज्रा वृत्तात त, त, ज, ग, ग गण – – U | – – U | U – U | – – U – U | – U – आणि मात्रा २२१ । २२१ । १२१ । २ २
इंद्रवज्रा बद्दल माहिती
इंद्रवज्रा हे नाव अर्थातच इंद्रवज्र शी साम्य असलेले आहे. इंद्रवज्र म्हणजे इंद्राच्या हातातील वज्र. याचा लाक्षणिक अर्थ आणि वृत्ताची पाहणी यात कितपत साधर्म्य आहे याबद्दल विशेष माहिती मिळू शकलेली नाही. पण, हे वृत्त शृंगार रसनिष्पत्तीसाठी उत्तम आहे हे पंडित सांगतात.
इतर अनेक प्राचीन छंदांपैकी हा एक छंद आहे. स्फुट काव्यांसाठी उत्तम. अनेक पौराणिक काव्यांमध्ये यांच्या उपयोग केलेला आढळून येतो.
इतर वृत्तांशी साम्य
पहिल्या त गणाच्या जागी ज गण आला की उपेंद्रवज्रा!
वृत्ताचे लक्षणसूत्र
१.
ताता पश्चाती जगागा आले
छंदात इंद्रास वज्रा मिळाले
– (हृद्रोग, रोहित बापट)
२.
स्यादिन्द्र वज्रा यदि तौ जगौ ग:
– (“रत्नालंकार”, केदार भट्ट)
इंद्रवज्रा वृत्ताची उदाहरणे
इंद्रवज्रा वृत्तातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिवस्तुती! (सगळ्यांना पाठ असायला हवी)
कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ||
आणिखीन एक उदाहरण केशवसुतांच्या कवितेमधील
सौभाग्य पुष्पा ! तव गावयाला
मी पात्र नाहीं गमतें मनाला;
भुंगे तुझे स्त्रोत्र सुरेख गाती
ऐकूनि तें सर्व पळोत खंती !
– (“पुष्पाप्रत”, केशवसुत)
इंद्रवज्रा वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
लग्रे नवांश: क्षितिजस्य वर्जो
वर्गस्तथा तस्य महानुभाव: ।
सूर्यस्य वर्ग: सकल: प्रशस्तो
राजाभिषेके सग्रहो नृपाणाम् ।।
– (“शिवराजाभिषेकप्रयोग: – विधिमुहुर्तादि विचार”, गागाभट्ट)
मार्गांत ऐशी उडते दशा ही ।
गेल्यास तेथें अपुलें न कांहीं ॥
भाषाहि नाहीं परकीय अन्न ।
पाणी हवा सर्वच भिन्न भिन्न ॥
– (“तिकुडचें पहिलें पत्र”, कृष्णाजी नारायण आठल्ये)
सांडूनियां मन्मथ संगतीचा ।
नाडी वधू यास्तव संग तीचा ॥
टाकूनियां सज्जनसंगमें रे ।
प्रेमें रमेच्या रमणीं रमें रे ॥१॥
– (स्वामी श्रीकृष्णदयार्णव)
साश्चर्य झाले सगळेच फार ।
राजा करी तो स्तवनास फार ।
केली प्रभूची दश-पद्य सेवा ।
केली नृपानें स्वमुखेंच भावा ॥
– (“गणेश पुराण”)
पूजा करूनि अवघी हरीची । जोडोनिया हात प्रभूस याञ्ची ॥
दुग्धांत ही भाकर कुस्करून । खा पांडुरंगा मम राख मान ॥
– (“श्रीनामदेव महाराजांचें चरित्र”, श्रीसद्गुरू दासगणु महाराज)
जो ज्यापरी ज्याप्रति वृत्ति ठेवी
त्याशीं तशी वृत्तिच धर्म्य होई ॥
खोट्यास खोटेंपण हीच तोडी
सौजन्य साधूप्रति योग्य जोडी ॥
– (“संस्कृत-मराठी-सुभाषितकोष”, ल. गो. विंझे)
इंद्रवज्रा वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!