दारू म्हटलं की लोक नाक मुरडतात. पण अशांसाठी गालिब म्हणतो “कंबख्त तू ने पी ही नहीं”. मद्य आणि काव्य यांचा तसाही अगदी वैदिक काळापासून संबंध आहे. प्रत्येक काळातील कवींनी आपापल्या परीने मद्य आणि काव्य यांच्या संयोगाने निर्मण होणाऱ्या आभासी पण पूर्णसत्य दर्शी विश्वाच्या छटा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच प्रयत्न विंदा करंदीकर यांच्या “प्यालो किती तरीही” या कवितेत आपल्याला आढळतो.
या कवितेत विंदा, जणू अशा एका विश्वातून वाचकाशी संवाद साधत आहेत जिथे “वास्तवाच्या पलीकडले” सत्य त्यांना दिसत आहे. ही अवस्था काहीशी नेणिवेच्या वाटेने जाते. इथे शब्द नसतात, जाणिवा नसतात फक्त सत्य असते. विशुद्ध सत्य. बऱ्याचदा हे सत्य बाहेरील विश्वाला अप्रामाणिक, अतार्किक किंवा थेट चुकीचे वाटते. पण याचे मुख्य कारण असे असते की, प्यालेला माणूस त्याच्या अनुभवांच्या आणि सत्याच्या संदर्भातून त्याच्या अव्यक्त सत्याला शब्दांचा आकार देऊ पाहात असतो. त्यामुळेच अनेकदा प्यालेला माणूस बोलू लागला की आपण त्याला “बरळतो” असे म्हणतो.
पण कधी तरी त्यांचे देखील कान देऊन ऐका. त्यांच्यापुरते का होईना पण स्वच्छ सत्य त्यांना सापडलेले असते. ही अनुभूती असते. उदारहर्णार्थ “कक्षेवर कललेल्या पृथ्वीचे” झुकण्याचे रहस्य असो किंवा दारूच्या शक्तीवर विश्वास न ठेवणारे “नास्तिक” असो. “पाप आणि पुण्याच्या” व्याख्या आपल्या मनाप्रमाणे बदलून डोक्यात त्यांचा गुंता करणारा “कॉकटेलकर्ता” असो किंवा शरीराच्या पेशींसारखा बाटलीतला “सांडलेला थेम्ब” असो. सगळ्या गोष्टी अवचेतन मनात (subconscious mind) स्पष्ट होत जातात. जगाच्या अचाट कोड्याचा एकेक तुकडा जागच्या जागी बसू लागतो. चित्र स्वच्छ दिसू लागते! अखेर आशा कुणाला नसते. खरं तर आशा नसती तर निराशा नसती आणि निराशा नसती तर मद्य केवळ कर्मकांडापुरते उरले असते.
“प्यालो किती तरीही” कवितेत रसिकांना याच विश्वाची सफर होईल यात शंका नाही.
प्यालों किती तरीही प्याले न मोजितो मी;
आहे पिता-पिवविता तो एक, मानतो मी.
अवकाश हाच प्याला अन् काळ हीच दारू;
थेंबात सांडलेल्या ग्रहगोल पाहतो मी.
कक्षेवरी उगा का कलते वसुंधरा ही ?
झुकली अशी कशाने तें एक जाणतो मी.
पापांत पुण्य मिसळी सत्यात अन् असत्य
जो कॉकटेलकर्ता, त्यालाच वानतो मी.
जो बाटलीत आहे, आहेच तो बुचात;
हें सत्य नास्तिकांच्या डोक्यांत हाणतों मी.
द्राक्षांत आजच्या या दारू असे उद्यांची,
आशा चिरंतनाची इतकीच ताणतो मी.
~ विंदा करंदीकर