वृत्ताचे नाव – पंचचामर
वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – १६ + १५
वृत्त अक्षर संख्या – ११ + ११
गणांची विभागणी – ज, र, ज, र, ज, ग (ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा)
यति – इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा चे यतिचे नियम
नियम –
पंचचामर वृत्तात प्रत्येक चरणात ज, र, ज, र, ज, ग असे गण असतात आणि त्यांची मांडणी ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा असा असतो.
पंचचामर बद्दल माहिती
पंचचामर एक अक्षरगणवृत्त आहे. हे वृत्त संस्कृत काव्यांपासून अगदी अर्वाचीन कवितांपर्यंत उपयोगात आणलेले आहेत. या वृत्तातील लघु आणि गुरु यांची रचना पद्यात एक प्रकारची अंगीभूत लय घेऊन येते. तांत्रिकदृष्ट्या जरी हा छंद सोपा वाटला तरी देखील या छंदात शब्दांची रचना आणि अपेक्षित रसनिष्पत्ति यांची सांगड घालणे तितकेच अवघड आहे. काव्यशास्त्रात आणखीन एक छंद “प्रमाणिका” आहे ज्यात मात्रा ल गा ल गा ल गा ल गा अशा असतात. ज्याचे दुप्पट केले तर पंचचामर बनतो!
सर्वसाधारणपणे अशी मान्यता आहे की हा छंद वीर रसासाठी योग्य आहे.
या छंदाला “नाराच” आणि “नागराज” अशी देखील नावे आहे. (संदर्भ)
वृत्ताचे लक्षणसूत्र
१.
जरौ जरौ ततो जगौच पञ्चचामरं वदेत्
२.
प्रमाणिकापदद्वयं वदंति पंचचामर
३.
जराजराज गा गणां जिथें सदैव आदर
~ साहित्य चंद्रिका (हरी माधव समर्थ)
पंचचामर वृत्ताची उदाहरणे
पंचचामर वृत्ताचे सर्वश्रुत उदाहरण म्हणजे रावण रचित “शिवतांडव स्तोत्र”
जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले गलेऽव लम्ब्यलम्बितां भुजंगतुंग मालिकाम्।
डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव: शिवम्
पंचचामर वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
एक दोन उदाहरणे प्रसिद्ध हिंदी कवींचे देतो
हिमाद्रि तुंग श्रृंग से प्रबुद्ध शुद्ध भारती |
स्वयंप्रभा समुज्वला स्वतंत्रता पुकारती |
अमर्त्य वीर पुत्र हो दृढ़-प्रतिज्ञ सोच लो |
प्रशस्त पुण्य पंथ हैं – बढ़े चलो बढ़े चलो |
~ जय शंकर प्रसाद
आणखीन एक उदाहरण अर्वाचीन कवी बाबा कल्पनेश यांचे. त्यांची कविता कोरोना काळाला अत्यंत तंतोतंत लागू पडते
रमानिवास जागिए,मही तुम्हें पुकारती।
प्रभात हो सके धरा,सुहाग माँग धारती।।
तुम्ही विभात प्राण हो,प्रकाश पंथ खोल दो।
विषाणु नष्ट हो सके,हवा सुमिष्टि घोल दो।।
~ बाबा कल्पनेश
वाचकांना आश्चर्य वाटेल की, शांता शेळके यांची एक कविता “असेन मी नसेन मी” जी गीत म्हणून देखील प्रसिद्ध आहे ती पंचचामर वृत्तात आहे.
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे
हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले
तृणांत फुलापाखरू तसे बसेल गीत हे
~ शांता ज शेळके
आणखीन एक उदाहरण मराठी शाकुंतल मधील आहे
वृत्ति आश्रमाविरुद्ध जन्मतांचि ही अशी
आदरोनि कां बळेंचि संयमासि दूषिसी
तपोवना सुखप्रदा तशाचि सत्त्वधारणा ?
कृष्णसर्पबाल जेवि चंदना प्रमोदना
~ (लक्ष्मणशास्त्री लेले)
आणखीन एक अंगावर काटा आणणारे काव्य म्हणजे अनंत फंदी यांचे “माधवाख्यान” ययाती यशोदाबाई पेशवे यांची कैफियत खालील कडव्यात दिसून येते
तुम्ही प्रबुद्ध थोर काय सांगावें तुम्हास रे ।
कसे आपास दत्त देतसां ते माझे सासरे ।
सुन त्यांची मी मला ते दत्त देतसा कसें ।
अयोग्य कर्म काय भाऊ वर्ततां तुम्ही असे ॥
~ (अनंत फंदी, “माधवाख्यान”)
पंचचामर वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!
शब्दयात्री वर वृत्तांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा!