November 14, 2024
कोकिळा वृत्त – नियम आणि उदाहरणे

कोकिळा वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – कोकिळा

वृत्त प्रकार – मात्रावृत्त (अर्ध समवृत्त)

वृत्त मात्रा संख्या – २६ (चंद्रकांत) + १६ (पादाकुलक)

मात्रांची विभागणी – कोकिळा वृत्तात पहिल्या चरणात २६ मात्रा आणि पुढील चरणात १६ मात्रा असतात, त्यामुळे हे अर्धसमवृत्त आहे.

यति – चंद्रकांत आणि पादाकुलक यांचे यति नियम लागू पडतात.

नियम
पहिल्या चरणात (धृपद) चंद्रकांतच्या २६ मात्रा आणि पुढील चरणांत (अंतरा) १६ मात्रा

कोकिळा बद्दल माहिती

कोकिळा वृत्त हे चंद्रकांत आणि पादाकुलक वृत्तांच्या संधीने निर्माण झालेले आहे. या वृत्तातील काव्यात बऱ्याचदा पहिल्या चरणातील शेवटचे भाग पुनरुक्त केले जातात (पुन्हा म्हटले जातात). अंतऱ्यातील पंक्तींमध्ये पादाकुलक वृत्ताचा उपयोग होतो. त्यामानाने हे वृत्त अर्वाचीन आहे.

विशेषतः गीतांमध्ये या वृत्ताचा उत्तम उपयोग होतो झालेला आढळतो. चंद्रकलेची लांबी आणि त्यानंतर पादाकुलक सारखी धाव यांच्यामुळे या जातीतील काव्यांना उपजत चाल आहे. अनेकदा लोकगीतांमध्ये देखील याचा उपयोग झालेला दिसतो. रविकिरणमंडळातील कवींनी तर या वृत्तात उदंड रचना केलेल्या आहेत.

कोकिळा वृत्ताची उदाहरणे

कोकिळा उत्तम उदाहरण म्हणजे राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज यांच्या वाग्वैजयंती या संग्रहातील, रात्री अवेळी आर्त स्वरात गाणाऱ्या कोकिळेला उद्देशून रचलेली कविता “अवेळी ओरडणाऱ्या कोकिळेस”

अवेळ तरिही बोल, कोकिळे, अवेळ तरिही बोल !
रात्र पसरली जगतावरती,
भुरके काळे मेघहि फिरती,
वारा वाहे भरभर भंवतीं,
बालचंद्रचंद्रिका घाबरी गोरीमोरी होत.
उदासीनता छाया पसरी,
सृष्टि दिसे जरि वरुनी हंसरी—-
खिन्नताच जरि अंतरिं सारी,
व्यर्थ बोलतो, व्यर्थ डोलतो संसाराचा गोल !
– (“वाग्वैजयंती”, राम गणेश गडकरी)

कोकिळा वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता.

कोकिळा वृत्ताचे आणखीन एक सुंदर उदाहरण म्हणजे कवी गिरीश यांची “भलरी” ही कविता (शेतकरी शेतात काम करताना मनोबल उत्तम राहण्याकरता जे गीत गातात ते म्हणजे भलरीगीत)

भलरी घाला चला गड्यांनो भलरिचे गा गीत
गड्यांनो भलरिचे गा गीत
पाझरला रस ह्यो चंदेरी
डोंगर झाले समूदर पेरी
घुमू लागले आनंदाचे शेतातून संगीत
गड्यांनो शेतातून संगीत
पाचोळ्यातुन सळसळणारा
झुळझुळुनी ह्यो शीतल वारा
स्वच्छंदानें गात चालला आपुल्याच लहरीत
– (“भलरी”, कवी गिरीश – शंकर केशव कानेटकर)

रवीकिरणमंडळातील वा ज्यो देशपांडे यांनी कोकिळा जातीत शारदेला केलेली एक प्रार्थना पाहा

हवे तुझे वरदान शारदे, हवे तुझे वरदान
मानवतेची गावी गाणी
अशी अम्हा दे जिवंत वाणी
अन्यायाचे दर्शन होता असलो त्वेष उधान

स्वतंत्र भारतभू चे वैभव
सामर्थ्याने नटलेले नव
उच्छ्वासाचा प्रबंध व्हावा गाता भारतगान

मराठीयेचे नागरी आम्ही
शिल्पकार की रचना प्रेमी
जीवन मंदिर उभवू सुंदर हा अमुचा अभिमान

– (“शारदे”, वा ज्यो देशपांडे)

त्यांचीच आणखीन एक कविता, मधुर काव्यसंभार देखील याच जातिमधील आहे

मधुर काव्यसंभार कलामय मधुर काव्यसंभार
हिमालयातून जणु गंगोत्री
वाहत आली प्रयाग क्षेत्री
सुखवीत चाले भरत – धरित्री
कांचनगंगेपासून घेउन जीवन अपरंपार

– (“मधुर काव्यसंभार”, वा ज्यो देशपांडे)

राम गणेश गडकरींचे “स्मशानातले गाणे” हे देखील या वृत्ताचे एक उत्तम उदाहरण आहे. ही कविता देखील विशेष सुंदर आहे.

वाटे स्मशान शांतिस्थान
सजीवतेचा चाले चाळा
कवीस त्याचा ये कंटाळा
त्रास जगाचा चुकवायाला
शांतपणाचे रूप जगाचे अशा स्मशानीं जात ।।धृ ।।
विश्रांतीस्तव निसर्गदेवी
निजसदनीचा दीप मालवी
(ज्याते वदती अल्पधी रवी)
किंवा केल्या तारा टिकल्या, फोडुनि झुंबर छान ।।१।।

– (“वाग्वैजयंती”, राम गणेश गडकरी)

कोकिळा वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *