November 14, 2024
कामदा वृत्त – नियम आणि उदाहरणे

कामदा वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – कामदा

वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त

वृत्त मात्रा संख्या – १६

वृत्त अक्षर संख्या – १०

गणांची विभागणी – र, ज, य, ग

यति – निश्चित नियम नाही

नियम
कामदा वृत्तात रा, य, ज, ग गण -U- | U– | U-U | म्हणजे २१२१२२१२१

कामदा बद्दल माहिती

संस्कृत व्याकरणात डोकावून पाहिलं तर या नावाचे वृत्त किंवा छंद सापडत नाही. याचा अर्थ हे वृत्त प्राकृतात उत्पन्न झाले असे दिसून येते. “कामदा” चे पुढीलप्रमाणे संस्कृत अर्थ आहेत देवी काली, कामना पूर्ण करणारी, नागवेल, खायच्या पानाची वेल. या सगळ्यांचा या छंदाशी नक्की संबंध काय आहे हे समजणं कठीण आहे. पण, गणांची फोड अँड छोटे स्वरूप यांमुळे कथनासाठी हे वृत्त उत्तम आहे. विशेषतः अनेक जुन्या कवींच्या काव्यांच्या वर “कामदेच्या चालीत” असे लिहिलेले आढळते. हे वृत्त संगीत नाटकांमध्ये अगदी सढळ हाताने वापरलेले आहे. काही ठिकाणी कामदा वृत्ताची मोडतोड झालेली पण आढळेल. उदाहरणार्थ संगीत सौभद्र मधील हे पद

जन्म घेति ते कोणच्या कुली
वसति नित्य ते कोणत्या स्थली
जनक-जननि ही असति की तया
द्रव्य किति दिले दिवस किति वया ॥१॥

हे वृत्त मराठी खेरीज इतर भाषांमधील काव्यांमध्ये देखील वापरले आहे.

वृत्ताचे लक्षणसूत्र

बोलती कवी तीस कामदा ॥
रा य जा ग हे येति ज्या पदा॥
अक्षरें तिथें मोजितां दहा ॥
भो दयानिधे वारि ताप हा ॥

कामदा वृत्ताची उदाहरणे

घोर हा नको फार कष्टलों ॥ (२१ २ १२ २१ २१ २)
स्व हितास मी व्यर्थ गुंतलों ॥ (२ १२१ २ २१ २१२)
वारिं शीघ्र संसारयातना । (२१ २१ २२१२१२)
हे दयानिधे श्रीगजानना ॥१॥ (२ १२१२ २१२१२)
– (गोसावीनंदन)

कामदा वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

आज यामिनी रात जागवी
जाग ही मला वाटते हवी
यातना हवी आणखी कुणा
तू उभी अशी भाळुनी मना
– (रोहित बापट)

काम दायिनी प्रार्थये श्रियं
कंज लोचनां श्री शुभाप्तये
या मनु स्मरन्सर्व पूजितो
जायते धरा मंडले महान्
– (संस्कृत श्लोक)

स्वार्थ में सनी राजनीति है।
वोट नोट से आज प्रीति है।
देश खा रहे हैं सभी यहाँ।
दौर लूट का देखिये जहाँ।।
– (वासुदेव अग्रवाल)

दूर घालवी कोण आपदा,
वन्दितों सदा मी तिच्या पदां;
स्वर्विलासिनी काव्यशारदा,
जाणती कवि हीस कामदा
– (माधव ज्युलियन)

कामदा वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *