मनुस्मृती आणि गृहस्थाश्रम
मनुस्मृति, या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनुस्मृति मधील काही श्लोकांवर चर्चा आणि विनिमय करणार आहोत. अज्ञानामुळे आणि पूर्वग्रहांमुळे जवळजवळ निषिद्ध झालेला ग्रंथ म्हणजे मनुस्मृति. कित्येकजण मनुस्मृति न वाचताच त्याच्याविषयी आपले मत मांडताना दिसतात. हे संपूर्ण आणि विशुद्ध अज्ञान आहे. असो. या ब्लॉगमध्ये आपण मनुस्मृति मधील चार आश्रम आणि मुख्यतः गृहस्थाश्रम यांच्याविषयी विचार करणार आहोत. तसेच या अनुषंगाने संत एकनाथ महाराजांचा एक अभंग, तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या आयुष्यातील एक प्रसंग यांच्याविषयी देखील विचार करणार आहोत. आशा आहे की हा ब्लॉग वाचून झाल्यावर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे मिळतील.
मनुस्मृति मधील सहाव्या अध्यायात श्लोक क्रमांक ८७ ते ९० या श्लोकांमध्ये चार आश्रम (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास) आणि त्यात गृहस्थाश्रमाचे महत्त्व सांगितलेले आहे. श्लोक आणि त्यांचे मराठी अनुवाद खाली देत आहोत.
ब्रह्मचारी गृहस्थश्च वानप्रस्थो यतिस्तथा ।
एते गृहस्थप्रभवाश्चत्वारः पृथगाश्रमाः ॥ ८७ ॥
ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि यति (संन्यास) हे आश्रम खरे तर गृहस्थाश्रमातूनच पृथक्करणाद्वारे उत्पन्न झालेले आहेत.
सर्वेऽपि क्रमशस्त्वेते यथाशास्त्रं निषेविताः ।
यथोक्तकारिणं विप्रं नयन्ति परमां गतिम् ॥ ८८ ॥
जे विप्र (ज्ञानी) या चारही आश्रमांमध्ये शास्त्रांमध्ये सांगितल्यानुसार कर्म करतात ते निश्चितच मोक्ष (परम गति) प्राप्त करतात.
सर्वेषामपि चैतेषां वेदस्मृतिविधानतः ।
गृहस्थ उच्यते श्रेष्ठः स त्रीनेतान् बिभर्ति हि ॥ ८९ ॥
वेद आणि स्मृतींमधील विधानानुसार (सांगितल्याप्रमाणे) या चारही आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ आहे कारण उरलेले तीनही आश्रम गृहस्थाश्रमावर अवलंबून आहेत. गृहस्थाश्रम उरलेल्या तीनही आश्रमांचे पालन करतो आणि पोषण देखील.
यथा नदीनदाः सर्वे सागरे यान्ति संस्थितिम् ।
तथैवाश्रमिणः सर्वे गृहस्थे यान्ति संस्थितिम् ॥ ९० ॥
ज्याप्रमाणे नदी-नद (नद – मोठी नदी) आदी सगळे (शेवटी) समुद्रात जाऊन स्थिरावतात (थांबतात) त्याचप्रमाणे तीनही आश्रम शेवटी गृहस्थाश्रमात येऊन स्थिर होतात. (तीनही आश्रमांना शेवटी गृहस्थाश्रम आश्रय देतो, स्थिरता देतो)
गृहस्थाश्रम – काही विचार
थोडक्यात मनुस्मृति नुसार गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ आश्रम आहे. यात कुणाला गैर वाटण्याजोगे काहीच नाही. कारण शेवटी जन्म देणाऱ्यापेक्षा पालन-पोषण करणारा अधिक पुण्यवंत असतो. अर्थातच जन्मदात्याशिवाय अस्तित्व फलद्रूप होत नाही पण पालनकर्त्याशिवाय अस्तित्व हे मृत्यूपेक्षा भयंकर ठरू शकते. म्हणूनच जगाचा जो पालनकर्ता भगवान विष्णू (भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, पांडुरंग हे सगळे त्याचेच अवतार!) आहे त्याला आपले संत महात्मे माऊली किंवा आई देखील म्हणतात. जीवनरुपी गाडा सुरळीत सुरू ठेवणे हे गृहस्थ माणसाचे कर्तव्य आहे. हे संपूर्ण विश्व एक कुटुंब किंवा घर असेल तर त्याला चालवण्याचे कर्तव्य कर्त्या लोकांचे असते. उदाहरणार्थ, घरी जर कर्ता पुरुष आणि स्त्री आपापले कर्तव्य बजावत नसतील तर घराची, कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची स्थिती बिघडणार यात शंका नाही!
एक विशेष बाब जी लक्षात घेण्या जोगी आहे ती म्हणजे वरील कोणत्याही श्लोकात स्त्री – पुरुष हा भेदभाव, तसेच वर्ण भेद दिसणार नाही. जग शाश्वत सत्यावर चालते, मानवी संरचना केवळ व्यवस्थेसाठी असतात. ज्या प्रमाणे गाडीचे मुख्य उद्दिष्ट प्रवास आहे पण गाडीचे काही भाग नेहमी जमिनीशी संलग्न असणार, काही कायम चालवणाऱ्याच्या ताब्यात आणि काही ऊर्जेचे वाहक असणार, आणि काही केवळ शोभा म्हणून! याला पर्याय नाही. आपापल्या उपयुक्ततेनुसार माणूस जगात वावरत असतो, कर्म करत असतो. आपली उपयुक्तता धर्म, अर्थ आणि सत्य यांच्यासाठी वाढवणे हाच सन्मार्ग. नाहीतर निरुपयोगी आणि निरुद्योगी माणसांची जगात मुळीच कमतरता नाही. आपण त्यांच्यात सामील व्हायचे की नाही हे ज्याने त्याने ठरवायची गोष्ट!
गृहस्थाश्रम, संतांचे विचार व अनुभव
आज १३ मार्च २०२३, फाल्गुन कृष्ण षष्ठी म्हणजेच श्री एकनाथषष्ठी. संत एकनाथ महाराजांची जयंती.
या निमित्ताने त्यांचा संन्यासाश्रम आणि गृहस्थाश्रम यांच्याविषयीचा एक अभंग खाली देत आहे. अभंग तसा सरळ आहे आणि सामान्य लोकांना देखील समजेल असा आहे.
संन्यासी करी गृहस्थाश्रम । तेथें तया अधर्म वोढवला ॥१॥
~ संत एकनाथ महाराज गाथा (२६३२)
करपात्रीं भिक्षा हाचि त्याचा धर्म । न करितां अधर्म स्वयें जोडे ॥२॥
नाश करावे षड्वैरी नेमें । तया संन्यास कर्में म्हणिजेती ॥३॥
एका जनार्दनीं गृहस्थाची बरा । फजिती बाजारा उभ्या होय ॥४॥
संत एकनाथ महाराज म्हणतात की संन्यासाने गृहस्थाश्रम आचरण करणे म्हणजे अधर्म ओढवण्यासारखे आहे. भिक्षा मागणे (थोडक्यात कुठली लालसा, संबंध, भौतिक आकांक्षा न ठेवणे) हा संन्यासाचा धर्म. संन्यासाचे कर्म म्हणजे (स्वतःतील) षड्रिपुंचा (षड्वैरी) नाश करणे. असले (भ्रष्ट) संन्यासाश्रम पाळण्यापेक्षा गृहस्थाश्रम बरा (संन्यास न घेणं बरं) नाहीतर लोकांसमोर फजिती होते, निंदा नालस्ती होते.
या श्लोकातून संत एकनाथ महाराजांनी संन्यासी म्हणवणाऱ्या मंडळींच्या व्यभिचाराबद्दल ताशेरे ओढले आहेतच. पण एक सूक्ष्म गोष्ट अशी की गृहस्थाश्रमाबद्दल देखील सांगितले आहे, गृहस्थाश्रम बरा (चांगला) आहे भले तो तुलनात्मक असेना. कारण शेवटी गृहस्थ माणूसच पाखंड न करता गावगाडा चालवत असतो. या हा अभंग आणि वर नमूद केलेले मनुस्मृति मधील श्लोक यांच्यात काही संबंध आहे यात शंका नाही.
आता याच अनुषंगाने आणखीन एक घटना जिच्याबद्दल उघडपणे बोलले जात नाही ती म्हणजे माऊली यांना त्यांच्या आई-वडिलांमुळे भोगावे लागलेले दुःख. ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी संन्यासाश्रमाचा भंग केला. ज्याच्याबद्दल संत एकनाथ महाराज आपल्या ग्रंथात अधर्म म्हणतात. माऊलींनी जे दुःख भोगलं ते त्यांचे प्रारब्ध होते. याबद्दल आणखीन बरंच लिहिण्यासारखं आहे. पण तूर्तास हा इतकाच विचार प्रक्षेपित करण्याचा मानस आहे. माऊलींच्या आयुष्यातील दुःख आणि त्यात त्यांच्या आई-वडिलांचा, समाजाचा आणि धर्माचा सहभाग यांच्याविषयी आमचे मत ऐकायचे असल्यास तसे अभिप्रायात नक्की नमूद करा!
आशा आहे की हा प्रयास आवडला असेल. आवडल्यास आपल्या आप्त मंडळीपर्यंत नक्की पोहोचवा. आपले ग्रंथ, स्मृती आणि वेड यांच्याविषयी जलपर्णीसारखे पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी मदत करा आणि तुम्हीही प्रयत्न करा!
आणखीन अध्यात्मिक ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.