वृत्ताचे नाव – भुजंगप्रयात
वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – २०
वृत्त अक्षर संख्या – १२
गणांची विभागणी – य, य, य, य
यति – १० व्या मात्रेवर
नियम –
भुजंगप्रयात वृत्तात चार य गण येतात य म्हणजे U– | U– | U– | U– म्हणजे १२२ । १२२ ।१२२ । १२२
भुजंगप्रयात बद्दल माहिती
भुजंगप्रयात वृत्ताला अथवा छंदाला असे नाव पडले याबद्दल विशेष माहिती मिळाली नाही. पण, भुजंगप्रयात या शब्दाची फोड मात्र नक्की करता येईल. भुजंग म्हणजे नाग आणि प्रयात म्हणजे गेलेला अथवा मेलेला. यावरून एक कयास लावता येऊ शकतो की, एखादा मेलेला नाग जसा मारून पडल्यावर त्याचे वेटोळे लाटांच्या सारखे वर-खाली दिसतील तसे या वृत्तात स्वर एका निश्चित समीकरणासारखे वर खाली होतात. पण, याची पुष्टि करणे अवघड आहे.
भुजङ्गप्रयातं भवेद् यैश्चतुर्भिः, त्यामानाने लक्षात ठेवायला सोपे असे हे वृत्त असंख्य ठिकाणी वापरले गेलेले आहे. मराठी, संस्कृत सह हिंदी, गुजराथी आणि इतर प्राकृत भाषांमध्येही याचा मुक्त हस्ते वापर केलेला आहे. प्रत्येक चरणातील गण सामान असल्यामुळे हे समवृत्त आहे. विशेष म्हणजे या वृत्ताचा आणि त्याच्या नियमाचा उल्लेख अग्नि-पुराणात देखील सापडतो! शक्यतो मंत्र, श्लोक आणि स्तोत्रे यांसाठी या वृत्ताचा वापर विपुल प्रमाणात आढळतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक!
वृत्ताचे लक्षणसूत्र
म्हणावें तयाला भुजंगप्रयात ॥
क्रमानेंच येती य चारी जयांत ॥
पदीं ज्याचियां अक्षरें येति बारा ॥
रमानायका दु: ख माझें निवारा ॥
भुजङ्गप्रयातं भवेद् यैश्चतुर्भिः
भुजंगप्रयात वृत्ताची उदाहरणे
मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें ॥ (१२ २१२ २१२२१ २२)
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ (१२ २१२ २१२२ १२२)
जनीं निंद्य तें कर्म सोडोनि द्यावें । (१२ २१ २ १२ २२१ २२)
जगीं वंद्य तें सर्वभावें करावें ॥ (१२२ १२ २ १२२ १२२)
– (“मनाचे श्लोक”, श्री समर्थ रामदास स्वामी)
जनीं सर्वसूखी असा कोण आहे। (१२ २१२२ १२ २१ २२)
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ (१२२ १२ २१ २२१ २२)
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। (१२ २१ २ २१२२१ २२)
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥ (१२२१२ २१२ २१ २२)
– (“मनाचे श्लोक”, श्री समर्थ रामदास स्वामी)
भुजंगप्रयात वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
मनासारिखी सुंदरा ते अनन्या ।
मना सारिखे पुत्र जामात कन्या ॥
सदा सर्व दा बोलती रम्य वाचा ।
जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥१॥
– (“सुकृत योग”, श्री समर्थ रामदास स्वामी)
असो सर्व हें जुंपलें घोर युद्ध ।
जनाला गमे मृत्युचें तोंड शुद्ध ॥
कशीं जाळितें नित्य चिंता मना ही ।
कसें काय होईल हा नेम नाहीं ॥
(“तिकुडचे पहिले पत्र”, अनंत कृष्णाजी आठल्ये)
मुलें खेळती नाचतीही मजेनें,
तयांचा अहो कोण उल्हास वाने ?
फुलें, तारका, ते दंवाचे तुषार,
तशीं मुग्ध हीं बालकें दिव्य फार !
अशी तेथली पाहुनी रम्य लीला,
मुखीं घालूनी ठाकलों अंगुलीला;
वदे मित्र मातें—“ पुढें चालणें ना ? ”
परी पाय तेथूनियां काढवेना !
– (केशवसुतांच्या “कविता आणि प्रिती” कवितेतील काही पंक्ती)
दिलें धान्य तें द्रव्य सोंने द्विजाला ।
तयाला न ते नववें भार झाला ॥
पथीं चालतां टाकि काढून काहीं ।
मनीं मानुनी हर्ष आला स्वगेही ॥
– (श्री दासगणु महाराज यांच्या, “संत दामाजींचे चरित्र” यातून)
वदे वेद ऋग्वेद तो ज्ञानदेवा । पुढें तो यजु साम तैसाच गावा ॥
करावा स्वरोच्चार बा स्पष्टतेनी । श्रुती ऐकतां थक्क व्हावें द्विजांनीं ॥
– (“श्री ज्ञानेश्वरमहाराजांचे चरित्र”, दासगणु महाराज)
करी एक विज्ञप्ति चित्ता सुपात्ना ॥
वृथा हिंडसी या किती जन्मयात्रा ॥
त्वजीं सर्य चांचल्य निश्वीत राहीं ॥
निजानंदनामें निजानंद पाहीं ॥
– (“पदसंग्रह-पंचक”, श्री रंगनाथस्वामी)
भुजंगप्रयात वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!
सुवक्षोगकुंभां सदापूर्णकुंभां
शारदाभुजंगप्रयात आदिशंकराचार्य
धन्यवाद!!