काही महिन्यांपूर्वी माझ्या आजीचे दुःखद निधन झाले तेव्हा अंत्यविधी साठी पुण्यातील ओंकारेश्वर येथील घाटावर जावे लागले. आमच्या आस्थेनुसार सर्व दिवसांचे विधी ज्या त्या दिवशी करण्याचे ठरवले. त्यामुळे सर्व दिवसांना अंत्यविधी च्या घाटावर जावे लागले. अर्थातच त्या दिवसात केवळ आमचेच नव्हे तर अनेक दुर्दैवी कुटुंबियांचे विधी घडले. पण त्या दिवसांत त्या घाटावर आणि परिसरात जे काही पाहिले आणि अनुभवले ते मात्र विचारात टाकण्याजोगे होते. मन सुन्न झालं. त्याबद्दल मी समाज माध्यमावर लिहिले देखील.
ज्या ज्या दिवशी मी ओंकारेश्वर घाटावर गेलो तेव्हा तेव्हा लोकांची गर्दी होती. पण त्या गर्दीकडे पाहून क्वचितच वाटत असे की इथे कोणाचे दुःखद निधन झालेले आहे किंवा अंत्यविधी सुरु आहेत. बऱ्याचदा दशक्रिया विधींना आलेली मंडळी जणू स्नेह संमेलनासाठी आले असल्यासारखे जमलेले दिसायचे. अंत्यविधीच्या ठिकाणी जाणाऱ्या वाटेच्या आणि पायऱ्यांच्या दुतर्फा छोटे छोटे घोळके करून लोक गप्पा मारताना दिसले. अशा ठिकाणी आणि अशा वेळी केवळ गप्प बसणे अवघड असते हे मी समजतो. कोणीतरी आपल्यात नसल्याची जाणीव आणि आठवणी उचंबळून आलेल्या असतात. पण, मी ज्यांना पाहिले त्यांना ते फक्त गप्पा मारत नव्हते.
मी ज्यांना पाहिले ते कधीही न भेटल्यासारखे, किंवा जुने मित्र अनेक वर्षांनी भेटल्यासारखे हसत खेळत, टाळ्या देत गप्पा मारत होते. काही जण शेअर मार्केट बद्दल, काही राजकारणाबद्दल आणि काही “आज काल काय करत आहे?” यावर अगदी उत्कटतेने बोलत होते. एका गटाला तर त्यांच्या क्षेत्रातील आणि कंपनीतील प्रोजेक्ट्स, त्यातील आंतरिक राजकारण यांच्यावर मोठ्याने आपले विचार मांडताना पाहिले. काही जण आज रात्री कुठे जायचे याबद्दल तर काही इथे आलो म्हणजे किती मोठे “टाईम मॅनेजमेंट” केले आहे अशा बद्दल बोलत होते.
हे सगळं सुरु असताना माझ्या मनात माझ्या कैलासवासी आजीबद्दल विचार येत होतेच. पण त्याच वेळेस माझ्या विश्वाच्या परिघापासून थोडे दूर जात, आणखीन एका मोठ्या परिघावर उभे राहून पाहिले तेव्हा माझ्या मनाने, “अरे इथे एक माणूस मेला आहे, त्याच्या पुढच्या प्रवासासाठी विधी होत आहेत. तो आता परत येणार नाहीये! किमान त्याची पुढची यात्रा सुरु होताना तरी जागेचे आणि काळाचे महत्व समजून घ्या.” असा चित्कार केला. वसंत कानेटकरांचे प्रसिद्ध नाटक, ‘अश्रूंची झाली फुले’ मधील एक वाक्य आठवले “गलबला करू नका, ज्युलियस मेलेला आहे!”
कधी कधी वाटतं की स्मार्ट फोन म्हणजे माकडाच्या हाती दिलेलं कोलीत तर नाही ना?
पिंडाला कावळा शिवणे म्हणजेच पिंडदान. लोकांची आस्था असो वा नसो माझी आहे. तसेच हा विधी मनोभावे करणाऱ्या मंडळींचा देखील विश्वास असतो. या ठिकाणी सगळे जीव मुठीत धरून असतात. पिंड समोर ठेवल्यावर प्रत्येक जण गेलेल्या व्यक्तीच्या आणि आपल्या संबंधांचे पुनरावलोकन करत असतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यावर विचार असतो, आतून पिंडाला कावळा शिवण्याची प्रार्थना करत असतो. मोठे जड वातावरण असते.
या ठिकाणी दूरस्थ मंडळींना पिंडाला कावळा शिवला की नाही हे समजून घ्यायची फार जास्त उत्सुकता निर्माण होते. खरं पाहिलं तर कावळा शिवला काय आणि न शिवला काय, दूरस्थ मंडळींच्या आयुष्यात फार फरक पडणार नसतो. तरीही स्मार्ट फोनच्या जमान्यात ही उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली आहे की माझ्या आजीच्या पिंडदानाच्या वेळेस, एक म्हातारी बाई एका तरुण मुलाला तिच्या कोणा तरी व्यक्तीच्या पिंडाला व्हिडीओ कॉल वरून दाखवायला सांगत होती. तो तरुण व्हिडीओ कॉल वर अनेकदा पिंडाच्या जवळ जात होता, अनेक पिंडांपैकी एका कडे बोट दाखवून, “दिसलं का?” विचारत होता. मला कीव त्या गेलेल्या व्यक्तीची आली.
तंत्रज्ञान आणि त्याचा सुयोग्य वापर याबद्दल मला बौद्धिक देणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मी स्वतः उच्चशिक्षित अभियंता आहे आणि अत्यंत विकसित तंत्रज्ञानावर काम करतो. पण त्या म्हातारीची ती उत्कंठा पाहून मनात विचार आला की हे तंत्रज्ञान आहे म्हणून वापरलेच पाहिजे का? एकंदरीत सगळे चित्र, जणू समोर कुठला तरी कार्यक्रम सुरु आहे आणि तो आप्तांना बघता यावा यासाठी केलेली खटपट, असे दिसत होते. माझ्या मनाला हे उद्योग मुळीच पटले नाहीत!
आजीच्या अंत्यविधी च्या दिवसांत, एका बाजूला विधींचे करुण सूर, एका बाजूला हे स्नेह संमेलन आणि यांच्या मध्ये मी अशा विचित्र परिस्थिती मी उभा! विचार करतोय की हे सगळे इथे का आले आहेत? “पूर्वीचा मी” असतो तर विधींना निरुपयोगी आणि कर्मकांड ठरवून मोकळा झालो असतो. पण इतक्या वर्षांच्या चिंतनानंतर आणि पुनर्विचारानंतर निश्चित सांगू शकतो की विधी निरुपयोगी आणि केवळ कर्मकांड नाहीत. पण या विधींना स्नेह संमेलन मानणाऱ्या मंडळींच्या मात्र विचारांच्या दिशेत काहीतरी नक्कीच चूक आहे.
ही माझी वैयक्तिक मते आहेत.
पूर्वी लिहिलेले ब्लॉग 👉🏻 लिंक
“देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ।। गीता २-१३ ।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।। गीता २-२२ ।।”