मराठीमध्ये सर्रास वापरला जाणारा शब्द “ऊहापोह”.
शब्द ऐकताच आपल्या मनात येतात ते तर्क – वितर्क यांचे द्वंद्व! एका अर्थी हा अर्थ देखील बरोबर आहे. पण या पोस्टचा उद्देश ऊहापोह शब्दाचा अर्थ सांगणे नसून त्याच्या व्युत्पत्तीबद्दल माहिती देणे आहे.
खूप कमी जणांना माहित असेल की ऊहापोह हा शब्द संस्कृतोत्भव आहे. ऊह आणि अपोह या दोन शब्दांची संधी म्हणजे ऊहापोह!
ऊह म्हणजे संस्कृतमध्ये तर्क देणे, निष्कर्ष काढणे, अर्थ सांगणे इत्यादी आहे आणि
अपोह म्हणजे याच्या बरोबर विरूद्ध कारण अपोह हा शब्द देखील अप + ऊह अशा संधीने बनलेला आहे. थोडक्यात प्रत्यक्षदर्शी निष्कर्षाला प्रतिप्रश्न करणे किंवा त्याच्या विरुद्ध तर्क देणे किंवा त्या निष्कर्षात अपवाद शोधणे म्हणजे अपोह.
जेव्हा या दोघांचे मंथन सुरू होते तेव्हा त्याला ऊहापोह असे म्हणतात!
मराठी मध्ये कधी कधी ऊहापोह हा शब्द बौद्धिक कष्ट या अर्थाने देखील वापरला जातो. पण, तो कितपत योग्य आहे हे घेतलेल्या कष्टावरूनच सांगणे इष्ट ठरेल!
त्यामुळे पुन्हा कधी ऊहापोह करायची वेळ आलीच तर त्याच्या व्युत्पत्तीचे स्मरण राहू द्या म्हणजे ऊहापोह योग्य तर्हेने करता येईल!