December 2, 2024
शार्दूलविक्रीडित वृत्त – नियम आणि उदाहरणे

शार्दूलविक्रीडित वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – शार्दूलविक्रीडित

वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)

वृत्त मात्रा संख्या – ३०

वृत्त अक्षर संख्या – १९

गणांची विभागणी – म, स, ज, स, त, त, ग

यति – १२ व्या मात्रेवर

नियम
शार्दूलविक्रीडित वृत्तात म, स, ज, स, त, त, ग गण येतात य म्हणजे – – – । U U – । U – U । U U – । – – U । – – U । – म्हणजे २२२ । ११२ । १२१ । ११२ । २२१ । २२१ । २

शार्दूलविक्रीडित बद्दल माहिती

शार्दूल म्हणजे सिंह आणि विक्रिडीत म्हणजे खेळ (क्रीडा). सिंहाच्या क्रीडेकडे पाहून या छंदाला शार्दूलविक्रीडित हे नाव दिलं गेलं असावं.

कवी क्षेमेंद्र नुसार शार्दूलविक्रीडित छंद राजांचे शौर्य आणि युद्ध यांच्या वर्णनासाठी उपयुक्त आहे. (शौर्यस्तवे नृपादीनां शार्दूलक्रीडितं मतम्‌) त्याचप्रमाणे ते म्हणतात शार्दूलक्रीडितैरेव प्रख्यातो राजशेखरः | शिवरीव परं वक्रैः सोल्लेवैल्न्वशेखर: !! म्हणजे सिंह ज्याप्रमाणे खेळता खेळता आपल्या नखांनी वेडेवाकडे वार करून शिखरांसारखे आकार बनवतात तशी वक्रोक्ती करून राजशेखर प्रसिद्ध कवी झाले.

उत्तररामचरितात खालील लक्षणवाक्य वाचनात येते – सूर्याश्वैर्यदि मः सजौ सततगाः शार्दूलविक्रीडितम्। म्हणजे सूर्यैः (बाराव्या) अश्वैः(सातव्या) मात्रेवर यति आणि छंदात म, स, ज, स, त, त, ग गण येतात.

हे वृत्त किंवा छंद, स्तोत्र आणि श्लोकांमध्ये फार वापरलेले दिसते. उदाहरणार्थ गोसावीनंदन यांचे “प्रारंभी विनती करू” तसेच जिथे जिथे एखादी गोष्ट जोर देऊन, विश्वासाने सांगितलं जाईल तिथे हे वृत्त वापरात येते.

केशवसुतांनी लिहून ठेवलेले कवींचे लाडके वाक्य “आम्ही कोण म्हणुनि काय पुससी ?— आम्ही असूं लाडके” हे देखील शार्दूलविक्रीडित मध्येच आहे.

वृत्ताचे लक्षणसूत्र

आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित ॥
मा सा जा स त ताग येति गण हे पादास कीं जोडित ॥
एकोणीस पहा गणूनि चरणीं येतात हीं अक्षरें ॥
तेज: पुंज नभोंगणीं पसरलीं रत्नें पहा नक्षरें ॥

शार्दूलविक्रीडित वृत्ताची उदाहरणे

जो गोपाळ गमे प्रभातसमयीं गाई वनीं चारितां, (२ २२१ १२ १२१११२ २२ १२ २१२)
वाटे रव्युदयीं नदीवर मुनी अर्ध्यास जो अर्पितां, (२२ २११२ १२११ १२ २२१ २ २१२)
जो भासे दिवसां कृषीवल शिरीं खोंवूनियां लोंबरें, (२ २२ ११२ १२११ १२ २२१२ २१२)
तो आतां ऋतु शारदीय बहुधा शेतांतुनी संचरे. (२ २२ ११ २१२१ ११२ २२१२ २१२)
– (“दिवाळी”, केशवसुत)

जें जें या समयीं मनांत भरलें स्वच्छंद नानास्थळीं, (२ २ २ ११२ १२१ ११२ २२१ २२१ २)
तें तें त्या समयीं जपून धरितां ही होय गंगाजळी ! (२ २ २ ११२ १२१ ११२ २ २१ २२१ २)
मित्रा ! ही कविता-न गद्य-इजला निर्बंध कैचा बरें ? (२२ २ ११२ १ २१ ११२ २१ २२ १२)
सारें हें मनिं आणुनी मग धरीं ’वाग्वैजयंती’ करें ॥१॥ (२२ २ ११ २१२ ११ १२ २१२२२ १२)
– (“वाग्वैजयंती” या काव्यसंग्रहातील राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांची “वाचकांस विज्ञापना”)

आपल्या सगळ्यांच्या लाडक्या “रामरक्षेत” देखील शार्दूलविक्रीडित वृत्तातील श्लोक आहेत

रामो राजमणिःसदा विजयते रामम् रमेशम् भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोस्म्यहम्।
रामे चित्तलयःसदा भवतु मे भो राम मामुध्दर।।

शार्दूलविक्रीडित वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

गोपालांप्रति दाविलें प्रभुवरा वैकुंठ अत्यादरीं ।
लीलने धरिले करांगुलिवरी गोवर्धनाला हरी ॥
रूपें तीं बहुसाळ घेऊनि तुम्ही तो रास केला पुरा ।
अज्ञानी बहु पातकी खचित मी उद्धार माझा करा ॥
– (“श्री तुलसीदास चरित्र”, दासगणु महाराज)

श्रीमन्मंगल मंगलप्रद असे जेथें उभा सर्वदा ।
मोदें तेविं सदा सदाश्रितपदा श्रीशारदा सर्वदा, ॥
पद्माही करि सद्म ज्यास अपुलें त्या मंडपीं मंगल ।-
जोडी मंगल कार्य मंगलतरा चिन्मंगला मंगल ! ॥
– (“कवीचा वधु वरांस आहेर”, गोविंदाग्रज)

कौसल्यासुत राम, लक्ष्मण दुजा देवी सुमित्रेचिया
पोटी संभवला असे अनुज तो शत्रुघ्न दूजा यया ।
कैकेयीसुत दिव्य सद्गुणमणी शोभे पित्या सन्निधी,
यातें देखुनि भूप तोषित मनीं, पर्वी जसा वारिधी, ॥
– (“चिद्बोधरामायण – षष्ठ सर्ग”, निरंजन माधव)

गर्वानें अथवा मनांत कपटें द्वेषेंच कीं चालणें ।
धीटाई करुनी अशाच इतरीं दुर्वर्तना सोडणें ।
वर्तें लीनपणें तसेंच स्मरणें ईशास या प्रार्थणें ।
यासाठीं पहिला विवेक करुनी कार्यास कीं लागणें ॥
– (“गणेश पुराण”, मराठी अनुवाद)

व्यादीर्घेण चलेन वक्रगतिना तेजस्विना भोगिना
नीलाब्जद्युतिनाऽहिना वरमहं दष्टो, न तच्चक्षुषा ||
दष्टे सन्ति चिकित्सका दिशि- दिशि प्रायेण धर्मार्थिनो
मुग्धाक्षीक्षणवीक्षितस्य न हि मे वैद्यो न चाप्यौषधम् ||
– (“शृंगारशतकं”, भर्तृहरि)

शार्दूलविक्रीडित वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

4 thoughts on “शार्दूलविक्रीडित वृत्त – नियम आणि उदाहरणे

  1. पारंपरिक मंगलाष्टके शार्दूलविक्रीडित वृतात आहेत.

    स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।

    बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।

    लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।

    ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।

    कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।

    🙏🙏🙏🙏

    गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ।

    कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।

    शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी।

    पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।

    कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।।

    🙏🙏🙏🙏

    लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा।

    गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना ।

    अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे ।

    रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम।

    कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।।

      1. पुण्यश्लोक नृपावळीत पहिला होवोनि जो राहिला।
        तो राजा असता समस्त महिला विश्रांती शेषाहिला॥
        व्यासोक्ते अवगाहिला बुधजनी नानागुणी गायिका।
        जो नामें नळ तत्कथौघ लिहिला तो पाहिजे पाहिला॥
        -‘ नलदमयंती स्वयंवराख्यान’,रघुनाथ पंडित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *