काही दशकांपूर्वी जी उत्सुकता सुशिंच्या नवीन कादंबरीच्या प्रकाशित होताना त्यांच्या चाहत्यांना जाणवत असेल तशीच काही उत्सुकता मी अनुभवली जेव्हा “अस्तित्व” ही कादंबरी प्रकाशित होणार असे समजले! अर्थातच मी “अस्तित्व” कादंबरी मागवली. मुखपृष्ठ पाहताच लक्षात आलं की या कादंबरीचा संबंध कला आणि कात्यक्षेत्राशी असला पाहिजे. मी देखील या क्षेत्राशी निगडित असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली.
कोणत्याही पुस्तकाच्या वाचनाची सुरुवात मी प्रस्तावनेपासून करतो. सुबोध भावे यांची प्रस्तावना वाचण्याजोगी आहे. नाट्यसृष्टीतील त्यांचे अनुभव आणि अस्तित्व यांची चांगली सांगड घातलेली दिसून येते. पुढे सम्राट शिरवळकर यांची देखील प्रस्तावना वाचली. त्यामधून सुशि, त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि अस्तित्व साठी त्यांनी घेतलेले कष्ट यांची नक्कीच जाणीव होते. मला देखील लेखक म्हणून काही नवीन शिकायला मिळालं. कादंबरी अनेक भागांमध्ये विभागलेली आहे, याचे कारण असे की ही कादंबरी पूर्वी एका मासिकातून एक एक भाग करत प्रसिद्ध झालेली आहे.
अस्तित्व कादंबरी शंभू, मानिनी आणि सृजन यांच्या भोवती फिरते. असे असले तरीही माझ्या मते अस्तित्व ही कथा/ कादंबरी, शंभू या स्वप्नाळू, महत्वाकांक्षी पण सुमार दर्जाच्या व स्व-अवलोकानापासून विन्मुख कलाकाराच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधाची आहे ज्याच्यात मानिनी आणि नंतर त्यांचा मुलगा सृजन यांच्या अस्तित्वाच्या शोधाची सत्वपरीक्षा सुरू होते. खरं सांगायचं झालं तर नाटकाच्या भाषेत, शंभू antagonist आहे, सृजन protagonist आणि मानिनी catalyst!
माणसाचे मन विचित्र आहे. मानसशास्त्र असे सांगते की मानवी मन वास्तव आणि अत्यंत प्रभावी आभास यांच्यात फरक करू शकत नाही. त्यामुळे आपण जर अत्यंत प्रभावीपणे मनाला एखादी काल्पनिक गोष्ट समजावली तर मन त्याला वास्तव समजू लागते. वास्तव मान्य नसलेल्यांना अशा आभासी जगाची गरज भासते. पण ते विसरतात की अखेर हे आभास आहेत. Wishful thinking! स्वतःचे न्यून माहिती असून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारा शंभू, आपल्यात एक उत्तम नट लपलेला आहे अशी स्वतःची समजूत करून घेतो व एक दिवस कोणाशीही सल्ला मसलत न करता अचानक नोकरी सोडून “struggle” सुरू करतो.
या दरम्यान जे काही नाट्यपूर्ण घडते, शंभुचे मोठे भाऊ आणि वाहिनी यांची मनोवस्था, मानिनी ची अगतिकता यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल!
अर्थातच शंभूला त्याच्या लायकीप्रमाणेच काम मिळते. कुटुंब चालवणं मोठे ओझे बनू लागते. वास्तव मान्य नसल्यामुळे आपल्या परिस्थितीला जग जबाबदार आहे या समजुतीने शंभू हळूहळू एका अंधाऱ्या विश्वात प्रवेश करतो. अपयशी माणसाची मानसिकता फार वेगळी असते. अपयश माणसाचे अस्तित्व अंतर्बाह्य पोखरून टाकते. अपयशी माणसाला एखादी तरी गोष्ट हवी असते ज्याचे श्रेय घेता येईल. नकारात्मकता आणि उदासीन वेढलेल्या अपयशी मनाला कुणाचे यश सुद्धा कटू वाटू लागते. तेच शंभुचे होते. शंभूचे ना आंतरिक अस्तित्व उरते ना बहिस्थ! पण या सगळ्यात फरफट होते ती त्याच्या पत्नीची, मानिनीची!
पण वास्तवाची पूर्ण जाणीव असलेली आणि नाट्यक्षेत्राची कुठलाही संबंध नसलेली मानिनी नाट्यक्षेत्रात काम करू लागते. अर्थातच शंभूच्या मनात असूया निर्माण होते. पण तिच्याच जीवावर घर चालत असल्याने शंभू बाष्कळ बडबड आणि दारू पिणे यांच्या पलीकडे काही करू शकत नाही. शंभू आणि मानिनी तृतीय श्रेणीच्या नाटकांच्या स्तरावरच होते. शंभूची कारकीर्द (जी काही थोडी फार होती ती) संपत चालली होती. यातच “सृजन” चा जन्म चक्क नाट्यगृहात होतो. इथे कादंबरी वेगळे वळण घेते. त्याच्या लहानपणातील नाट्यक्षेत्राशी निगडित घटनांसाठी तुम्हाला कादंबरी वाचणे क्रमप्राप्त आहे.
पात्रांचा विचार केला तर मला सृजन म्हणजे शंभूची प्रतिकृती वाटली स्वप्नाळू, महत्वाकांक्षी, अस्तित्वाच्या शोधात असलेला कलाकार. पण सृजन मध्ये याच्याही पुढे जाऊन असे गुण असतात जे शंभुमध्ये कधीही नव्हते उदा. अभ्यासू वृत्ती, कष्ट घेण्याची तयारी, निवड क्षमता आणि सभ्यपणा. हा सभ्यपणा सृजन मानिनी कडून शिकतो यात शंकाच नाही.
झोपडपट्टी सारख्या अत्यंत खडतर विश्वात लहानाचे मोठे होताना, शंभूच्या असूयेला तोंड देताना आणि आईचे मन सांभाळताना सृजनला स्वतःचे अस्तित्व पदोपदी सिद्ध करावे लागते. पुढे जाऊन तो देखील नाट्यक्षेत्रात येणार म्हटल्यावर निश्चितच अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहतात. नाट्यगृहात जन्माला आलेल्या सृजनकडून आणखीन अपेक्षा करणार?
सृजन आपल्या कष्टाने मोठा होत असतो, यशस्वी होत असतो. त्यामुळे कुटुंबापासून आधीच दूर गेलेल्या शंभू पासून सृजन मानसिक, भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या अजूनच दूर जातो. लहानाचे मोठे होत असताना परिस्थितीशी सामना करण्याचे बाळकडू सृजनला मिळते. त्यातून त्याचे तडफदार व्यक्तिमत्व पुढे येते. या प्रवासातल्या घटना देखील फार रोचक आहेत.
आणखीन एक बाब जी शंभूला कधी मिळाली नाही किंवा त्याने कधी शोधली नाही जी सृजनला लाभली, ती म्हणजे योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन आणि पाठराखण. सृजन कडे मानिनी चे संस्कार आहेत आणि चांगले मित्र देखील. मोहाचे क्षण समोर असताना देखील सृजन विवेकबुद्धी जागृत ठेवतो. त्याला आपले ध्येय दिसत असते
स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याच्या धडपडीत सृजन मोठा होत जातो. हे करत असताना तो मुलगा म्हणून सुद्धा मोठा होत जातो आणि शंभूची त्याच्या वास्तवाशी ओळख करून देतो. काही प्रमाणात कुटुंब एकत्र येऊ लागते.
आपल्या कष्टांच्या जीवावर सृजन आपले अस्तित्व कसे सिद्ध करतो? शेवट गोड होतो की नाही? हे कादंबरी वाचल्याशिवाय इथे सांगणे म्हणजे कथावाचनाच्या कलेवर फारच अन्यायकारक ठरेल.
मात्र ही कादंबरी वाचून झाल्यावर, कलाकार म्हणून आपला शंभू होऊ न देणे याचे महत्व समजतेच पण त्याच वेळेस शंभू जर “शंभू” नसता तर सृजन सुद्धा “सृजन” होऊ शकला असता का? हे न संपणारे वैचारिक द्वंद्व मनात सुरू झाले.
अस्तित्व ही एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खिळवून ठेवणारी कादंबरी आहे यात वादच नाही. पण सुशिंच्या इतर सर्व कथेप्रमाणे ही कथा लक्षात राहते ती उत्तमरित्या उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांमुळे. नाट्यक्षेत्राशी संबंध असो वा नसो सगळ्यांनी निश्चित वाचावी अशी ही कादंबरी आहे! मला मनापासून वाटते की या कादंबरीचा दुसरा भाग देखील असू शकतो कारण ज्या वळणावर ही कादंबरी संपते तिथे एका नव्या कथेची सुरुवात होते..