वृत्ताचे नाव – साकी
वृत्त प्रकार – मात्रावृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – २८
मात्रांची विभागणी – प्रत्येक चरणात २८ मात्रा
यति – १६ व्या मात्रेवर
नियम – साकी एक मात्रावृत्त आहे. प्रत्येक चरणात २८ मात्रा असल्याने साकी एक समवृत्त आहे.
साकीबद्दल माहिती
महाराष्ट्रात प्राकृत भाषिक कीर्तनकारांनी आणि संतांनी विपुल प्रमाणात साक्या रचल्या. याचाच आधार घेऊन संगीत नाटकांनातून साकी वृत्तातील पदे प्रसिद्ध झाली. साकी आणि दिंडी ही धावती वृत्ते आहेत आणि कथनासाठी किंवा एखादा प्रसंग थोडक्यात सांगण्यासाठी उत्तम मानले गेले आहेत. खरे तर अशी अनेक पदे आहेत जी लोकांना खूप आवडतात पण लोकांना माहित नसते की त्या साक्या आहेत! उदाहरणार्थ संगीत सौभद्रातील “चोरांनि निजधेनु चोरील्या“, संगीत संशय कल्लोळ ची नांदी “बलवत्पदनत गोविंदानें”. गायला सुरस आणि समवृत्त असल्याने चाल द्यायला देखील सोपी, अक्षरांच्या मात्रांची ठेवण चौकटिबध्द नाही आणि कमी शब्दात कथा पुढे नेता येण्याची क्षमता! त्यामुळे नाटककारांनी सढळ हाताने कथन करताना साक्या वापरल्या.
साकी वृत्ताची उदाहरणे
चोरांनी निज धेनु चोरिल्या धावा धावा ऐसे । (२२२ ११ २१ २१२ २२ २२ २२ = २८ मात्रा)
शब्द करित ते ब्राह्मण आले माझ्या द्वारासरिसे । (२१ १११ २ २११ २२ २२ २२११२ = २८ मात्रा)
आश्वासुनि त्यांना । झालो तयार रिपुदमना ॥१॥
– (संगीत सौभद्र, बळवंत पांडुरंग किर्लोस्कर)
बलवत्पदनत गोविंदानें संगीतीं नटवीलें ॥ (११२११११ २२२२ २२२ ११२२ = २८ मात्रा)
संशय – कल्लोळाख्य सुनाटक हास्यरसें आश्रियलें ॥ (२११ १२२१ १२११ २२१२ २११२ = २८ मात्रा)
प्रयोगरुपें तें ॥ श्रवणेक्षींण घ्या स्थिरचित्तें ॥१॥
– (संगीत संशय कल्लोळ, गो ब देवल)
अभिरुचि कोणा शृंगाराची कोणा वीर रसाची ॥ (११२१ २२ १२२२ २२ २१ १२२ = २८ मात्रा)
हास्य रुचे कोणास करूणही रुचि न एक सकळांची ॥ (२२ १२ २२१ १११२ ११ १ ११ ११२२ = २८ मात्रा)
एका आवडतें ॥ तेंचि दुजाला नावडतें ॥१॥
– (संगीत शारदा, गो ब देवल)
साकी वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
इंद्रजीत त्या कालीं अभ्राआड लपुन शर मारी ॥
आजि आम्हांवर कशी कोपली कपी म्हणती महानारी ॥
युद्धाविण मरती, रघुविरनाम स्मरति ॥१॥
– (कीर्तन आख्यान – सुलोचनागहिंवराख्यान)
कविच्या ह्रदयीं जसे गुंगती कवितेचे मधु बोले,
किंवा गायकमतींत झुकती ताना त्या सुविलोल,
तसे माझिया अन्तर्त्यामीं तुझिया सौन्दर्याचे,
विकास हंसती सखे निरंतर, ह्रदयंगम जे साचे !
अलिच्या गुंजारावी जैशी मधुलोलुपता खेळे,
वसन्तशोभासक्ति ज्यापरी कोकिलगानीं डोले,
मदीय चित्तव्यापारीं तूं तशीच मधुरे बोल,
खेळत असशी; तेणें आहे भ्रमिष्ट मन्मन झालें !
– (कविच्या ह्रदयीं जसें गुंगती, केशवसुत १८९८)
मेघा अति गंभीर रवानें करी गर्जना आतां ।
स्पर्शे रोमांचित मी झालों आलिंगी मज कांता ॥
मन्मथ संचरला । कदंबसुमता ये तनुला ॥१०॥
– (संगीत मृच्छकटिक, गो ब देवल)
पाल पाहुनी जसा बिचारा विंचू टाकी नांगी;
तसा आमुचा नायक खिळला उभा जागच्या जागी!
भान विसरला, कार्य विसरला, टकमक पाहत राही,
वेळ लोटला, असा किती तरि, स्मरण न त्याचे काही!
– (आचार्य अत्रे)
केका कारिती मयूर अपुल्या उंच करोनी माना,
बोलाविति जणु मुदें भेटण्या चिरसंगत जलदानां
उन्नत जलघर पाहुनि अथवा केकाव्याजें केकी
‘केव्हां आलां ?’ ऐसे त्यांना हर्षें पुसती जणुं कीं !
– (वर्षऋतुवर्णन, कवी धूर्जटी)
साकी वृत्तात असंख्य रचना कवींनी आणि नाटककारांनी केलेल्या आहेत. या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!