वृत्ताचे नाव – अभंग (मोठा)
वृत्त प्रकार – अक्षरवृत्त
अक्षरांची विभागणी – प्रत्येक चरणात (ओवी अथवा कडवे) चार खंड असतात. पहिल्या तीन खंडांत ६ अक्षरे आणि शेवटच्या खंडात ४ अक्षरे.
यति – प्रत्येक खंडानंतर यति येऊ शकते.
नियम –
अभंग वृत्तात चरणात प्रत्येक खंडातील अक्षरांची विभागणी निश्चित असते. हे वृत्त यमकांना महत्व देणारे आहे. एका चरणात चार खंड. पहिल्या तीन खंडात ६ अक्षरे आणि शेवटच्या खंडात ४ अक्षरे. यमकाचा विचार केल्यास यातही दोन उपप्रकार पडतात.
पहिल्या उपप्रकारात पहिल्या तीनही खंडांचे यमक जुळते.
दुसऱ्या उपप्रकारात फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडांचे यमक जुळते.
अभंग बद्दल माहिती
अभंग वृत्त किंवा अभंग छंद हा लोकसाहित्यातून आणि भक्तिगीतांमधून उदयाला आलेले वृत्त आहे. अभंग वृत्ताचे मराठी साहित्यात विशेष महत्व आहे कारण अनेक थोर संतांनी या अभंगात रचना केल्या आणि त्यातून अध्यात्मिक व धार्मिक उपदेश लोकांपर्यंत पोहोचवले. या अभंगातील अक्षरांची विभागणी निश्चित असल्यामुळे अभंग चालीत गाणे सुकर होते.
अभंग वृत्ताची उदाहरणे
संत तुकाराम महाराजांचे अनेक लोकप्रिय अभंग या वृत्तात आहेत
सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ||
आनंदाचे डोही । आनंद तरंग ।। आनंदची अंग आनंदाचे ||
आम्हां घरीं धन । शब्दाचींच रत्नें ।। शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं ॥
– संत तुकाराम महाराज
याचप्रमाणे अनेक संतांनी अभंग वृत्तात रचना केलेल्या आहेत
चक्रवाक पक्षी । वियोगें बहाती ।। झालें मजप्रति । तैसें आतां ॥
– संत नामदेव महाराज
प्रकृति निर्गुण । प्रकृति सगुण ।। दीपें दीप पूर्ण । एका तत्त्वें ॥
– संत मुक्ताई
पण अभंग वृत्तात केवळ अध्यात्म आणि धार्मिक विषयांची मांडणी व्हावी असे बंधन कुठेही नाही.
अनेक कवींनी देखील अभंग वृत्तात रचना केलेल्या आहेत. त्यांच्यापैकी काही महत्वाचे कवी म्हणजे बा सी मर्ढेकर, विंदा करंदीकर, बा भ बोरकर
सकाळी उठोनि । चहा कॉफी घ्यावी ।। तशीच गाठावी । वीज गाडी
– बा सी मर्ढेकर
कारे नाडविसी । आपुल्या मनासी ।। पोषितो कुणासी । जगी कोण
– विंदा करंदीकर
संधिप्रकाशांत । अजून जो सोने ।। तो माझी लोचने । मिटो यावी
– बा भ बोरकर
ग ह पाटील यांची “देवा तुझे किती” ही कविता देखील याच छंदातील आहे
देवा, तुझे किती । सुंदर आकाश । ।
सुंदर प्रकाश । सूर्य देतो
आणखीन एक उदाहरण माझ्या कवितेतील द्यावेसे वाटते
माझे हो लाजाळू । दरीतले गाव ।। वादळाची धाव । माथ्यावर
– रोहित बापट (हृद्रोग)
अभंग वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!
शब्दयात्री वर वृत्तांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा!