वृत्ताचे नाव – नववधू
वृत्त प्रकार – मात्रावृत्त
वृत्त मात्रा संख्या – १६
मात्रांची विभागणी – प्रत्येक चरणात १६ मात्रा “मात्र” (पद्मावर्ती विषमवृत्त)
नववधू वृत्तात ८ – ८ मात्रांच्या फोडी येत असल्याने पद्मावर्ती (पद्म म्हणजे ८). तसेच प्रत्येक चरणात १६ मात्रा असल्या तरीही ध्रुवपद आणि अंतऱ्यात मात्रांची मांडणी वेगळी असल्याने विषमवृत्त. वर नमूद केल्यानुसार ध्रुवपद आणि अंतऱ्यातील चरणांमध्ये मात्रांची विभागणी वेगळी आहे.
यति – १० व्या मात्रेवर
नियम –
ध्रुवपदाच्या दोन चरणात २+८+६ अशा मात्रा
अंतऱ्याच्या पहिल्या तीन चरणांत ८+८ अशा मात्रा
अंतऱ्याच्या मेळाच्या चरणात पुन्हा २+८+६ अशा मात्रा
नववधू बद्दल माहिती
राजकवी भा रा तांबे यांच्या “नववधू” या कवितेवरून नववधू जातीची / वृत्ताची उत्पत्ति झाली असे मानतात.
नववधू वृत्ताची उदाहरणे
नववधू प्रिया, मी बावरते; = (१११२ १२ २ २११२)
लाजतें, पुढे सरतें, फिरते. ।।ध्रु०।। = (२१२ १२ ११२ ११२)
कळे मला तूं प्राण-सखा जरि, = (१२ १२ २ २१ १२ ११)
कळे तूंच आधार सुखा जरि, = (१२ २१ २२१ १२ ११)
तुजवांचुनि संसार फुका जरि, = (११२११ २२१ १२ ११)
मन जवळ यावया गांगरतें. ।।१।। = (११ १११ २१२ २११२)
– (“नववधू प्रिया मी”, भा रा तांबे)
तें दूध तुझ्या त्या घटांतलें = (२ २१ १२ २ १२१२)
कां अधिक गोड लागे न कळे. ।।ध्रु०।। (२ १११ २१ २२ १ १२)
साईहुनि मउमउ बोटें तीं = (२२११ ११११ २२ २)
झुरुमुरु झुरुमुरु धार काढिती, = (११११ ११११ २१ २१२)
रुणझुणु कंकण करिती गीती, = (११११ २११ ११२ २२)
का गान मनांतिल त्यांत मिळे ?।।१।। = (२ २१ १२११ २१ १२)
– (“तें दूध तुझ्या त्या घटांतलें”, भा रा तांबे)
नववधू वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
घातली एकदा अतां उडी,
रे, बुडव लाव वा पैलथडी ! ।।ध्रु०।।
साहस म्हण कीं पोरपणा म्हण,
पण गेली ती परते न घडी. ।।१।।
मोह अचानक पडे मजवरी,
खर्कन पदरचि गळे पळांतरिं,
नग्नचि झालेंन कळत सत्वरि,
तूं घाल शाल, टाकीं उघडी. ।।२।।
आतां कैचें मागें वळणें ?
तुजसह लाटांवरि रे झुलणें,
तुझ्यासमोरचि जगणें मरणें,
तूं नाविक आतां तूंच गडी. ।।३।।
– (“घातली एकदा अतां उडी !”, भा रा तांबे)
घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी
_ (“घन तमीं”, भा रा तांबे)
नरजन्म मिळों हा पुन्हा पुन्हा ।।ध्रु०।।
प्रभात, सायंकाल सुशोभित
निर्मल सरिता फुले सुगंधित
निसर्ग यांसह हांसत नाचत
गमतसे स्वर्गही येथ उणा ।।१।।
_ (“नरजन्म मिळो हा”, प्रा. वि. म. कुलकर्णी)
नववधू वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!