खिडक्या काळ्या कार्डबोर्डने झाकलेल्या, एक छोटा LED दिवा डावीकडच्या भिंतीवर खाली मन घालून मंदपणे जळत होता. त्याच्या खाली कॉम्प्युटर, माईक इत्यादी साधनसामग्री. धूसर काळोख दाटलेला, बाहेरचे आवाज दबलेले. वेळ दिवसाची असूनही, आत अंधार. अशांत अंधार. एका चित्रपटाच्या अनुषंगाने या साऊंड स्टुडिओ मध्ये जाण्याचा योग आला. एका फ्लॅट चे रूपांतर साऊंड स्टुडिओ मध्ये केलेले आहे. या आधी कधीही या साऊंड स्टुडिओमध्ये जाण्याचा योग आला नसल्याने, तिथल्या अनुभवांबद्दल किंवा तिथे घडणाऱ्या घटनांबद्दल मला माहिती असण्याचा संभव नव्हता. मी संवेदनशील आहे हे मला माहित आहे. तेव्हाही माहित होतं. मला हवेतील अदृष्य ऊर्जा जाणवतात. पण या साऊंड स्टुडिओ मध्ये मला असे अनुभव येतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. किंबहुना मला तशी अपेक्षाही नव्हती. पण…
या अंधाऱ्या साऊंड स्टुडिओ चे दार उघडून आत पाऊल ठेवल्या ठेवल्या एक विचित्र जाणीव झाली. मी लगेच त्याबद्दल वाच्यता केली नाही कारण “लोक काय म्हणतील?” या विचाराने शक्यतो मी हे लोकांना सांगत नाही. पण त्या ठिकाणी काहीतरी वेगळं जाणवत होतं, कुठली तरी गडद ऊर्जा तिथे एखाद्या दलदलीसारखी साखळून पडली होती हे निश्चित जाणवत होतं. स्टुडिओ ची खोली सोडली तर एका बाजूला एक बेडरूम, दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघर आणि त्याच्या पलीकडे आणखीन एक बेडरूम. फ्लॅटमध्ये कुटुंबाचे किंवा कुणाचेही पूर्णवेळ वास्तव्य नसल्याने घर ओकं ओकं वाटत होतं. एक प्रकारची पोकळी जाणवत होती. जणू पक्ष्यांची सोडून दिलेलं घरटं! स्टुडिओत गेल्या गेल्या मी इकडे तिकडे फिरू लागलो. का ते मला सांगता येणार नाही. पण कशाचा तरी शोध म्हणू शकता.
मला इकडे तिकडे शून्यात बघत फिरताना बघून साऊंड डिरेक्टर ने विचारलं
“तुला पण जाणवतं का? या फ्लॅटमध्ये बरंच काही घडतं. पूर्वीही घडलेलं आहे. तुला पण इंटरेस्ट आहे का यात?”
उत्तराखातर मी फक्त मान हलवली आणि हसलो.
अर्थात, काम करायचं होतं त्यामुळे मी माझी सहल तिथेच थांबवली. डबिंग सुरु असताना काही विशेष जाणवलं नाही. पण माझ्याबरोबर सिनेमात काम करणाऱ्या मित्राला मी माझ्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्याने विश्वास ठेवला कारण मी खोटं बोलत नाही हे त्याला माहित आहे. आणि या बाबतीत खोटं बोलून घाबरावणाऱ्यांपैकी मी नाही हे ही त्याला माहित आहे. काम करता करता दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सगळ्यांनाच भूक लागली होती. मला आणि मित्राला सोडून बाकी सगळ्यांना बाहेर खायला जायचं होतं. त्यामुळे आम्ही ऑनलाईन जेवण मागवलं. आमचे जेवण आल्यावर बाकीचे बाहेर पडले. आम्ही स्वयंपाकघराच्या बाजूला असलेल्या बेडरूममध्ये बसणार होतो आणि मित्रांना लॅच लावून घ्यायला सांगितलं कारण स्टुडिओ ची एकच किल्ली होती आणि आम्ही जेवत असताना उगाच उठून दार उघडण्यात काहीही अर्थ नव्हता. मित्र लोक लॅच लावून निघून गेले. आम्ही जेवू लागलो. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु होत्या. हे सुरु असताना देखील ती विचित्र शांतता आजूबाजूला अदृष्य धुक्यासारखी पसरली होती.
जेवण झाल्यावर आम्ही नुसतेच बसलो होतो आणि त्या शांततेत लॅचचा आवाज झाला. अगदी स्पष्ट आणि खणखणीत. आम्ही दोघांनी आवाज ऐकला. आम्हाला दोघांनाही वाटलं की आमचे मित्र परत आले! त्यामुळे आम्ही त्या घटनेकडे फार लक्ष दिलं नाही. पण काही सेकंद उलटून गेल्यानंतरही कुणाचा आवाज आला नाही. ना कुणी हाक मारली, ना कुणाच्या बोलण्याचा आवाज आला. हे आम्हा दोघांना जाणवलं. आम्ही काही क्षण एकमेकांकडे बघितलं आणि आम्ही काय समजायचं ते समजलो. वाचक याला भास म्हणू शकतात पण एकाच वेळी आम्हा दोघांना व्हायचं काही कारण नव्हतं. या विषयावर माझा थोडा फार अभ्यास असल्याने मी स्थिर होतो.
त्या क्षणानंतर मात्र आम्ही तशा गप्पा मारू शकलो नाही. मी एकदा बाहेरच्या खोलीमध्ये जिथे स्टुडिओ होता तिथे एक चक्कर मारून आलो. शांतता होती. मी परत आत आलो आणि बसलो. थोड्या वेळाने पुन्हा एकदा लॅचचा आवाज आला! आम्ही पुन्हा एकमेकांकडे बघितलं. पण काही वेगळा विचार मनात यायच्या आत माझ्याच एका मित्राचा आवाज आला! आणि आम्हाला जरा हायसं वाटलं.
हवा अजूनही जड वाटत होती. या फ्लॅटमध्ये कोणीतरी आहे हे मी समजून चुकलो होतो. साऊंड डिरेक्टरला घडलेली घटना सांगितली आणि म्हणालो,
“एकदा या फ्लॅटमध्ये मी कॅमेरे लावून संपूर्ण रात्र राहणार आहे”
अजून हा योग्य आलेला नाही पण इतर अनुभव आले. साऊंड डिरेक्टरकडून देखील काही घडलेल्या घटनांबद्दल ऐकायला मिळालं. त्याबद्दल पुढे लिहीनच. भूत होतं किंवा नव्हतं हे मी वाचकांवर सोडतो. पण, पहिल्याच दिवशी तो फ्लॅट, ते हवेतले जडत्व आणि अशांत धुक्यासारखा पसरलेला काळोख मनावर एखाद्या फोटोसारखा उमटला तो कायमचा!
आणखीन भुतांच्या गोष्टी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
One thought on “साऊंड स्टुडिओ मधील अनुभव – भाग १”