वृत्ताचे नाव – प्रियंवदा
वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – १६
वृत्त अक्षर संख्या – १२
गणांची विभागणी – न, भ, ज, र
यति – ४ – ४ अक्षरांनंतर
नियम –
प्रियंवदा वृत्तात न, भ, ज, र गण U U U | – U U | U – U | – U – आणि मात्रा १११ । २११ । १२१ । २१२
प्रियंवदा बद्दल माहिती
प्रियंवद म्हणजे संस्कृतमध्ये गोड, प्रेमळ बोलणे, किंवा सहमत होणे. त्यामुळे प्रियंवदा म्हणजे सुमधुर, प्रेमळ बोलणारी. या वृत्तातील पहिल्या भागात नगण आणि भगण असल्याने एक वेगळीच लय मिळते. काव्य रचण्याला तसे अवघड वृत्त. शक्यतो प्रेम कविता, मृदुभाव यांसाठी या वृत्ताचा किंवा छंदाचा उपयोग केला जातो.
यानावाचे एक पात्र कवी कालिदास यांच्या शाकुंतल नाटकात आले आहे. इतर पंथातील कथांमधूनही या नावाची पात्रे आलेली दिसतात. नावाप्रमाणे चंचल आणि मधुर बोलणारे हे शाकुंतल मधील पात्र!
इतर वृत्तांशी साम्य
जगण च्या जागी भगण आला की द्रुतविलम्बित
रगण च्या जागी यगण आला की द्रुतपदा
वृत्ताचे लक्षणसूत्र
१.
कवि भले म्हणति ती प्रियंवदा ॥
न भ ज रा गण असे जिच्या पदा ॥
चरणिचीं असति अक्षरें रवी ॥
न करि तो अनय जो असे कवी ॥
– (“वृत्तदर्पण”, परशुराम बल्लाळ गोडबोले)
२.
भुवि भवेन्नभजरैः प्रियंवदा ॥
– (“रत्नालंकार”, केदार भट्ट)
प्रियंवदा वृत्ताची उदाहरणे
मुनिजनीं मदनसा दिसे सये ॥ (१११२ १११२ १२ १२)
मज गमे वर तुझ्या मनास ये ॥ (११ १२ ११ १२ १२१ २)
जनकजेस रिझवूनियां तदा ॥ (१११२१ ११२१२ १२)
वदतसे निजसखी प्रियंवदा ॥ (१११२ १११२ १२१२)
– (परशुराम बल्लाळ गोडबोले)
प्रियंवदा वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
त्रिविधकर्ममलदोषनाशकृत्।
त्रिभुवनेऽग्रशिखरे विराजते।
त्रिभुवनाधिप! सदा पुनीहि मां!
सहजमात्मजसुखं प्रदेहि मे।।
– (“श्री अनंतजिन स्तोत्र”)
सजल सांजवन शांत झोपले
मन विझावुन युगांत लोपले
उसवला दिन दुपार ये घरा
तुटकसे जीवन जा न सत्वरा
– (रोहित विजय बापट “हृद्रोग”)
(१११ २१ १ १२ १२१ २)
मधुर बोल सखये जरा उरी
कुमुद धुंद भ्रमरा मनी धरी
सुहृद होशि ललने प्रिती पहा
प्रणय काळ न जळो उल्हास हा
– (रोहित विजय बापट “हृद्रोग”)
शिवशिषेति हृदि यः स्मरेंमुदा वसति तस्य कमला गृह सदा
वदति वाग्धरिगर्णश्च खर्वदरा थवत्ति साऽभ्युदयदा प्रियम्वदा
– (“रत्नालंकार”, केदार भट्ट)
प्रणयतत्परमिमं सखि प्रियं, मधुर मालप मयैव शिक्षीता
विधुरिता समदकोकिलारवैर, यदि भविष्यसि मधौ प्रियम्वदा
– (“मत्तकोकिलमित्यन्ये”)
प्रियंवदा वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!