January 12, 2025
फटका वृत्त – नियम आणि उदाहरणे

फटका वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – फटका

वृत्त प्रकार – मात्रावृत्त (अर्ध समवृत्त)

वृत्त मात्रा संख्या – ३०

मात्रांची विभागणी – फटका वृत्तात प्रत्येक चरणात ३० मात्रा असतात, त्यामुळे हे समवृत्त आहे.

यति – ८ व्या, १६ व्या आणि २४ व्या मात्रेवर

नियम
प्रत्येक चरणात ३० मात्रा

चरणांत मात्रांची विभागणी ८+८+८+६ अशी असते.

फटका बद्दल माहिती

फटका वृत्त एक अर्ध समवृत्त मात्रावृत्त असले तरीही मूलतः कवी अनंत फंदी यांनी निर्माण केलेला काव्यप्रकार आहे. अनंत फंदी स्वतः शाहीर असल्याने उपदेशपर काव्यरचना करणे त्यांच्या रक्तात होतेच. पण जेव्हा आजूबाजूची परिस्थिती पाहून त्यांच्या लक्षात आले की समाजाला जोपर्यंत “फटके” पडणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या स्थूल मेंदूला जागृत करता येणार नाही. त्यामुळेच कदाचित या वृत्तातील कवने इंग्रजीत म्हणतात तशी hard-hitting म्हणजेच फटकेबाजी करणारी आहेत!

वृत्तातला बराचसा भाग पद्म म्हणजे ८ मात्रांच्या विभागात असल्याने या वृत्ताचा उपयोग गझलांत झालेला अधिक दिसतो. त्यामानाने जास्त मात्रा असल्यामुळे कथनासाठी या वृत्ताचा विशेष उपयोग आहे. कल्पना करा विचार मांडण्यासाठी जर मोठा कागद मिळाला तर? नक्कीच जास्त काही सांगता येईल! 🙂

या वृत्ताला हरिभगिनी देखील म्हणतात. फटका वृत्ताला आम्ही अर्ध समवृत्त म्हणत आहोत कारण फटक्यात काही पंक्तींनंतर १४-१४ मात्रांच्या पंक्ती येतात. हरिभगिनी वृत्तात देखील प्रत्येक चरणात ३० मात्रा असतात पण ते पूर्ण समवृत्त आहे!

फटका वृत्ताची उदाहरणे

फटका वृत्ताचे अत्यंत उत्तम आणि लक्षात ठेवायला सोपे उदाहरण म्हणजे अनंत फंदी यांचा “उपदेशपर फटका” – “बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मागी सोडुं नको”.

संसारामधिं ऐस आपला उगाच भटकत फिरुं नको ।
चल सालसपण धरुनि निखालस बोला खोटया बोलुं नको ॥
पर धन पर नार पाहुनि चित्त भ्रमुं हें देऊं नको ।
अंगीं नम्रता सदां असावी राग कुणावर धरुं नको ॥
नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणा घेऊं नको ।
भली भलाई कर कांहीं पण अधर्म मार्गीं शिरुं नको ॥

मायबापावर रुसूं नको ।
दूर एकला बसूं नको ।
व्यवहारामधिं फसूं नको ॥
परी उलाढाली भलभलत्या पोटासाठीं करुं नको ॥ 

बर्म काढुनि शरमायाला उणें कुणाला बोलुं नको ।
बुडवाया दुसर्‍याचा ठेवा करुनिया हेवा झटुं नको ।
मी मोठा शाहाणा धनाढयही गर्व भार हा वाहुं नको ।
एकाहुन एक चढी जगामधिं थोरपणाला मिरवुं नको ॥
हिमायतीच्या बळें गरिबागुरिबाला तूं गुरकावुं नको ।
दो दिवसांची जाइल सत्ता अपेश माथां घेऊं नको ।
बहुत कर्जबाजारी होऊनि बोज आपला दवडुं नको ।
स्नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन होऊं नको ॥

फटका वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

खालील फटका किंवा हरिभगिनी वृत्तातील उदाहरण संस्कृत आहे “गोविंदष्टकं”

सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं
गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासम्।
मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं
क्ष्मामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्।।

आणखीन एक संस्कृत उदाहरण “लक्ष्मीनृसिंहपञ्चरत्नम्”

त्वत्प्रभुजीव-प्रियमिच्छसि चेन्नरहरि-पूजां कुरु सततं
प्रतिबिम्बालंकृति-धृति-कुशलो बिम्बालंकृतिमातनुते ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम् ।।

राजकवी भा रा तांबे यांची फटका म्हणजे हरिभगिनी जातीतील रचना

खळखळ गळतें जळ नयनांतुनि येतें माझें उर भरुनी.
अलसकुंचित तें मदिरेक्षण, लज्जास्मित तें मधुवदनीं,
मृदुमधु बोलुनि नेली यामिनि जागत कामिनि, ये स्मरणीं.
करिं कर घालुनि अधिकचि अवळुनि तृप्त न झालों जैं स्वमनी.
– (“आठवती ते दिन अजुनी”, भा रा तांबे)

याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १५ व्या वर्षी रचलेला स्वातंत्र्याचा फटका मधील काही पंक्ती खाली देत आहे

आर्यबंधु हो उठा उठा का मठासारखे नटा सदा
हटा सोडूनि कटा करूं या म्लेंच्छपटा ना धरू कदा
काश्मीराच्या शाली त्यजूनि अलपाकाला का भुलता
मलमल त्यजूनि वलवल चित्तीं हलहलके का पट वरिता

विशेष म्हणजे संगीत शारदा मध्ये सुद्धा एक उपदेशपर “फटका आहे!

भल्या माणसा दसलाखाची गोष्ट सांगतो फोडुं नको ।।
पन्नाशीची झुळुक लागली बाइल दुसरी करू नको ।।
भटें तटें तीं फुगा फुगवितिल त्यांच्या नादीं फुगूं नको ।।
सगे सोयरे भीड घालतिल परी भरीला पडूं नको ॥
कळी कांबळी तुला कश्याला पिशापरी ती खुडू नको ।॥
थोडी उरली कळ सोसावी पोर कुणाची नाडु नको ॥
कुणीं खुलविला खुलूं नको ॥
तरणा म्हणतां झुलूं नको ॥
फसव्या पाण्या भुलूं नको ॥
तुझे तूंच अवसान ओळखी भोल्यावरती चढु नको ॥
फुकट तमाशा लोक पाहतिल दहांत हांशा पिकवुं नको ॥

फटका वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!

Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *