December 2, 2024
दिंडी वृत्त – नियम आणि उदाहरणे

दिंडी वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – दिंडी

वृत्त प्रकार – मात्रावृत्त

वृत्त मात्रा संख्या – १९

मात्रांची विभागणी – ९ + १०

यति – ९ व्या मात्रेवर

नियम – दिंडी वृत्त एक मात्रावृत्त किंवा जाति आहे. दिंडी वृत्तात पंक्तीमध्ये अक्षरसंख्या सामान असण्याची सक्ती नसते. म्हणजे एका पंक्तीत १२ अक्षरे आणि दुसऱ्या पंक्तीत १४ अक्षरे असू शकतात. आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे दिंडी वृत्तात शेवटची दोन अक्षरे गुरू (दीर्घ) असणे गरजेचे आहे. वृत्ताच्या शेवटी अनुप्रास किंवा यमक गरजेचे आहे.

उदाहरणे

तुझी चिंता ती दूर करायातें (१२ १२ २ २१ १२२२ = १९ मात्रा, ११ अक्षरे)
करुनि आलो सखि लग्ननिश्चयाते । (१११ २२ ११ २१२१२२ = १९ मात्रा, १३ अक्षरे)
विभव-सद्‌गुण-कुल-रूपयुक्त ऐसा (१११ २११ ११ २१२१ २२ = १९ मात्रा, १४ अक्षरे)
असे जामाता रतिस मदन जैसा ॥ (१२ २२२ १११ १११ २२ = १९ मात्रा, १३ अक्षरे)
– (संगीत सौभद्र – अण्णासाहेब किर्लोस्कर)

तया कासारी राजहंस पाहे (१२ २२२ २१२१ २२ = १९ मात्रा, ११ अक्षरे)
राजहंसाचा कळप पोहताहे (२१२२२ १११ २१२२ = १९ मात्रा, १२ अक्षरे)
तयासाठी हे वापिकाच पोहे (१२२२ २ २१२१ २२ = १९ मात्रा, ११ अक्षरे)
नळे केली हें कोण म्हणे नोहे (१२ २२ २ २१ १२ २२ = १९ मात्रा, ११ अक्षरे)
– (नलराजा आणि हंस – रघुनाथ पंडित)

दिंडी वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

चला माघारी मार्ग बंद आहे
मार्ग बंदीला विबल लोक साहे..!
उडे आकाशी विहग तोचि होता
रडे नियतीला त्यास कवण त्राता?
– (रोहित बापट)

राजपुत्रा ! हा रोष पुरे आतां
केंवि चढला हा कोप देव चित्ता
करा पुरुषोत्तम शीघ्र मजशिं आज्ञा
काय करणे ते मजशिं कथा प्राज्ञा
– (अभिषेक नाटक, मूळ कवी – भास, अनुवाद – कृष्णाजी लक्ष्मण सोमण)

नयन गेले खोल हे काळजीने
तयांभोंवति परिवेष कृष्णवर्णे
दिसति पाडुंर जागरें गाल हे ही
तयांवरची रक्तिमा नेत्रि येई
– (मति विकार, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर)

स्वयश गेलें स्वर्गात रहायाला
काय जाशी ते स्वतां पाहायाला
जरी साध्वीला स्वगं असे भोग्य
पतीवांचुनि भोगणे नसे योग्य
– (मृच्छकटिक, परशुरामपंत गोडबोले)

बहुत दिन नच भेटलों सुंदरीला ।
म्हणुनि धरुनी बैसेल रुष्टतेला ॥
करिन जेव्हां मी बहुत आर्जवाला ।
पात्र होईन मग मधुर सुहास्याला ॥
– (“संगीत सौभद्र”, अण्णासाहेब किर्लोस्कर)

Click to rate this post!
[Total: 3 Average: 4.7]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *