मनुस्मृति बद्दल जितके समज पसरलेले आहेत त्यावरून, या ग्रंथात हिंसा, न्याय, दंड इत्यादी विषयांवर काय सांगितले आहे हे फारसे कुणाला माहित असेल असे वाटत नाही. पण आपल्या ग्रंथांमध्ये जे सांगितले आहे ते भावनिक न होता वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे हे तर्कसंगत आहे.
हिंसा हा शब्द कानावर पडताच जवळजवळ सगळ्या भारतीयांना “अहिंसा परमो धर्मः” हे शब्द आठवतील. पण क्वचितच कुणाला माहित असेल की हा अर्धवट श्लोक आहे. पूर्ण श्लोक “अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:” आहे. अर्थात अनेकांना हे वाचून दुःख होईल की कोणत्याही ग्रंथात हा श्लोक नाही. महाभारतातील एका श्लोकावरून प्रेरणा घेऊन हा श्लोक बनवला आहे. तरीही धर्मशास्त्राचा आणि इतिहासाचा विचार केला तर हिंसा प्रत्येक वेळेस अयोग्य ठरत नाही. तसे असते तर वैदिक काळापासून आत्तापर्यंत योग्य व्यक्तींनी केलेली सगळी युद्धे चुकीची म्हणावी लागतील. कारण हिंसेखेरीज युद्ध, ही एक अन्योक्ती होऊन जाईल!
मनुस्मृति वाचत असताना हिंसा, धर्म, न्याय आणि दंड यांच्याबद्दल वाचन करत असताना काही श्लोक वाचनात आले. या श्लोकांमधील तर्क सटीक आहे. या श्लोकांमधून स्व-संरक्षण (Self-defense) चे नियम सांगितले आहेत. स्वतःचे संरक्षण ही स्वतःची जबाबदारी आहे. पण हे करत असताना अनेकदा “अहिंसा परमो धर्मः” आड येते. पूर्वीच्या ज्ञानी लोकांनी स्व-संरक्षणाच्या दृष्टीने समाजातील राजापासून प्रजेपर्यंत सगळ्यांसाठी काही ठळक आणि सुस्पष्ट मार्ग दाखवले आहेत. जे मनुस्मृति मधील आठव्या अध्यायातील या श्लोकांमधून जाणून घेऊ शकतो.
अइन्द्रं स्थानमभिप्रेप्सुर्यशश्चाक्षयमव्ययम् ।
नोपेक्षेत क्षणमपि राजा साहसिकं नरम् ॥ ३४४ ॥
इंद्रदेवाचे स्थान आणि सुयश इच्छिणाऱ्या राजाने लुटारूच्या निग्रहात (शिक्षा/दंड करण्यात) क्षणमात्र देखील वेळ दवडू नये.
वाग्दुष्टात् तस्कराच्चैव दण्डेनैव च हिंसतः ।
साहसस्य नरः कर्ता विज्ञेयः पापकृत्तमः ॥ ३४५ ॥
दुष्ट भाष्य करणारा (वाईट साईट बोलणारा), चोर आणि मारामारी करणार्यांपेक्षा, हिंसा करणारा डाकू आणि लुटारू अधिक जास्त अपराधी/पापी मानला जावा.
साहसे वर्तमानं तु यो मर्षयति पार्थिवः ।
स विनाशं व्रजत्याशु विद्वेषं चाधिगच्छति ॥ ३४६ ॥
हिंसा करणाऱ्या लुटारूंना क्षमा करणाऱ्या राजाचा शीघ्र विनाश होतो आणि प्रजेचा वैरी होऊन जातो, तो राजा विद्वेषाच्या मार्गावर जातो.
न मित्रकारणाद् राजा विपुलाद् वा धनागमात् ।
समुत्सृजेत् साहसिकान् सर्वभूतभयावहान् ॥ ३४७ ॥
मैत्री, आर्थिक प्राप्ती इत्यादी कोणत्याही कारणाने राजाने, समस्त प्रजेत दहशत माजविणाऱ्या हिंसक लुटारूला क्षमा करू नये.
शस्त्रं द्विजातिभिर्ग्राह्यं धर्मो यत्रोपरुध्यते ।
द्विजातीनां च वर्णानां विप्लवे कालकारिते ॥ ३४८ ॥
आत्मनश्च परित्राणे दक्षिणानां च सङ्गरे ।
स्त्रीविप्राभ्युपपत्तौ च घ्नन् धर्मेण न दुष्यति ॥ ३४९ ॥
जेव्हा धर्म – कर्म रोखले जात असेल, वर्णा – वर्णात विप्लव म्हणजे उपद्रव/अशांती होत असेल, आत्मरक्षणासाठी, दक्षिणेच्या रक्षणासाठी, विद्वान अथवा स्त्रियांवर अत्याचार होत असेल, तेव्हा द्विजांनी शास्त्र धारण करावे (मनुस्मृति नुसार यज्ञोपवीत धारण करणारा प्रत्येक जण द्विज आहे. यज्ञोपवीत केवळ एका समूहासाठी मर्यादित नाही. हा विषय वेगळा आहे तूर्तास हे लक्षात असू दे). धर्मासाठी शस्त्र उचलणाऱ्याला / धर्मयुद्ध करणाऱ्याला पापी समजला जाऊ नये.
गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् ।
आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन् ॥ ३५० ॥
कोण्या आततायी व्यक्तीने जर तुमच्यावर हिंसक हल्ला केला तर निःसंकोचपणे त्याच्यावर प्रहार करा. मग, तो आततायी गुरू, बालक, वयस्क, ब्राह्मण अथवा बहुश्रुत का असेना.
नाततायिवधे दोषो हन्तुर्भवति कश्चन ।
प्रकाशं वाऽप्रकाशं वा मन्युस्तं मन्युमृच्छति ॥ ३५१ ॥
आततायी (हिंसक दुष्ट व्यक्ती) व्यक्तीचे हनन करणाऱ्या (जीवे मारणाऱ्या) व्यक्तीला हिंसेचे पाप लागत नाही कारण, ही हिंसा आततायी व्यक्तीने केलेल्या हिंसेची प्रतिक्रिया असते.
अर्थातच आपल्या देशात संविधान असल्याने मनुस्मृति मधील हिंसा आणि धर्माविषयी या नियमांचे मूल्य फारसे उरलेले नाही. पण, तर्काचा आणि नीतीचा विचार केल्यास स्व-संरक्षणाच्या दृष्टीने वरील श्लोक निश्चितपणे मार्गदर्शक आहेत. आत्तापर्यंत कदाचित काही वाचकांना हे श्लोक आणि भाषांतर वाचून कपाळावर आठ्या आल्या असतील पण आपल्या महाराजांनी आणि उत्तम इतर उत्तम राजांनी हिंसक आततायी लोकांना कोणत्या कोणत्या आणि कशा शिक्षा दिलेल्या आहेत याचे स्मरण करा.
असो, या ब्लॉगचा उद्देश आपल्या ग्रंथांबद्दल अधिक माहिती असावी हा आहे. हे आपल्या पूर्वजांचे दर्शन आहे. कदाचित आज त्यातील सर्व गोष्टी लागू होत नसतील पण अभ्यासक म्हणून आपल्या ग्रंथांबद्दल अज्ञान कोणत्याही दृष्टीने फायद्याचे नाही.