वृत्ताचे नाव – सूर्यकांत (समुदितमदना)
वृत्त प्रकार – मात्रावृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – २६
मात्रांची विभागणी – सूर्यकांत (समुदितमदना) वृत्तात प्रत्येक चरणात २६ मात्रा असतात, त्यामुळे हे समवृत्त आहे.
यति – ८ व्या आणि १६ व्या मात्रेवर
नियम –
प्रत्येक चरणात २७ मात्रा
चरणांत मात्रांची विभागणी ८+८+८+१+२ अशी असते.
सूर्यकांत (समुदितमदना) बद्दल माहिती
सूर्यकांत वृत्त एक समवृत्त मात्रावृत्त आहे. बराचसा भाग पद्म म्हणजे ८ मात्रांच्या विभागात असल्याने या वृत्ताचा उपयोग गझलांत झालेला अधिक दिसतो.
चंद्रकांत आणि सूर्यकांत या मात्रांमध्ये केवळ एका मात्रेचा फरक आहे. अर्थातच चंद्रकांत वृत्तात एक मात्रा कमी आहे! या ठिकाणी आम्हाला इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा यांची आठवण झाली!
समुदितमदना हा शब्द समुदित आणि मदना या दोन शब्दांच्या संधीतून आलेला आहे. समुदित म्हणजे काठोकाठ भरलेला, पूर्ण, संपृक्त किंवा भरपूर आणि मदना म्हणजे मादक द्रव्य. थोडक्यात भरपूर मादक द्रव्य असा अर्थ बनतो! या वृत्तात केलेली रचना ऐकणाऱ्याला मोहित करते जणू मदिरापान! याचे फार सुंदर उदाहरण कवी जयदेव रचित “गीतगोविंद” मध्ये आहे. ते पुढे देऊच.
सूर्यकांत (समुदितमदना) वृत्ताची उदाहरणे
सूर्यकांत (समुदितमदना) वृत्ताचे अत्यंत उत्तम आणि लक्षात ठेवायला सोपे उदाहरण म्हणजे भा रा तांबे यांची “गुराख्याचे गाणे” कविता
कुरणावरती वडाखालती गाइ वळत बैसतों
स्फटिकापरि निर्मळ हा खळखळ झरा जवळ वाहतो.
पावा फुंकुनि मंजुळ नादें रान भरुनि टाकितों,
आनंदानें डोळे भरतां प्रभुजीला प्रार्थितों.
गाईंमागें रानोमाळीं शीळ भरत हिंडतों,
दर्यादर्यांतुनि रान-ओहळावरी मौज मारितों.
– (“गुराख्याचे गाणे”, भा रा तांबे)
या वृत्ताचे फारच उत्तम संस्कृत उदाहरण म्हणजे कवी जयदेव याच्या गीतगोंविंद मधील गीत
समुदितमदने रमणीवदने चुम्बनवलिताधरे ।
मृगमदतिलकं लिखति सपुलकं मृगमिव रजनीकरे ॥
रमते यमुनापुलिनवने विजयी मुरारिरधुना ॥ १ ॥
घनचयरुचिरे रचयति चिकुरे तरलिततरुणानने ।
कुरबककुसुमं चपलासुषमं रतिपतिमृगकानने ॥ २ ॥
घटयति सुघने कुचयुगगगने मृगमदरुचिरूषिते ।
मणिसरममलं तारकपटलं नखपदशशिभूषिते ॥ ३ ॥
– (“गीतगोविंद – सर्ग ७, गीत १५”, कवी जयदेव)
सूर्यकांत (समुदितमदना) वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
थोर कवयित्री शांता शेळके यांची सूर्यकांत वृत्तातील कविता पाहा
आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज साउली
मृदुल, कोंवळी, श्यामल हिरवळ पसरे पायांतळी
आणिक पुढतीं झरा खळाळत खडकांतुन चालला,
साध्याभोळ्या गीतामध्यें अपुल्या नित रंगला !
– (“इथें”, शांता शेळके)
बालकवींची सूर्यकांत (समुदितमदना) वृत्तातील कविता पाहा!
ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन ।
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून ॥
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे ।
शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे ॥
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे।
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे ॥
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर।
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर ॥
– (“औदुंबर”, बालकवी)
सूर्यकांत (समुदितमदना) वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!