एक जुनी झेन कथा आहे. एकदा एक तरुण संन्यासी शांती च्या शोधात आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला,
“मला आत्मज्ञानाची खूप ओढ आहे, पण माझे मन स्थिर होत नाही. मला शांती कशी मिळेल?”
गुरू हसले आणि म्हणाले, “चल, माझ्यासोबत ये.”
त्यांनी संन्यासीला एका नदीकाठावर नेलं. नदी खळखळ वाहत होती.
गुरू म्हणाले, “ही नदी पाहा. ती कधी थांबत नाही, पण तरीही ती शांत आहे. तू तिच्याकडून काय शिकू शकतोस?”
संन्यासी गोंधळला. कारण त्याचा प्रश्न आत्मज्ञानाबद्दल होता. मग यात नदीचे वाहने कुठून आले?
तो म्हणाला, “पण नदी तर सतत वाहते, ती कशी शांत असेल?”
गुरू म्हणाले, “नदीचा स्वभावच वाहणे आहे. ती वाहत राहते, पण ती आपल्या मार्गाशी एकरूप आहे. ती ढासळत नाही, घाबरत नाही, किंवा थांबत नाही. तू तुझ्या मनाला लढायला सांगू नकोस. त्याला फक्त वाहू दे, निरीक्षण कर, आणि त्याच्यासोबत रहा. अशानेच तुला आत्मज्ञान मिळेल”
संन्याशाने डोळे बंद केले आणि नदीचा आवाज ऐकू लागला. काही वेळाने त्याला जाणवलं की त्याचं मन हलकं होत आहे, जणू नदीसोबतच वाहत आहे. तो शांत झाला. त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले!
बोध: मनाला थांबवण्याचा प्रयत्न करू नका; त्याला स्वीकारा आणि त्याच्या स्वभावासोबत वाहू द्या. शांती बाहेर नाही, ती तुमच्या आत आहे. हेच आत्मज्ञान आहे.
इतर झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा