प्रिय सुहास शिरवळकर.. सुशि!
प्रिय सुहास शिरवळकर “सुशि”, तुम्ही हयात असताना जी गोष्ट माझ्या नशिबात नव्हती ती तुम्ही हयात नसताना काही अंशी अनुभवायचे भाग्य मला काल लाभले! औचित्त्य तुमच्या “अस्तित्व” आणि “सुहास शिरवळकरांच्या कविता” या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम. अस्तित्व ही कादंबरी मी विक्रीला उपलब्ध होताच घेऊन वाचली. त्यावर काही समालोचन देखील केले. कदाचित तुम्हाला माहिती असेल. माहिती नसले तरी हरकत नाही.. माझी पायरी मी जाणतो. मी चाहता आहे, विद्यार्थी आहे आणि रसिक आहे त्यामुळे ज्या अनुभवांच्या आणि संवेदनांच्या गगनचुंबी मनोऱ्याच्या वर असलेल्या सिंहासनावर तुम्ही आहात त्याच्या पहिल्या पायरीवर मी आहे! काल मंचावरून मान्यवरांचे शब्द कानावर पडत होते पण मन तुम्हाला त्या व्यासपीठावर शोधण्यात गर्क होतं. अखेर तुमच्या असण्याची अनुभूती झाली आणि मनाच्या एका हळव्या कोपऱ्यातील वात तरारून जागी झाली. किरणे पसरू लागली. एका वेगळ्या विश्वात मी जाऊन आलो, तुमची लिखाणाची अंधारी खोली, तुमचे लिखाणाचे साहित्य, तो वाडा, कीर्तनं.. सगळं काही डोळ्यांसमोर उभं राहिलं. भौतिक उपस्थिती आणि अस्तित्व यांच्यातला फरक ज्यांना समजतो त्यांनाच समजेल की ही अनुभूती म्हणजे काय?

राजीव बर्वे काका..!
बर्वे आणि शिरवळकर या दोन कुटुंबांचे घनिष्ठ संबंध आहेत हे मला माहिती होते. पण, ते किती होते याचा उलगडा काल राजीव काकांनी केला. मी कल्पना करत होतो की ते तुमच्याबद्दल किस्से सांगत असताना तुमच्या चेहऱ्यावर कोणते भाव असते? तुम्ही पहिले नसेल पण मी बघत होतो. बर्वे काकांनी तुमच्या घरात असणाऱ्या कीर्तनाच्या परंपरेचा आणि संस्कारांचा उल्लेख करताना तुमच्या चाऱ्यावर, भूतकाळात गेल्याची छटा होती. आणि त्यांनी जेव्हा बँकेत घडलेला प्रकार आणि त्यावरून तुमचा झालेला त्रागा याचा किस्सा सांगितलं तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं तो प्रसंग आठवताना. असं होतंच म्हणा आज एखादी गोष्ट त्रासदायक वाटते पण उद्या तिची आठवण आली की आपल्यालाच हसू येतं.
मला वाटत होतं की एखादा कार्यक्रम केवळ राजीव काकांनी “सुशिंचे किस्से” या नावाने करावा. सुशि मी काय ऐकलं काल? तुम्ही ऑर्केस्ट्रा सुरु केला होता!! “तुकडा तुकडा चंद्र” विजेसारखा चमकून गेला. राजीव काकांना या कादंबरीचे नाव आठवले नाही पण तुम्हाला “कांता” मिळाल्याचा मात्र उल्लेख केला. आता सांगायला हरकत नाही पण तुम्ही लाजले नसाल तेवढ्या काकू लाजल्या हे ऐकल्यावर! तुम्ही गायचा हे काकूंकडून समजले होतेच आणि तुम्ही एखाद्या हिरोसारखे “देव आनंद” सारखे राहायचा आणि दिसायचा हे उघड होतं. अजूनही तुमच्यातला हिरो जिवंत आहे हे मी तुमच्या डोळ्यांकडे बघून सांगू शकतो!
पण सुशि, एक सांगतो काल राजीव काकांमुळे तुमच्या लेखनाचा अभ्यास करत असताना मनात आलेल्या काही प्रश्नांचा उलगडा झाला. उदाहरणार्थ कथेचा वेग, अलंकारांचा सोस नसलेली सोपी भाषाशैली, अत्यंत भावुकता आणि हळवेपणा. त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की, तुमच्यात उत्तम निरीक्षणक्षमता होती. तो हॉटेलातला किस्सा ऐकताना तुमच्याकडे मी बघत होतो, तुम्ही कुठेतरी तंद्री लावल्यासारखे दिसत होता. ती तंद्री होती की आमच्या सारख्यांच्या गर्दीत तुम्हाला कुठले नवीन पात्र दिसत होते..? तुम्हालाच ठाऊक! एक गोष्ट जी तुमचे वाचन केल्यानंतर मी समजलो होतो आणि ज्याचे confirmation बर्वे काकांनी केले, ते म्हणजे भावनिक प्रामाणिकपणा, स्वतःला त्रास करून घेण्याची खोड आणि अव्यवहारिकपणा. तुम्ही स्वतःला इतका तंत्राशी का करून घेता? असा प्रश्न विचारणार होतो पण मग आठवलं की मला स्वतःला अजून यावर ताबा मिळवता आला नाहीये तर मला हा प्रश्न विचारायचा अधिकार कोणी दिला?
असो, मघाशी म्हटल्याप्रमाणे राजीव काकांनी एक वेगळा कार्यक्रम केला तर आणखीनच मजा येईल!
प्रकाशन..
अस्तित्व चे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सुबोध भावे तर सुहास शिरवळकरांच्या कविता या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्या हस्ते झाले. तुमच्या कथा आणि कादंबरी वाचताना तुमच्या काही कविता मी वाचल्या होत्या. पण सुशि तुमच्या कविता वाचताना मात्र मला मजा येणार आहे हे मी आत्ताच सांगू शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे गोल गोल फिरत न बसता थेट विषयाला हात घालण्याची तुमची सवय! वैभव जोशींनी देखील याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे या शैलीचा त्यांच्यावर झालेल्या परिणामांबद्दल देखील ते बोलले. त्यावरून त्यांच्या कवितांच्या धाटणीबद्दल असलेले प्रश्न माझ्यापुरते सुटले! एकंदरीतच त्यांचे अनुभव ऐकताना कार्यक्रमात रंगत आली. सुबोध भावे यांनी दिलेली प्रस्तावना मी वाचलेली आहे. वैभव जोशी यांची प्रस्तावना अजून वाचायची आहे.
सुबोध भावे आणि वैभव जोशी या दोघांनी त्यांच्या लहानपणीच्या आणि तरुणपणीच्या आठवणी सांगितल्या. त्या आठवणी ऐकताना मजाही वाटली आणि वाईटही वाटलं. अशा कित्येक वाचकांवर, कलाकारांवर तुमचा प्रभाव असेल नाही? मजा याची वाटली.. आणि वाईट याचं वाटलं की मी लहानाचा मोठा होत असताना, तारुण्यात असताना कोणीही मला तुमची ओळख करून दिलेली नाही. मी खरं सांगतो माझा काही प्रमाणात राग आहे त्यांच्यावर. तथाकथिक साहित्याचे मूल्यमापन करणाऱ्या बाजारबुणग्यांवर. स्वतःच्या पदरची तुमच्या एक दशांश देखील सृजनक्षमता नसलेले लोक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होताना मी पाहिलेले आहेत. असो.. त्याबद्दल नंतर कधीतरी. मुद्दा एवढाच की माझी तुमच्याशी ओळख थोडी नंतर झाली. हे ही ठीकच झालं म्हणा. आयुष्याच्या या टप्प्यावर तुमचे वाचन करताना मी माझ्या तरुणपणीपेक्षा अधिक “शहाणा” झालोय असा माझा भाबडा समज आहे. त्यामुळे सुशि म्हणजे काय याबद्दल उत्तम चिंतन करू शकतोय. तुम्हाला शब्दांच्या पलीकडे बघू शकतोय.
प्रकाशन तर उत्तम झालं हे तुम्ही बघितलंच. मी बघत होतो की तुम्ही प्रकाशनाच्या वेळेस सगळ्या ऑडिटोरियम मध्ये आलेल्या लोकांकडे बघत होता. मी आजूबाजूला बघत होतो. कोणीही असा दिसला नाही ज्याला किंवा जिला तुमचे अस्तित्व जाणवत नव्हते. मोठा भावुक प्रसंग होता. मघाशी म्हणालो ना आम्ही.. तुमचे चाहते भौतिक उपस्थितीच्या पलीकडे गेलेलो आहोत. थँक्स टू युअर रायटिंग! डोळे काहीसे पाणावलेले पण चेहऱ्यावर हसू होते. मला तो क्षण अनुभवता आला जो तुम्ही भौतिक रूपात असताना मला अनुभवता आला नव्हता. एकेक योग असतात. कदाचित गेल्या जन्मी तुमच्या सहवासात मी आलो असेन. तसेही मी माझ्या कुटुंबाला म्हणतोच “मागच्या जन्मी मी कीर्तनकार होतो बहुदा”..
सम्राट शिरवळकर यांनी देखील त्यांचे काही अनुभव आणि किस्से सांगतिले. त्याबद्दल त्यांनी अस्तित्व च्या प्रस्तावनेत लिहिलेच आहे. मी आधीच मला भेटणाऱ्या प्रत्येकाला “अस्तित्व” वाचायचा सल्ला दिलेला आहे. आणखीन एक गोष्ट, आणखीन एक पैलू ज्याच्याबद्दल अगदी पुसटशी माहिती होती ती अजून उघडपणे समोर आली. ती म्हणजे बिकट प्रसंगात दुसऱ्यांना सावरण्याची तुमची हातोटी. मुलाच्या पाठीवर जेव्हा “बापाचा हात” असतो तेव्हा त्याला दिलासा मिळतोच पण दिशा देखील सापडते. एक बाप म्हणून तुमच्या या क्षमतेकडून मला निश्चितच काही शिकायला मिळाले.

सुहास शिरवळकर यांच्या चाहत्यांचे “सुशि” विश्व
तुम्ही शेवटची कथा/कविता लिहून इतकी वर्षे होऊन गेली तरीही तुमच्या चाहत्यांच्या मनावरची तुमच्या शब्दांची मोहिनी थोडीदेखील कमी झालेली नाही हे कालच्या गर्दीने उघड झालेच. हे श्रेय तुमचे आहे. मी अज्ञानी होतो तेव्हा मला माहिती नव्हते की लोक तुमचे फॅन्स आहेत आणि नुसते फॅन्स नाहीत तर चोखंदळ चाहते आहेत. प्रत्येकाला सगळ्या कथा माहिती असतात, कादंबरीतील पात्रे माहिती असतात. त्यातही त्याच्या आवडी निवडी असतात! आपल्या आवडी निवडी डिफेन्ड करताना त्यांच्याजवळ मुद्दे सुद्धा असतात.. आता मी देखील त्यांच्यातलाच एक आहे! आणि याचा मला अभिमान आहे. हे आमचे विश्व आहे “सुशि” विश्व. काल तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी जमलेल्या रसिकांना बघून मला हे सुशि विश्व दिसले. त्यात तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळे आहेत. कसं जमलं हे तुम्हाला? केवळ प्रयत्नांच्या आधारे ही सिद्धी साध्य होते यावर माझा विश्वास नाही, निश्चितच देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी होता. त्याशिवाय सुहास शिरवळकर नाव ऐकताच लोकांचे डोळे चकाकले नसते.
प्रिय सुहास शिरवळकर “सुशि”, तुम्ही समर्थांचे “मरावे परी कीर्तिरूपे उरावे” हे वचन सत्य करून दाखवलेत!
कार्यक्रमाची सांगता झाल्यावर मी मंचाजवळ आलो. काकूंना भेटलो.. तुम्ही कुठेतरी निघून गेला होता! माझी खात्री आहे तुम्ही किमान एकदा तरी मला बघितलं असणार.. तुमचा कविता संग्रह घेतला आहेच, लवकरच वाचन सुरु होईल. एक गोष्ट राहून गेली जी थोडी मनात खुपते आहे.. तुमच्या पायांना स्पर्श करणं, तुमचा हात हातात घेणं तेवढं राहून गेलं!
कधी भेट होईलच..
त्या क्षणाची वाट पाहतोय!
आपला,
रोहित बापट (हृद्रोग)