वृत्ताचे नाव – मंदारमाला
वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – ३६
वृत्त अक्षर संख्या – २२
गणांची विभागणी – त, त, त, त, त, त, त, ग
यति – ४ थ्या, १० व्या ,१६ व्या आणि २२ व्या मात्रेवर
नियम –
मंदारमाला वृत्तात सात त गण आणि शेवटी एक ग (गुरू) म्हणजे – – U । – – U । – – U । – – U । – – U । – – U । – – U । – म्हणजे २२१ । २२१ । २२१ । २२१ । २२१ । २२१ । २२१ । २
मंदारमाला बद्दल माहिती
मंदारमाला वृत्ताला अश्वघाटी असेही म्हणतात. म्हणजे घोड्याच्या टापांच्या तालात वाहणारे वृत्त. वर सांगितलेल्या मात्रांवर यति घेतल्यास कवनाचे स्वर घोडा पळतो आहे असे वाटेल. अर्थात हे झाले तर्क विलास!
मंदार म्हणजे स्वर्गातील एका दिव्य झाडाची फुले. त्यांची माला, मंदारमाला. जणू सात फुले एका पुढे एक दोऱ्यात ओवले आणि शेवटी दोऱ्याला गाठ!
वृत्ताचे लक्षणसूत्र
१.
मंदारमाला कवी बोलती हीस कोणी हिला अश्वघाटी असें ॥
साता तकारीं जिथें हा घडे पाद तेथें गुरु एक अंती वसे ॥
या मोजितां एक पादांत निभ्रांत येतील बेवीस कीं अक्षरें ॥
वारावया ताप तारावया यास नारायणा तूंचि ये सत्वरें ॥
२.
चारा पुढे तीन वेळां सहा वर्ण बेवीस मंदारमाला धरी
पादी पहा सात ता गा पुढे एक ऐशा क्रमा नित्य थारा करी
– (साहित्यचंद्रिका)
मंदारमाला वृत्ताची उदाहरणे
वाचाळ मी धीट पाचारितों नीट त्याचा न यो वीट साचा हरी (२२१ २ २१ २२१२ २१ २२ १ २ २१ २२ १२)
खोटा जरी मीच खोटा मधें तूंच मोठा कृपेचा न तोटा धरी (२२ १२ २१ २२ १२ २१ २२ १२२ १ २२ १२)
दाता सुखाचा सदा तारिता आपदा ताप दे एकदा तापटी (२२ १२२ १२ २१२ २१२ २१ २ २१२ २१२)
या संतसे व्हावया संपदा हे भया संग नाशील या संकटी (२ २१२ २१२ २१२ २ १२ २१ २२१ २ २१२)
मंदारमाला वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
जो रावणा राज्यवृद्धीमुळें होतसे दर्प तो टाकितो नासुनी !
मत्ता नृपां सवेदा दण्डणें युक्तची उग्र मार्गाप्रती सेवुनी
– (कृष्णाजी लक्ष्मण सोमण)
वि. वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांची अत्यंत प्रसिद्ध कविता “पृथ्वीचे प्रेमगीत” देखील मंदारमाला वृत्तात आहे!
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना !
नव्हाळीतले ना उमाळे, उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझूनी अता यौवनाच्या मशाली
उरी राहिले काजळी कोपरे !
– (“पृथ्वीचे प्रेमगीत”, कुसुमाग्रज)
निरी अंबराची धरूनी करीं गे करावे वरी काठ ते सत्वरीं ।
करीचा अरी जो तयाच्या परी तन्व शोभे कटी ही तुझी ती बरी
घरी हेमपट्टा, सरी ती गळां, रेख भाळीं चिरी कुंकवाची खरी ।
करीं गोठ तोडे शिरीम कुंदपुष्पा मुकुंदाचिया बैस अंकावरी ॥
– (“गरुड – गर्वहरण”, श्री दासगणु महाराज)
मंदारमाला वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!
पृथ्वीचे प्रेमगीत सुमंदारमाला वृत्त आहे, २३ अक्षरं आहेत, ७ वेळा य आणि मग ल ग असा क्रम आहे