एकदा कुठून कुठे जायचं हे नक्की झालं की पुढचा मुद्दा येतो तिकीटाचा. सध्या सगळी विमान तिकिटे ऑनलाईन जातात. त्यामुळे तिकीट काढल्यावर हातात येतं ते म्हणजे इ-तिकीट.
कुठल्याही इ-तिकीटावर खालील गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात..
१. प्रवास करणाऱ्याचं नाव (Passenger Names)
२. पी एन आर नंबर (PNR Number)
३. गंतव्याचे ठिकाण (विमानतळ) (Departure/Departs)
४. पोहोचायचे ठिकाण (विमानतळ) (Arrival/Arrives)
५. विमान क्रमांक (Flight Number) (वरच्या तिकिटात UK-989)
६. वर्ग (Class)
७. सामान संबंधी नियम (Luggage Rules and Regulations)
इ-तिकीट मिळाल्यावर सगळ्यात आधी तुमचे नाव, वेळा आणि ठिकाणे बरोबर आहेत की नाही ते नीट तपासून घ्या. इ-तिकिटावर दिलेले नियम एकदा तरी वाचा. प्रत्येक विमान कंपनीचे तिकीट रद्द करायचे नियम वेगळे असतात हे लक्षात ठेवा. तिकीट रद्द केल्याने सगळे पैसे परत मिळतील याची मुळीच खात्री नसते. त्यामुळे आधीच काळजी घेतलेली बरी!
पी एन आर (PNR Number)
इ-तिकिटावरची सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे पी एन आर नंबर. प्रत्येक तिकिटाचा एक वेगळा/स्वतंत्र (Unique) पी एन आर नंबर असतो. विमान कंपनीसाठी हा नंबर अत्यंत महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीची चौकशी करण्यासाठी हा नंबर ग्राह्य धरला जातो. चेक-इन करताना हा नंबर द्यावा लागतो (या बद्दल माहिती मी पुढील ब्लॉग मध्ये देईन).
सामान विषयक माहिती
भारतात आंतरदेशीय प्रवासासाठी सामान वाहण्याचे काही ठराविक नियम आहेत. हे नियम विमान कंपनी नुसार बदलू शकतात. तरीही मी पाहिलेले काही नियम जे बहुदा सगळ्या कंपन्यांचे सारखेच आहेत ते खालीलप्रमाणे..
१. विमानात केबिन साठी एकच बॅग चालते (पर्स, लॅपटॉप बॅग या मध्ये धरली जात नाही)
२. विमानात केबिन बॅग साठी वजन ७ किलो पेक्षा अधिक असू नये
३. प्रत्येक प्रवाशासाठी एकच मोठी बॅग (चेक-इन बॅग) चालते
४. चेक-इन बॅग साठी वजन १५ किलो पेक्षा जास्त असू नये
काही टिपा:
- विमान कंपन्या हल्ली सामानाच्या वजनांविषयक नियम काटेकोरपणे पाळतात, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालू नका.
- वजन जास्त भरल्यास सामान काढून ठेवावं लागतं, थोडक्यात फेकून द्यावं लागतं. त्यामुळे प्रवासाआधी वजन करून घ्या.
- पैसे भरूनही जास्त वजन घेऊन जाता येत नाही.
- सामानात कुठल्याही प्रकारची शस्त्रे आणि स्फोटक/घातक वस्तू घेऊन जाणं हा गुन्हा आहे.
- केबिन बॅग मध्ये १०० मिली च्या वर द्रवपदार्थ घेऊन जात येत नाही. (औषधे आणि बाळांचे दूध सोडून)
- औषधे बरोबर घेऊन जाता येतात. मी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन जवळ ठेवण्याचा सल्ला देईन.
इतर
इ-तिकिटावरच्या गंतव्याचा आणि पोहोचायचा टर्मिनल नीट बघून घ्या म्हणजे तिकडे पोहोचताना त्रास होणार नाही. काही वेळा विमान प्रवास टप्प्यात असू शकतो उदाहरणार्थ पुणे ते भोपाळ ते कोलकाता. अशा वेळी इ-तिकिटामध्ये दोन वेगवेगळ्या विमान प्रवासांची माहिती दिलेली असते. त्यामुळे पुणे ते भोपाळ आणि भोपाळ ते कोलकाता अशा दोन प्रवासाची नीट माहिती बघून घ्या.
कदाचित मधल्या टप्प्यावर (आपल्या उदाहरणात भोपाळ विमानतळावर) टर्मिनल बदलायची गरज पडू शकते. याबद्दल माहिती एजंट किंवा विमान कंपनीला जरूर विचारा. विमान कंपनीला विचारायचं झाल्यास तुमचा पी एन आर नंबर जवळ ठेवा.
!! सगळ्यात महत्वाचं !!
इ-तिकीट दाखविल्याशिवाय तुम्हाला विमानतळात प्रवेश मिळणार नाही. तसेच तुम्हाला बोर्डिंग पास सुद्धा मिळणार नाही!
तुमचे काही प्रश्न किंवा शंका असल्यास मला जरूर कळवा. तुम्ही ट्विट करू शकता https://twitter.com/ShabdyatriBlog किंवा फेसबुक पेज https://www.facebook.com/Shabdyatri वर