वृत्ताचे नाव – प्रणयप्रभा
वृत्त प्रकार – मात्रावृत्त
वृत्त मात्रा संख्या – १६
मात्रांची विभागणी -ध्रुवपद आणि अंतर्याच्या तीन चरणात १६ मात्रा आणि शेवटच्या चरणात १४ मात्रा “मात्र” (पद्मावर्ती विषमवृत्त)
प्रणयप्रभा वृत्तात ८ – ८ मात्रांच्या फोडी येत असल्याने पद्मावर्ती (पद्म म्हणजे ८). तसेच सर्व चरणांमध्ये सामान मात्रा नसल्याने विषमवृत्त.
यति – निश्चित नियम नाही
नियम –
ध्रुवपदाच्या दोन चरणात २+८+६ अशा मात्रा
अंतऱ्याच्या पहिल्या तीन चरणांत ८+८ अशा मात्रा
अंतऱ्याच्या मेळाच्या चरणात ८+६ अशा मात्रा
प्रणयप्रभा बद्दल माहिती
राजकवी भा रा तांबे यांच्या “नववधू” या कवितेवरून नववधू जातीची / वृत्ताची उत्पत्ति झाली असे मानतात.
प्रणयप्रभा वृत्ताची उदाहरणे
जन खुळे म्हणति तर अपण खुळे ! = (११ १२ १११ ११ १११ १२ = १६)
त्यांचें अपुलें कधिं न जुळे ! ।।ध्रु०।। = (२२ ११२ ११ १ १२ = १४)
त्यांचा अपुला मार्ग निराळा, = (२२ ११२ २१ १२२ = १६)
दिक्कालांचा त्यांना आळा; = (२२२२ २२ २२ = १६)
प्रणयी आठवि का दिक्काला ? = (११२ २११ २ २२२ = १६)
पाळ आपुली खिरे पळें. ।।१।। = (२१ २१२ १२ १२ = १४)
– (“जीवसंयोग”, भा रा तांबे)
तव नयनिं उजळले बालरवी, = (११ १११ १११२ २११२ = १६)
फूले ह्रदयिं मम उषश्छवी. ।।ध्रु०।। = (२२ १११ ११ १११२ = १४)
ह्रत्क्षितिजीं मम कनकमनोरम = (२११२ ११ ११११२११)
राग उसळला उधळुनि कुंकुम; = (२१ १११२ ११११ २११)
तिळभर न उरे कोठेही तम; = (११११ १ १२ २२२ ११)
न्हाले बाग सखे; विभवीं ।।१।। = (२२ २१ १२ ११२)
– (“प्रणयप्रभा”, भा रा तांबे)
प्रणयप्रभा वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
तुजकडे पाहतो पुन्हा पुन्हा
हा काय गडे माझाच गुन्हा
नयन नासीका अभिनय वाणी
प्रखर परजल्या शस्त्रावाणी
उजळशील पथ घन नैराशी
उपजे हा भरवसा मना
– (“हा काय माझा गुन्हा!”, कवी यशवंत)
निस्तब्ध रहा क्षणि या, प्रणया
मनात बोलु दे निज हृदया
जन्म जन्म दुर्मिळ ये घडि ती
हृदये अपुली द्रुत धडधडती
काय वादाया गुज धडपडती ?
भाषा कळुनी नकळे उभया
– (“संगीत – परिणीती”, दा. अ. कारे)
सोडणार का हो मज इथुनी
द्या सजा आणखी वाढवुनी
गुन्हा एकदा घडला केला
कलंक त्याचा माथा बसला
तो पुसता ये तुम्हा न काळा
मुक्तीत अर्थ मग काय जनी?
– (“गुन्हेगार”, कवी श्री. कान्त यांच्या “रुद्रवीणा” कविता संग्रहातून)
प्रणयप्रभा वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!