वृत्ताचे नाव – चंद्रकांत (पतितपावन)
वृत्त प्रकार – मात्रावृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – २६
मात्रांची विभागणी – चंद्रकांत (पतितपावन) वृत्तात प्रत्येक चरणात २६ मात्रा असतात, त्यामुळे हे समवृत्त आहे.
यति – ८ व्या आणि १६ व्या मात्रेवर
नियम –
प्रत्येक चरणात २६ मात्रा
चरणांत मात्रांची विभागणी ८+८+८+२ अशी असते (काही ठिकाणी ही विभागणी ८-८-६-४ अशी देखील आढळते)
चंद्रकांत (पतितपावन) बद्दल माहिती
चंद्रकांत वृत्ताला पतितपावन का म्हणतात हे कुठे स्पष्ट दिलेलं नाही. पण जुन्या उल्लेखांवरून हे स्पष्ट आहे की पतितपावन हे नाव तसे अर्वाचीन आहे. आमचा कयास असा की या वृत्तात बांधलेले संत नामदेव महाराज यांचे पद
पतीतपावन नाम ऐकुनी – आलो मी द्वारा
पतीतपावन न होसि म्हणुनी – ज़ातो माघारा
कारण याखेरीज या नावाच्या छंदाचा विशेष उल्लेख आढळत नाही. हा छंद जास्त करून कथारूप काव्यांत आणि गझलांमध्ये वापरलेले दिसते.
चंद्रकांत (पतितपावन) वृत्ताची उदाहरणे
चंद्रकांत (पतितपावन) वृत्ताचे अत्यंत उत्तम आणि लक्षात ठेवायला सोपे उदाहरण म्हणजे भा रा तांबे यांची “तीनी सांजा सखे, मिळाल्या” कविता
तीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला (२२ २२ १२ १२२ २२ १११ १२ = २६)
आजपासुनी जिवें अधिक तूं माझ्या ह्रदयाला. (२१२१२ १२ १११ २ २२ ११२२ = २६)
कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा, (१११२१ २ १२१२२ २२ २ ११२ = २६)
चक्रवाल हें पवित्र, ये जी शांत गभीर निशा, (२१२१ २ १२१ २ २ २१ १२१ १२ = २६)
त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा- (१२१२२ २२१ २२ १११ २१ १२ = २६)
साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला. (२२ २२ १११ १११ २ ११ ११ ११ ११२ = २६)
चंद्रकांत (पतितपावन) वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
पतीतपावन नाम ऐकुनी – आलो मी द्वारा
पतीतपावन न होसि म्हणुनी – ज़ातो माघारा
– (“संत नामदेव महाराज)
घुमव घुमव एकदा फिरुनि तो गोड तुझा पांवा,
सोनें झालें शेत पिकुनि हें, करितें मी धावा.
लख्ख पसरलें शेतावर या निर्मळ बघ ऊन,
पसर तसा तूं जादु तुझाही पांवा फुंकून.
त्या जादूनें वनदेवीची भूमि बने शेत,
कीं स्वर्गचि तो ओढुनि आणी क्षणामधें येथ !
– (“दुष्काळानंतरचा सुकाळ”, भा रा तांबे)
चंद्रकांत (पतितपावन) वृत्तातील भा रा तांबे यांची आणखीन एक रचना पाहा
मध्यरात्रिच्या निवांत समयीं रे माझ्या ह्रदया,
गत घटिकांतुनि किती भटकशिल सांग अतां सखया.
गतकाळाचें श्मशान यापरि जागवितां घटिका
भुतें जागतिल, मुखें वासतिल, खेळ परी लटिका.
निज निधनीं निधनातें नेलीं आशांसह रत्नें,
वदनीं त्यांच्या दिसोत; मिळतिल काय अशा यत्नें ?
– (“गतकाल”, भा रा तांबे)
बघुनी सुंदर दृश्ये, ऐकुनि मोहक वा गीते
स्वस्थ चित्त परि पर्युत्सुक ते कोणते न होते
सुरम्य सुंदर भयाण भीषण सृष्टीची चरिते
सारखेच मम चित्त हुरहुरे बघुनी दोघांते
– (“भिकारी”, पुरुषोत्तम मंगेश लाड)
“प्रेम तयावर होतं तर मग तुमचं ना भारी ?”
“छे छे ! कसलं ? लेक नृपाची मी, तो व्यापारी !”
“कुंवरजीस दावितां जवाहिर तो, तुम्हि त्यावरती
दृष्टि रोखिली स्नेहें वरचेवर हळु कां तर ती ?”
“छे छे ! भलतं ! खुळे, तयावर का रत्नावर ग ?”
“खुळीच मी, मज कशीं कळावीं मनांतलीं बिंगं ?
बोलुं लागतां कान दिला जरि चपापलां स्वांतीं !
डोळ्यावरुनी गालीं कितिदा क्षणिं झळके कांती !”
– (“राजकन्या आणि तिची दासी”, भा रा तांबे)
चंद्रकांत (पतितपावन) वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!