वृत्ताचे नाव – वसंततिलका
वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – २१
वृत्त अक्षर संख्या – १४
गणांची विभागणी – त, भ, ज, ज, ग, ग
यति –
नियम –
वसंततिलका वृत्तात त भ ज ज ग ग गण आणि शेवटी एक ग (गुरू) म्हणजे – – U | – U U | U – U | U – U | – – आणि मात्रा २२१ । २११ । १२१ । १२१ । २२
वसंततिलका बद्दल माहिती
वसंततिलका एक प्राचीन वृत्त आहे ज्याचा उपयोग पुराणांपासून केला गेला आहे. क्षेमेंद्र यांच्या मते वसंततिलका वृत्त वीर रसाला, शौर्य भावनेला शोभून दिसतो. अर्थातच हे वृत्त केवळ या रसापुरते मर्यादित नाही. या वृत्ताला हे नाव कसे मिळाले याबद्दल पारशी माहिती मिळू शकली नाही. मिळाल्यावर नक्कीच इथे देऊ.
पण आमचा विचार असा की वसंत ऋतूचा मूलभूत रंग “पिवळा” आहे आणि त्याचा तिलक! म्हणजे शब्दांच्या कापली पिवळा टिळा. निश्चितच हे वृत्त सौम्य, शांत किंवा करून रसासाठी नाही. त्यातून शेवटी दोन गुरू असल्यामुळे प्रत्येक पंक्तीच्या शेवटी आघात येतात. त्यामुळे हे वृत्त काही गोष्ट ठसवून सांगण्यासाठी उपयुक्त वाटते! दुसऱ्या बाजूने पाहता पिवळा रंग आणि वसंत हे शब्द मनात येत आठवण येते ती कृष्णलीला आणि गोकुळाची. विविध रंगांची उधळण! अर्थातच हे आमचे वैयक्तिक विचार आहेत..
वृत्ताचे लक्षणसूत्र
१.
जाणा वसंततिलकाव्हय तेंच वृत्त ॥
येती जिथें त भ ज जा ग ग हे सुवृत्त ॥
संख्या चतुर्दश पदांतिल अक्षरांची ॥
होतें जनांत अपकीर्ति निरक्षरांचा ॥
– (“वृत्तदर्पण”, परशुराम बल्लाळ गोडबोले)
२.
उक्ता वसन्ततिलका तभजाः जगौ गः।
वसंततिलका वृत्ताची उदाहरणे
प्रेमें, सख्या धरिं हिला हृदयीं सदाही, (२२ १२ ११ १२ ११२ १२२)
दे टाकुनी; तुडविं ही अथवा पदांही ! (२ २१२ १११ २ ११२ १२२)
मातें दशा समचि या गमतात दोन्ही (२२ १२ १११ २ ११२१ २२)
माझी मलाच लखलाभ सदा असो ही ॥ (२२ १२१ ११२१ १२ १२ २)
– (“वाचकांस विज्ञापन”, राम गणेश गडकरी)
वसंततिलका वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
मी एकला फिरतसे बहुवार रानीं,
यालागुनी न समजा मजला अडाणी;
आराधुती विपिनदैवत मी तिथूनी
त्याचीं प्रसादवचनें मनुजास आणीं.
– (“सृष्टी आणि कवि”, केशवसुत)
हंसे तसी चतुरसंमत युक्ति केली ।
ते चाळवीत सुतनू बहु दूर नेली ॥
छाया तियेसि दुसरी, तिसरी वनाळी ।
जे सोवळी युवतितुल्य दिसे निराळी ॥
– (“दमयंती स्वयंवर”, रघुनाथ पंडित)
तांबुल भक्षुनि जिला निजतां हरीची ।
झाली स्मृती तव उठे त्यजुनी घरीची ।
राधा निघे त्वरित रात्रिंत जावयास ।
त्या देवसंततिलकास अणावयास ॥
– (“छंदोमंजिरी”)
शम्भुः स्वयम्भुहरयो हरिणेक्षणानां
येनाक्रियन्त सततं गृहकर्मदासाः ॥
वाचामगोचरचरित्रविचित्रिताय
तस्मै नमो भगवते कुसुमायुधाय ॥
– (“श्रुंगारशतकं”)
घोडे कधीं न खळती रविच्या रथाचे ॥
उल्लघितो पवन भाग सदा नभाचे ॥
भूभार शेष धरि संतत मस्तकांहीं ॥
राजास विश्रम तसा क्षणमात्र नाहीं ॥
– (“शाकुंतल”)
वसंततिलका वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!