वारुणी वृत्त – नियम आणि उदाहरणे वारुणी वृत्त

वारुणी वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – वारुणी (व्योमगंगा)

वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)

वृत्त मात्रा संख्या – २८

वृत्त अक्षर संख्या – १६

गणांची विभागणी – र, त, म, य, र, ग (गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा)

यति – विशिष्ट नियम नाही. सादर करताना प्रत्येक चार अक्षरांनंतर घेतल्यास रसनिष्पत्ती उत्तम होते.

नियम
वारुणी वृत्तात प्रत्येक चरणात र, त, म, य, र, ग असे गण असतात आणि त्यांची मांडणी गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा अशी असते.

वारुणी बद्दल माहिती

वारुणी एक अक्षरगणवृत्त आहे ज्याला माधव ज्युलियन यांनी तुंगभद्रा चतुर्गणी म्हटले आहे. कारण एकंच तऱ्हेची लगावली एका पंक्तीत चार वेळा येते. संस्कृतमध्ये या वृत्ताला व्योमगंगा म्हटले आहे. मराठी काव्यात या वृत्ताचा प्रचंड उपयोग केलेला आढळतो. त्याचप्रमाणे गझलेत सुद्धा या वृत्तात विपुल लिखाण झालेले आहे. उर्दू मध्ये वारुणी किंवा व्योमगंगा वृत्ताला बहर-ए-रमल म्हटले जाते.

वृत्ताचे लक्षणसूत्र

१.
वारुणी की व्योमगंगा गालगागा चार वेळा
~ रोहित बापट (हृद्रोग)

वारुणी वृत्ताची उदाहरणे

वारुणी किंवा व्योमगंगा वृत्ताचे सर्वश्रुत उदाहरण म्हणजे श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांची गझल “मल्मली तारुण्य माझे”

मल्मली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जिवाला गुंतवावे

वारुणी किंवा व्योमगंगा वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

थांबणे ही फार झाले चालणे ही फार झाले 
शांत होतो एवढे की बोलणे ही फार झाले
– (रोहित बापट “हृद्रोग”)

जुन्या काळातले प्रसिद्ध निसर्गकवी आणि प्रेमकवी शंकर बळवंत चव्हाण यांची “कापसाचे शेत” ही कविता देखील वारुणी वृत्तात आहे.

कापसाचें शेत माझें हो फुलोनी शुभ्र सारें
वाटती हे कीं नभींचे खालिं आले सर्व तारे
हेंच आम्हां होत लोकीं दौलतीचे दिव्य ठेवे !
याविना तेजाळ मोतीं वा हिरे ते काय व्हावे !
– (शंकर बळवंत चव्हाण)

माधव ज्युलियन यांच्या कवितेतील उदाहरण

ऊठ साकी, दे भरूनी वारुणीचा एक पेला
रात्र ती गेली सरूनी, लाल हो भानू उदेला
– (माधव ज्युलियन)

वारुणी वृत्ताची आणखीन दोन उदाहरणे कवी यशवंत यांच्या कवितांची देत आहे

येइ भाई येथ पाही घातली ही पाणपोई
घर्मजाती कोणती ती भेद ऐसा येथ नाहीं
– (यशवंत, “पाणपोई”)

येइं भाई येथ पाहीं थाटली ही सावकारी
धर्म-जाती येथ कांहीं भेद ऐसा ना विकारी
– (यशवंत, “सावकारी”)

आणखीन एक उदाहरण कवी श्रीकांत यांच्या “अमरज्योत” कवितेतील

ध्येयमार्गी झुंजतांना बंधने विध्वंसितांना
प्राणज्योती ज्या विझाल्या ज्योत त्यांची पेटताहे
(श्रीकांत, “रुद्रवीणा”)

वारुणी किंवा व्योमगंगा वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!

शब्दयात्री वर वृत्तांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *