February 15, 2025
उदो बोला उदो – देवीची शारदीय नवरात्रोत्सव आरती Ambabai

उदो बोला उदो – देवीची शारदीय नवरात्रोत्सव आरती

Spread the love

“उदो बोला उदो” शारदीय नवरात्रोत्सवातील देवीची एक प्रमुख आरती. नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे महत्व आणि देवीचा महिमा वर्णन करणारी ही आरती!

आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।
प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो ।
मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो ।
ब्रह्माविष्णु रुद्रआईचें पूजन करिती हो ।। १ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु .।।

द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ।। २ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो ।
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफ़ळां हो ।
कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।। ३ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

चतुर्थीचे दिवशीं विश्र्वव्यापक जननी हो ।
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो ।
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणीं हो ।। ४ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो ।
अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तवितां हो ।
रात्रीचें समयीं करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम तें आलें सद्भावें क्रीडतां हो ।। ५ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ।
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफ़ळां हो ।
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो ।। ६ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

सप्तमीचे दिवशीं सप्तशंगगडावरी हो ।
तेथें तूं नांदसी भोंवति पुष्पें नानापरी हो ।
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटीं पडतां झेलुनी घेसी वरचे वरी हो ।। ७ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।
स्तनपान देऊनि सुखी केलें अंतःकरणीं हो ।। ८ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो ।
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो ।
आचार्य-ब्राह्मणां तृप्त केलें कृपें त्वा करुनी हो ।। ९ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो ।
सिंहारुढ दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ।। १० ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु ।।

रचनाकार – समर्थ रामदास स्वामी

संपूर्ण आरती संग्रहासाठी इथे क्लिक करा

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *