December 2, 2024
पादाकुलक वृत्त – नियम आणि उदाहरणे

पादाकुलक वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – पादाकुलक

वृत्त प्रकार – मात्रावृत्त (समवृत्त)

वृत्त मात्रा संख्या – १६

मात्रांची विभागणी – पादाकुलक वृत्तात किंवा छंदात प्रत्येक कडव्यात चार चरण असतात आणि प्रत्येक चरणात १६ मात्रा असतात. त्यामुळे पादाकुलक हे समवृत्त आहे.

यति – ८ व्या मात्रेवर

नियम
प्रत्येक चरणात १६ मात्रा

यदतीतकृतविविधलक्ष्मयुतैर्मात्रासमदिपादैः कलितम् । अनियतवृत्तपरिमाणसहितं प्रथितं जगत्सु पादाकुलमम्

पादाकुलक छंद अथवा वृत्तामध्ये प्रत्येक चरणात ४ मात्रांचे ४ विभाग असतात. यात पहिल्या विभागात लघु असले तरी चालतात पण कुठल्याही विभागात ३ मात्रांची विभागणी वर्ज्य आहे.

पादाकुलक बद्दल माहिती

पादाकुलक छंद ४-४ मात्रांच्या सम प्रमाणातील विभागणीमुळे गायला सोपे जाते. विशेषतः प्राकृत भाषांमध्ये या छंदाचा उत्तम उपयोग दिसून येतो.

विशेष गोष्ट म्हणजे चौपाई छंदात सुद्धा प्रत्येक चरणात १६ मात्रा असतात. पण पादाकुलक आणि चौपाई मध्ये मुख्य फरक असा की चौपाई छंदात चरणांच्या शेवटी गण किंवा गण येणं वर्जित आहे.

कवी भानु यांनी या छंदाचे काही उपप्रकार देखील आहेत. त्यांची नावे आणि नियम खाली देत आहोत

१. मत्त समक – ९ वी मात्रा कायम लघु
२. विश्लोक – ५ वी आणि ८ वी मात्रा कायम लघु
३. चित्रा – ५ वी, ८ वी आणि ९ वी मात्रा कायम लघु
४. वानवासिका – ९ वी आणि १२ वी मात्रा कायम लघु
५. डिल्ला – चरणांच्या शेवटी भ गण (भास्कर – २११) असले पाहिजेत
६. अरिल्ल – चरणांच्या शेवटी दोन लघु असले पाहिजेत पण ते भ गण असण्याची बाध्यता नाही

पादाकुलक वृत्ताची उदाहरणे

पादाकुलक वृत्ताचे अत्यंत उत्तम आणि लक्षात ठेवायला सोपे उदाहरण म्हणजे केशवसुतांची “एक तुतारी द्या मज आणुनी”

एक तुतारी द्या मज आणुनी (११ १२२ २ ११ २१२ = १६)
फुंकिन मी जो स्वप्राणानें (२११ २ २ २२२२ = १६)
भेदुनि टाकित सगळीं गगनें (२११ २११ ११२ ११२ = १६)
दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें (२१ १२ २ २२२२ = १६)

पादाकुलक वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

मा मां रामां चेतो यायाः
श्रीमद्रामावरजं यायाः ।
रामास्सर्वा अनुजा एताः
कामान्नेमा वामाः कुर्याः ॥
– (“यतिपतिषण्णवतिः”)

ज्याचे त्याला राहू द्यावे
ज्याचे त्याला साहू द्यावे
जन्म नाठवे मरण बिचारे
ज्याचे त्याला पाहू द्यावे !
– (रोहित बापट “हृद्रोग”)

हिरवे हिरवेगार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरतीं
फुलराणी ही खेळत होती.

गोड निळ्या वातावरणांत
अव्याज – मनें होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला
अवगत नव्हत्या कुमारिकेला.

आईच्या मांडीवर बसुनी
झोंके घ्यावे, गावीं गाणीं;
याहुनि ठावें काय तियेला
साध्या भोळ्या फुलराणीला ?
– (“फुलराणी”, बालकवी)

सह्याद्रीच्या गगनमंडळी
शिखर शोभते उंच मनोहर
समर्थ गुरूच्या चिरस्मृतींचे
सज्जनगड हे सुंदर मंदिर

चिरा-चिरा हा इथला सांगे
या दासाची अनुपम गाथा
शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन कण-कण झुकला माथा
– (“सज्जनगड हे सुंदर मंदिर”, डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर संदर्भ)

पादाकुलक वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *